मोहन अटाळकर

राज्यात नव्या कापसाची आवक व्हायला थोडा अवकाश असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर काहीसे नरमले आहेत. यंदा देशातील कापूस लागवड गेल्या वर्षीपेक्षा जवळपास सात टक्क्यांनी वाढली आहे. मात्र देशातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली. बोंडअळीचे संकट कायम आहेच. सध्या अमेरिकेच्या कापूस बाजारातील रुईचा भाव घसरला आहे. पण, हा भाव स्थिर राहिला, तरी प्रारंभी आठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाचे भाव राहण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन कमी होण्याचे संकेत असतानाही कापूस बाजारात मंदी कशामुळे आली, असा प्रश्न चर्चेत आला आहे.

bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

कापूस बाजारातील स्थिती कशी आहे?

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला नाही तर ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एक कापूस गाठ १७० किलोची असते. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यास कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असे सीआयएचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांचे म्हणणे आहे. यंदा उत्पादन वाढेल मात्र मागणी कमी राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. जागतिक मंदीची शक्यता आणि कपडय़ांना मागणी घटल्याने कापसाचा वापर कमी होऊ शकतो, असे व्यापारी आणि उद्योगाचे म्हणणे आहे. त्यामुळे कापसाचा दर कमी झाल्याचा दावाही केला जात आहे. कापूस खंडीचे दर एक लाख रुपयांवरून आता ९३ हजारांवर आले आहेत. असे असले तरी ऑक्टोबरमधील पाऊस आणि वातावरण तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा राहतो, यावर कापसाचा बाजार अवलंबून राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कल कसा आहे?

यंदा भारत, पाकिस्तानात अतिवृष्टीमुळे तर चीनमध्ये कोरडय़ा दुष्काळामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार, असे संकेत आहेत. अमेरिकेतही पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादकता कमी होईल, अशी शक्यता होती. अमेरिकेच्या बाजारात आता मात्र कापसाचे भाव पडू लागले आहेत. अमेरिकेच्या बाजारात गेल्या वर्षी एक पाऊंड रुईचा दर एक डॉलर ७० सेंटपर्यंत वाढला होता. तो मध्यंतरी एक डॉलर १५ सेंटपर्यंत घसरला. कमी उत्पादनाच्या शक्यतेमुळे तो वाढून एक डॉलर ३० सेंटपर्यंत पोहचला. भारताचा विचार करता पंजाब, हरियाणाच्या बाजारपेठेत नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे. प्रारंभी नऊ ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास भाव मिळाला. परंतु अमेरिकेच्या बाजारात कापसाच्या दरात अचानक घट झाली. एका पाऊंड रुईचा दर हा एक डॉलर १२ सेंटपर्यंत घसरला. येत्या काळात दरात आणखी पडझड होण्याची शक्यता असल्याचे शेती अभ्यासक विजय जावंधिया यांचे म्हणणे आहे.

कापसाचे भाव कसे ठरतात?

सध्या अमेरिकेच्या बाजारात कापसाचा एक पाऊंड रुईचा भाव हा एक डॉलर १२ सेंट आहे. २.२ पाऊंड म्हणजे एक किलोग्रॅम. यानुसार प्रति किलो रुईचा दर हा २.४६४ डॉलर इतका होतो. एक डॉलरचा विनिमय दर ८० रुपये गृहीत धरल्यास हा दर १९७.१२ रुपये प्रति किलोग्रॅम रुई होतो. एक क्विंटल कापसापासून ३५ किलो रुई मिळते आणि ६४ किलो सरकी निघते. त्यामुळे एक क्विंटल कापसापासून रुईचे सहा हजार ८९९ तर एक हजार ९२० रुपये सरकीचे असे एकूण आठ हजार ८१९ रुपये होतात. म्हणजेच आठ हजार ते आठ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळू शकतो.

कापसावर कोणते संकट घोंघावत आहे?

राज्यातील विविध भागात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या संकटाने शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे केले आहे. अनेक ठिकाणी बोंडअळीचे अवशेष मिळून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिनिंग प्रेसिंग असलेल्या भागात तसेच शेजारील शेतात जास्त प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही ठिकाणी प्रादुर्भावाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याने वेळीच सावध होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. दरम्यान, शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले असले, तरी कृषी विभागाच्या मर्यादादेखील समोर आल्या आहेत. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने उत्पादकता कमी होण्याची भीती आहे.

राज्यात कापसाची लागवड किती?

कापूस हे राज्यातील विशेषत: विदर्भातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. राज्यात कापूस या पिकाखाली सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्र असून ते देशाच्या एकूण कापूस पिकाखालील क्षेत्रांपैकी एकतृतीयांशपेक्षा अधिक आहे. बहुतांश कापूस लागवड ही मोसमी पावसावर अवलंबून असल्याने त्याचे उत्पादन व उत्पादकता कमी येते. याबरोबरच उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे असून यामध्ये मुख्यत: कीड व रोग, हवामानात सतत होत असलेले बदल आणि पावसाची अनियमितता यांचा समावेश आहे.