मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील बेगमगंजमध्ये एका वेगळ्याच प्रकारचा उपवास केला जात आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याला ‘डिजिटल फास्ट’ असं संबोधण्यात आलं आहे. हा उपवास करताना शेकडो जणांनी एक दिवसासाठी मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉपसह सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. मोबाईल फोनमुळे माणसाचे आयुष्य सुसह्य झाले आहे, पण आता मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक गॅझेटचं व्यसन जडत असल्याचं दिसत आहे. यापासून माणसाला काही काळ दूर करण्यासाठी मध्य प्रदेशात एक अनोखा उपक्रम सुरू असल्याचे समोर आले आहे.

जैन समाजाचं पर्युषण पर्व सुरू आहे. पर्युषण पर्व हा जैन समाजाकडून दरवर्षी आत्मशुद्धी, आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक विकासासाठी साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. समाजातील सदस्य उपवास करून पूजा आणि इतर धार्मिक विधी करून उत्सवात सहभागी होतात. आता या समाजातील लोकांनी हा ‘ई-उपवास’ सुरू केला आहे.

इंटरनेटशी निगडीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे किमान काही काळ (एक दिवस ते आठवडाभरापर्यंत) वापरण्यापासून माणसाला परावृत्त करणे, त्याला या व्यसनापासून दूर ठेवणे हा या मागचा हेतू आहे. ज्यामध्ये फोन, टीव्ही, टॅबलेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादींचा समावेश आहे. तर, या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहून निसर्गाशी संवाद साधता यावा, एकमेकांशी बोलणं व्हावं, नैसर्गिक जगाचा आनंद घेता यावा यासाठी हा प्रयत्न आहे. सायकॉलॉजी टुडे नुसार, ही संकल्पना सिलिकॉन व्हॅलीच्या फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्यांमध्ये तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

या उपक्रमात सुमारे १००० लोकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये ६०० लोकांनी एका दिवसासाठी आणि ४०० लोकांनी १० दिवसांसाठी त्यांच्या मोबाईलसह सर्व गॅझेटपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे त्यात १०० मुले आणि ३०० हून अधिक महिलांचाही समावेश आहे.

ई-फास्टिंगमुळे शरीराचे अनेक नुकसानांपासून रक्षण होते. सर्वसाधारणपणे, आपल्याला हवे असले तरीही आपण मोबाइल आणि इतर गॅझेट्सपासून स्वतःला वेगळे करू शकत नाही. परंतु जेव्हा आपण ई-फास्टिंगचा अवलंब करतो, तेव्हा आपल्याला या गॅझेट्सपासून स्वत:ला दूर ठेवणे सोपे होते.

मोबाईल फोन हे अनेक आजारांचे मूळ बनले आहे –

आजच्या मोबाईलच्या युगात ई-फास्टिंग खूप महत्त्वाचे आहे. कारण मोबाईल हे अनेक आजारांचे कारण बनले आहे. आज मोबाईलशी संबंधित एक आजार सामान्य झाला आहे ज्याला नोमोफोबिया म्हणतात. यावरून आपण अंदाज लावू शकता की मोबाईल ही आपल्या गरजेसोबतच मोठी समस्या बनली आहे. नोमोफोबियामध्ये मोबाइल सापडला नाही किंवा हरवला की खूप घबराट निर्माण होते. कधी कधी मोबाईलची रिंग वाजतेय असा भास होतो. या आजारात आपल्याला मोबाईलशी संबंधित अशी स्वप्ने पडू लागतात की आपला मोबाईल चोरीला गेला आहे किंवा पडला आहे. ज्यामुळे आपण घाबरून झोपेतून जागे होतो.