खलिस्तानवादी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारताची गुप्तचर संस्था रॉच्या अधिकार्‍यानी अमेरिकेतील खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. त्याशिवाय, रॉचे तत्कालीन प्रमुख सामंतकुमार गोयल यांनी या मोहिमेला मंजुरी दिल्याचाही दावा यात करण्यात आला आहे. रॉच्या अधिकार्‍याबद्दल नेमकी कोणती माहिती समोर आली आहे? विक्रम यादव कोण आहेत? त्याबद्दल जाणून घेऊ या.

वॉशिंग्टन पोस्टनुसार, गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट रॉच्या अधिकार्‍याने रचला होता. त्यांचे नाव विक्रम यादव असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की, निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाने सीसी-१ (चीफ कॉन्स्पिरेटर) नावाच्या भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हे काम केले होते. सध्या निखिल गुप्ता प्राग येथील तुरुंगात आहे. त्याला प्रागमध्ये अटक करण्यात आल्याने अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला अमेरिकेकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : अमेरिकेने हत्येच्या कटाचा आरोप केल्यानंतर FBI प्रमुख भारत दौऱ्यावर का आले?

गेल्या वर्षी आरोपपत्रात अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, भारतीय सरकारी अधिकार्‍याने गुप्ता आणि इतरांसह मिळून एक वकील आणि राजकीय कार्यकर्त्याची हत्या करण्याचा कट रचला. आता वॉशिंग्टन पोस्टने वृत्त दिले आहे की, रॉचे अधिकारी विक्रम यादव यांनी गुरपतवंतसिंग पन्नू याचा न्यूयॉर्क येथील पत्ता काहींना फॉरवर्ड केला. वृत्तात असे नमूद करण्यात आले आहे की, विक्रम यादव आणि गुप्ता यांनी ऑनलाइन संभाषण करून पन्नूच्या हत्येची योजना आखली. त्यांच्या योजनेदरम्यान ते एका ड्रग्स आणि शस्त्राच्या व्यापार्‍याकडे पोहोचले होते. परंतु, ती व्यक्ती यूएस ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनची गुप्तचर होती. एकूणच पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा सहभाग असल्याचे अमेरिकेतील अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

भारताच्या गुप्तचर संस्थेचा हात?

वॉशिंग्टन पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आलेय की, पन्नूच्या हत्येच्या योजनेत यादव ही प्रमुख व्यक्ती होती. त्या वेळचे रॉचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांनी यादव यांना योजनेची परवानगी दिली होती. वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या घटनेचा अगदी जवळून तपास केला. त्यात असेही सांगण्यात आलेय की, मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कदाचित शीख कार्यकर्त्यांना मारण्याच्या योजनांची माहिती होती; परंतु अधिकाऱ्यांनी जोर दिला की याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात असेही म्हटले आहे की, परदेशातील शीख अतिरेक्यांचा धोका दूर करण्यासाठी गोयल यांच्यावर भारत सरकारचा दबाव होता.

कोण आहेत विक्रम यादव?

विक्रम यादव हे सीआरपीएफचे माजी अधिकारी असल्याचे वृत्त अमेरिकन वृत्तपत्राने दिले आहे. त्यांना रॉमध्ये कनिष्ठ अधिकार्‍याचे पद देण्याऐवजी त्यांच्यावर या महत्त्वाच्या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यादव यांच्याकडे प्रशिक्षण आणि कौशल्याचा अभाव होता, असेही यात सांगण्यात आले आहे.

खरे तर, भारतीय रॉ अधिकार्‍यांकडून अलीकडच्या काळात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका मानल्या जाणाऱ्या शिखांवर पाळत ठेवली जात आहे, असे वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना ऑस्ट्रेलिया, जर्मनी व ब्रिटनसह इतर देशांमध्ये अटक करण्यात आली किंवा फटकारण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले आहे. गोयलला ओळखणाऱ्या माजी भारतीय अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टलाही सांगितले आहे की, गोयल यांच्या परवानगीशिवाय उत्तर अमेरिकेत हत्येचा कट रचला जाऊच शकत नाही. विशेष म्हणजे गोयल यांचा परदेशात शीख अतिरेक्यांशी यापूर्वीही सामना झाला आहे.

अधिकारी काय म्हणाले?

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या दाव्यांवर गोयल आणि डोवाल या दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वॉशिंग्टन पोस्टचा वृत्तात प्रकाशित झाल्यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “हे सर्व दावे अवास्तव आहेत. गुन्हेगार, दहशतवादी आणि इतरांच्या नेटवर्कवर अमेरिकन सरकारने वर्तवलेल्या चिंतांचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती यावर चौकशी करीत आहे.”

दरम्यान, व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, अमेरिकेतील गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भारत गांभीर्याने घेत आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, तपास सुरू आहे आणि न्याय विभाग (डीओजे) तपास करीत आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचे सांगितले. कथित हत्येच्या कटाच्या चौकशी अहवालावर जीन-पियरे म्हणाले, “आम्ही त्याबद्दल खरोखरच सुसंगत आहोत. ही एक गंभीर बाब आहे आणि आम्ही ती खूप गांभीर्याने घेत आहोत. भारत सरकारने आम्हाला स्पष्टपणे सांगितले आहे की, ते हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत आणि त्यासंबंधी चौकशी करतील.”

‘रॉ’वरील आरोप

परदेशात होणाऱ्या हत्यांच्या प्रकरणात ‘रॉ’कडे बोट दाखविण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तातही असे म्हटले होते की, परदेशात राहणाऱ्या दहशतवाद्यांना संपविण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून भारत सरकारने पाकिस्तानमधील व्यक्तींची हत्या केली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांचा संदर्भ देणाऱ्या एका अहवालात खुलासा करण्यात आला आहे की, २०१९ नंतर भारत सरकारने ‘रॉ’च्या देखरेखीखाली या हत्या कशा केल्या गेल्या. सध्याच्या वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तातही असे म्हटले आहे की, पन्नूची हत्या ‘रॉ’च्या कारवाईचाच एक भाग आहे.