Chemistry professor criminal trial मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका माजी केमिस्ट्री प्राध्यापिकेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. ६५ वर्षीय ममता पाठकला २०२२ मध्ये पतीची विजेचा धक्का देऊन हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि देवनारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने तिचे अपील फेटाळून लावले. त्यांनी निकाल दिला की तिनेच तिचा पती सेवानिवृत्त सरकारी डॉक्टर नीरज पाठक यांची हत्या केली. ममता पाठक यांनी न्यायालयात स्वतःची बाजू मांडतानाचा एक व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हे प्रकरण नक्की काय आहे? कोण आहे ममता पाठक? जाणून घेऊयात.

प्रकरण काय आहे?

  • २९ एप्रिल २०२१ रोजी डॉक्टर नीरज पाठक मध्य प्रदेशातील छतरपूर येथील त्यांच्या लोकनाथपुरम येथील घरात मृतावस्थेत आढळले.
  • शवविच्छेदनात त्यांच्या मृत्यूचे कारण विजेचा धक्का असल्याचे समोर आले.
  • डॉक्टर नीरज यांच्या मृत्यूच्या दिवशी पत्नी ममताच्या वागणुकीमुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. पतीच्या मृत्यूची कोणालाही माहिती न देता ती सकाळी आपल्या मुलाबरोबर डायलिसिससाठी झाशीला गेली होती.
  • ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात न्यायालयाच्या कागदपत्रांचा उल्लेख करत सांगण्यात आले की, महिलेने तिच्या चालकाला सांगितले होते की तिने मोठी चूक केली आहे.

स्थानिक सरकारी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या ममताला काही दिवसांतच हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि तिच्याविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०२ (खुनासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा खटला छतरपूर जिल्हा न्यायालयात चालवण्यात आला. डॉक्टर नीरज यांच्या नातेवाईकाने न्यायालयात सांगितले की, डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांना फोन करून सांगितले होते की, पत्नी ममता मला त्रास देत आहे. तिने मला बाथरूममध्ये बंद केले आहे आणि मला अन्न व पाणी दिले नाही.”

पोलिसांना त्यांच्या निवासस्थानी प्लग-इन वायर आणि झोपेच्या गोळ्या सापडल्या. त्या आधारावर साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर २६ जून २०२२ रोजी जिल्हा न्यायालयाने ममता हिला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले, असे वृत्तपत्राने सांगितले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कुमार देवळिया यांनी जन्मठेप आणि १०,००० रुपये दंड ठोठावला. ममताने उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठासमोर शिक्षेच्या निलंबनासाठी अपील दाखल केले.

उच्च न्यायालयात ममता पाठकने स्वतःचा बचाव कसा केला?

१२ मार्च २०२४ रोजी ममताने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. माजी प्राध्यापिकेने युक्तिवाद केला की, या प्रकरणात तिच्याविरोधात कोणताही थेट पुरावा किंवा प्रत्यक्षदर्शी नव्हते. ममताने शिक्षेच्या निलंबनाची आणि जामिनाची मागणी केली. शिक्षेचे निलंबन आणि जामीन मागताना तिने हाडांच्या कर्करोगासह इतर आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी वैद्यकीय नोंदी सादर केल्या. ममताने उच्च न्यायालयाला असेही सांगितले की, तिचा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी मुलगा पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे.

तिने आपली बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने तिची शिक्षा तात्पुरती निलंबित केली होती आणि तिला सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिचा जामीन पुन्हा वाढवण्यात आला होता. यावर्षी मे महिन्यात सुनावणीदरम्यान शवविच्छेदन अहवालाला आव्हान देणारा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या क्लिपमध्ये न्यायमूर्ती विवेक अग्रवाल ममताला त्यावेळी विचारताना दिसत होते, “तुमच्यावर तुमच्या पतीची विजेचा धक्का देऊन हत्या केल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांच्या शरीरावर विजेच्या धक्क्याची चिन्हे होती.”

ममता हिने न्यायालयाला सांगितले की, “शवविच्छेदनादरम्यान थर्मल आणि इलेक्ट्रिक बर्न मार्कमध्ये फरक करणे शक्य नाही.” केवळ योग्य रासायनिक विश्लेषण केल्यावरच यामधील फरक स्पष्ट होईल, असे तिने पुढे सांगितले. “तुम्ही रसायनशास्त्र प्राध्यापिका आहात का?” असे न्यायाधीशांनी विचारले असता यावर तिने “होय”, असे उत्तर दिले. ममताने पुढे म्हटले, “शवविच्छेदनाने हे इलेक्ट्रिक झटक्याची खूण आहे असे कसे सांगितले हे मला माहीत नाही.” त्यांचा न्यायालयातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

उच्च न्यायालयाने ममता पाठक यांची जन्मठेप कायम ठेवली

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी (२९ जुलै) माजी केमिस्ट्री प्राध्यापिकेला तिच्या पतीच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला. खंडपीठाने निकाल दिला की, ममता आणि डॉक्टर नीरज यांच्यात चांगले संबंध नव्हते. बार अँड बेंचच्या माहितीनुसार, तिने आपल्या पतीला आधी अँटीसायकोटिक औषध दिले आणि नंतर विजेचा धक्का देऊन छळ करून ठार मारले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने तिला तात्काळ सत्र न्यायालयात शरणागती पत्करण्यास सांगितले. तिच्या पतीचा मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजाराने झाल्याचा तिचा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. तिच्या पतीच्या नातेवाईकांनी मालमत्तेसाठी तिला खोटे अडकवले, हा दावाही खंडपीठाने फेटाळून लावला. न्यायालयाने सांगितले की, दाम्पत्याचा मुलगा डॉक्टर नीरज यांच्या मालमत्तेचा वारस आहे. न्यायालयाने हत्येचे कारण वैवाहिक मतभेद असल्याचे सांगितले. ममताला तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता, असेही न्यायालयाने सांगितले.