scorecardresearch

विश्लेषण: काझीरंगातील गेंड्यांना धोका कोणापासून? आक्रमक वनस्पतींपासून!

पार्थेनियम, लँटाना अशा एकूण १८ आक्रमक वनस्पतीमुळे काझीरंगामधील गेंड्यांचा अधिवास धोक्यात आला आहे

Kaziranga rhinos
देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने काझिरंगा अभयारण्य (फोटो सौजन्य – PTI)

राखी चव्हाण

देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने काझिरंगा अभयारण्यातील गेंड्याच्या अधिवासाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक धोकादायक ठरणारी वनस्पती कुठपर्यंत पसरली आहे हे शोधून काढण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्याकरिता परवानगी मागितली आहे. त्यामुळे शिकार हेच एकमेव कारण गेंड्यांची संख्या कमी होण्यासाठी कारणीभूत नाही, तर धोकादायक वनस्पतींमुळे त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचल्यानेदेखील त्यांची संख्या कमी होत असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

काझीरंगाला धोका कशाचा?

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्रप्रकल्पाला अतिक्रमण, अवैध शिकार आणि वार्षिक पुराचा सामना करावा लागतो. पण त्याचबरोबर आता पार्थेनियम, लँटाना अशा एकूण १८ आक्रमक वनस्पतीमुळे काझीरंगामधील गेंड्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे श्री. सरमा यांनी आसामच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना या वनस्पती काढून टाकण्याची परवानगी मागितली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने इतर व्याघ्रप्रकल्पांमध्ये या आक्रमक वनस्पतींचे व्यवस्थापन हाती घेतले आहे, पण या प्रजाती इतक्या धोकादायक आहेत हे पहिल्यांदाच समोर आले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या एकशिंगी गेंड्यांचा आढळ धोक्यात आला आहे.

भारतातील वन्यप्राण्यांच्या अधिवासांना धोकादायक वनस्पती कोणत्या?

२०२०मधील जागतिक अभ्यासानुसार पार्थेनियम आणि लँटाना या वनस्पती भारतातील ४० पेक्षा अधिक व्याघ्रप्रकल्प व वन्यजीव अधिवासासाठी धोकादायक ठरल्या आहेत. पार्थेनियम हे १९५०च्या दशकात अमेरिकेतून आयात केलेल्या गव्हाच्या खेपेत दूषित पदार्थ म्हणून भारतात आले असे मानले जाते. तर लँटाना ब्रिटिशांनी दोन शतकांपूर्वी दक्षिण अमेरिकेतून शोभेच्या वनस्पती म्हणून आणल्या. मात्र, या दोन्ही वनस्पती आता धोकादायक ठरल्या आहेत. इपोमोई आणि मिमोसा या वनस्पतीदेखील आधी या यादीत होत्या, पण नंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यात आले.

पार्थेनियमचे परिसंस्थेवर काय दुष्परिणाम होतात?

निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) ‘एशियन रायनो’ तज्ज्ञ समूहाचे अध्यक्ष व अरण्यक या स्वयंसेवी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तालुकदार यांच्या मते पार्थेनियम ही अतिशय आक्रमक वनस्पती आहे, ज्यामुळे २०पेक्षा अधिक देशांमधील स्थानिक परिसंस्थेचे तंत्र बिघडले आहे. तर ऑस्ट्रेलियासारख्या देशात शेती उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. या वनस्पतीमुळे स्वदेशी वनस्पतीची वाढ थांबल्याचे लक्षात आले आहे.

आक्रमक वनस्पतींचा गेंड्यांवर काय परिणाम होतो ?

शिकार आणि इतर कारणांमुळे गेंड्यांची संख्या आधीच कमी झाली आहे आणि आता आसामच्या परिसंस्थेवर या आक्रमक वनस्पतीचा दुष्परिणाम दिसून येत आहे. ज्या वनस्पतींचे सेवन गेंडा करतो, त्यांना नष्ट करण्याचे काम या आक्रमक वनस्पती करत आहेत. परिणामी संरक्षित क्षेत्रातील गेंड्यांचे अन्न कमी होत आहे. मिमोसासारख्या वनस्पती काटेरी असतात. त्या गवताळ प्रदेशावर वेगाने वाढतात. त्यामुळे गेंड्यांना चरण्यासाठी समस्या निर्माण होते. आसाममधील पोबितोरा येथून गेंडे इतरत्र जाण्यासाठी या वनस्पती कारणीभूत असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेच्याच २०१५च्या अहवालात म्हटले आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained danger to kaziranga rhinos print exp 0622 abn