संदीप कदम

ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला, तरी त्याचा जास्त फटका पाकिस्तानला बसला आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीत पोहोचण्याचा रस्ता आणखीन खडतर झाला आहे. ‘अव्वल १२’ फेरीत त्यांचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. मात्र, या सामन्यांतही विजय मिळवणे पाकिस्तानसाठी पुरेसे नाही. त्यांची आगेकूच अन्य काही संघांच्या निकालांवरही अवलंबून असेल. उपांत्य फेरी प्रवेशाची नक्की काय गणिते आहे, याचा घेतलेला आढावा…

पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल?

पाकिस्तानला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभूत व्हावे लागले. पहिल्या लढतीत त्यांना भारताने चार गडी राखून नमवले. तर झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने एका धावेने लाजिरवाणी हार पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील त्यांची वाट बिकट झाली. रविवारी झालेल्या लढतीत त्यांनी नेदरलँड्सवर सहा गडी राखून विजय नोंदवला. मात्र, त्यानंतरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केले. त्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत. त्यांना आता दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दोन्ही संघांना पराभूत करण्यासह गटातील इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सकडून पराभूत झाल्यास किंवा भारताने उर्वरित दोनपैकी एक सामना गमावल्यास पाकिस्तानला संधी आहे. पाकिस्तानची निव्वळ धावगती भारताच्या जवळपास असली, तरीही त्यांना गुणांची कमाई करावी लागेल. तसेच उर्वरित दोन्ही सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकणेही महत्त्वाचे आहे.

विश्लेषण: राहुलचे अपयश, क्षेत्ररक्षणातील चुका महागात? आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पराभवामागे काय कारणे?

आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला उपांत्य फेरी गाठण्याची कितपत संधी?

भारताने आतापर्यंत पाकिस्तान आणि नेदरलँड्स संघांवर विजय मिळवले आहेत. तर त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत व्हावे लागले. भारताला बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध आपले उर्वरित सामने खेळायचे आहे. भारत हे दोन्ही सामने जिंकेल अशी अपेक्षा आहे. दोन सामन्यांपैकी एक सामना भारताने गमावल्यास त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवर, तसेच निव्वळ धावगतीवर अवलंबून राहावे लागू शकते. या सर्व गोष्टींपासून भारताला दूर राहायचे असेल, तर त्यांना सामने जिंकावे लागतील. तसेच एक सामना गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली तर निव्वळ धावगती चांगली ठेवण्यावर त्यांना अधिक भर द्यावा लागेल. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे चार गुण आहेत. भारताची निव्वळ धावगती +०.८४४ अशी आहे.

दक्षिण आफ्रिका सर्वात आधी उपांत्य फेरी का गाठू शकतो?

बांगलादेश आणि भारताविरुद्ध विजयाचे दोन गुण, तसेच झिम्बाब्वेविरुद्ध सामना रद्द झाल्याने त्यांना गुण विभागून मिळाला. त्यामुळे पाच गुणांसह आफ्रिका गुणतालिकेत आघाडीवर आहेत. बांगलादेशवर १०० हून अधिक धावांनी विजय मिळवल्याने त्यांची निव्वळ धावगतीही चांगली आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध त्यांना उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. एका सामन्यात मिळवलेला विजय आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचवण्यासाठी पुरेसा आहे. गुरुवारी आफ्रिकेचा सामना पाकिस्तानशी होणार असून या सामन्यात विजय मिळवत त्यांचा उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेश, झिम्बाब्वे, नेदरलँड्स संघांची सध्या स्थिती काय आहे?

बांगलादेशचे सामने भारत आणि पाकिस्तानसारख्या मजबूत संघांशी होणार आहेत. त्यांना आपले आव्हान कायम ठेवायचे असल्यास दोनपैकी एक सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यांनी दोन्ही सामने जिंकल्यास ते आगेकूच करतील. मात्र, दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या फरकाने सामना गमावल्याचा त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे विजय मिळवण्यासह आपली धावगती चांगली राखणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असेल. झिम्बाब्वे बुधवारी होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. पाकिस्तानविरुद्ध धक्कादायक निकालाची नोंद करत झिम्बाब्वेने सर्वांचे लक्ष वेधले होते, तर रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केल्यास त्यांना आगेकूच करण्याची संधी असेल. ते गुणतालिकेत तीन गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. सलग तीन सामन्यांत पराभूत झाल्यानंतर नेदरलँड्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, आपल्या उर्वरित सामन्यांत धक्कादायक निकालांची नोंद करत इतर संघांच्या वाटचालीत ते अडथळे निर्माण करू शकतील.