भक्ती बिसुरे
अमेरिकेत १९७३मध्ये गर्भपाताचा अधिकार घटनात्मक करण्यात आला. या गोष्टीला सुमारे ५० वर्ष लोटल्यानंतर मे २०२२ मध्ये आता अमेरिकन महिलांचा गर्भपाताचा अधिकार नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेत त्या शक्यतेने अक्षरश: वादळ उठवले. कारण जनक्षोभाला न जुमानता अमेरिकन महिलांचा गर्भपाताचा अधिकार घटनात्मक नसल्याचे ठरवले गेले. त्यामुळे गर्भपात बेकायदेशीर असल्याचा ठराव विविध राज्यांची कायदेमंडळे संमत करू शकतात. खरे तर केवळ गर्भपाताचा अधिकार रद्द झाला नसून सुरक्षित गर्भपाताचा अधिकार रद्द झाला आहे. त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आवश्यक का आहे, हेही विस्तृतपणे सांगण्यात आले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?

गर्भपात ही एक सोपी आणि सर्वसामान्य आरोग्य सेवा क्रिया आहे. दरवर्षी किमान १२.१ कोटी गर्भधारणा या अनपेक्षित असतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या प्रक्रियेतून गर्भपात करणे हे संपूर्ण सुरक्षित आहे. गर्भपात करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती लाभणे हा प्रत्येक महिलेचा अधिकार असल्याचे जागतिक आरोग्य संघटना स्पष्ट करते. अनपेक्षित गर्भधारणा झाली असता गर्भपात करण्यासाठी असुरक्षित पर्यायांचा अवलंब झाला तर, त्याचे दुष्परिणाम हव्या असलेल्या गर्भधारणेच्या काळात दिसू शकतात. त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. बहुतांश असुरक्षित गर्भपात हे विकसनशील देशांमध्येच होत असल्याचे निरीक्षण नोंदवून, गर्भवती महिलेला सुरक्षित वातावरणात गर्भपात करता येणे हा महिलेचा प्राथमिक अधिकार असल्याचेही जागतिक आरोग्य संघटना स्पष्ट करते.

विश्लेषण : कुठे ५० वर्षांपर्यंत शिक्षा तर कुठे परवानगी; जगभरातील गर्भपाताच्या कायद्यांची परिस्थिती काय?

४५ टक्के गर्भपात असुरक्षित?

जागतिक आरोग्य संघटनेने २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या अत्यावश्यक आरोग्य सेवा सूचीमध्ये गर्भपाताचा समावेश केला आहे. औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया यांचा वापर करून तज्ज्ञ व्यक्तीने केलेला गर्भपात ही सुरक्षित बाब असून महिलेच्या प्राथमिक अधिकाराचा तो भाग आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. सर्वसमावेशक आणि सुरक्षित गर्भपातानंतर घेण्याच्या काळजीबाबत पुरेशी माहिती महिलेला असणे आवश्यक आहे, असेही जागतिक आरोग्य संघटना आवर्जून नमूद करते. अनपेक्षित गर्भधारणा झालेल्या महिलेला सुरक्षित, वेळेवर, परवडणारे आणि नजीकच्या परिसरात, कोणत्याही भेदभाव आणि मानहानीशिवाय गर्भपाताची सोय उपलब्ध करून देण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटना देते. अशी सोय उपलब्ध नसल्यामुळे जगाच्या पाठीवर होणारे तब्बल ४५ टक्के गर्भपात असुरक्षित असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. २०१० ते २०१४ या काळातील परिस्थितीचा आढावा घेतला असता ४५ टक्के गर्भपात हे असुरक्षित होते. त्यापैकी सुमारे एक तृतीयांश गर्भपात हे अतिधोकादायक पद्धतीने, अप्रशिक्षित व्यक्तींच्या देखरेखीखाली केले गेले होते. ९७ टक्के असुरक्षित गर्भपात हे विकसनशील देशांमध्ये केले जातात. त्यांपैकी निम्म्याहून अधिक गर्भपात आशिया खंडात, प्रामुख्याने दक्षिण आणि मध्य आशियामध्ये होतात. लॅटिन अमेरिकन आणि आफ्रिकन देशांमध्ये होणाऱ्या चार गर्भपातांपैकी तीन गर्भपात धोकादायक परिस्थितीत होतात. आफ्रिकेत होणाऱ्या गर्भपातांपैकी निम्मे गर्भपात हे असुरक्षित असतात.

असुरक्षित गर्भपाताचे परिणाम काय?

गर्भपात सुरक्षित नसल्यास त्याचे अनेक गंभीर परिणाम महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतात. विकसित देशांमध्ये असुरक्षित गर्भपातामुळे एक लाख महिलांमागे ३० महिलांचा मृत्यू होतो. विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण २२० एवढे अधिक आहे. असुरक्षित गर्भपातादरम्यान उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे दरवर्षी सात लाख महिलांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागते. असुरक्षित गर्भपातामुळे अपूर्ण गर्भपात, अतिरेकी रक्तस्राव, गर्भाशयाला छिद्र पडणे, संसर्ग होणे, महिलेच्या अंतर्गत अवयवांना इजा होणे असे धोके संभवतात. त्यातून कायमस्वरूपी प्रकृतीच्या तक्रारी निर्माण होणे, हव्या असलेल्या गर्भधारणेदरम्यान गंभीर गुंतागुंत निर्माण होणे, असे धोके उद्भवतात. २००६मधील आकडेवारीनुसार असुरक्षित गर्भपातातून उद्भवणारी गुंतागुंत दूर करण्यासाठी विकसनशील देशांतील आरोग्य यंत्रणांना ५५.३ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च करावा लागतो. असुरक्षित गर्भपातातून येणाऱ्या अपंगत्वामुळे कित्येक कुटुंबांवर मिळून ९२.२ कोटी अमेरिकन डॉलरचे नुकसान सहन करण्याची वेळ आली. आधुनिक गर्भनिरोधक उपचार आणि सुरक्षित गर्भपातांचा अवलंब करून अर्थव्यवस्थेवरील हा ताण कमी करणे शक्य असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटना नोंदवते.

सुरक्षित गर्भपातासाठी काय धोरण असावे?

गर्भधारणेच्या प्राथमिक टप्प्यात गर्भवती महिला स्वत: सुरक्षित गर्भपात करु शकते. सुरक्षित गर्भपाताचा अधिकार महिलांना मिळावा यासाठी योग्य तरतुदी करणे हे आरोग्य यंत्रणांचे कर्तव्य आहे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. सुरक्षित गर्भपातासाठी पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी, गर्भपाताच्या स्वयंव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असून, गर्भपाताचे गुन्हेगारीकरण, अनिवार्य प्रतीक्षा कालावधी अशा कायद्यातील तरतुदी काढून टाकल्या जाव्यात, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये गर्भपाताबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यात यावी असेही जागतिक आरोग्य संघटना सुचवते. अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी आणि गर्भपाताबद्दल स्वायत्त निर्णय घेण्यासाठी महिलांमध्ये पुरेशी जनजागृती आणि हक्क आणि अधिकार यांबाबत जाणीव करुन देण्याची गरजही जागतिक आरोग्य संघटना अधोरेखित करते.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained how abortion law tweak in the us to have serious consequences in the world sgy
First published on: 10-07-2022 at 07:45 IST