scorecardresearch

विश्लेषण : दिल्लीत डेंग्यू रुग्णांच्या झपाट्याने वाढीमुळे चिंतेची लाट; आपण डेंग्यूला कसं दूर ठेवू शकतो? वाचा सविस्तर…

मागील आठवड्यात दिल्लीत डेंग्यूची एकूण ४१२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत

विश्लेषण : दिल्लीत डेंग्यू रुग्णांच्या झपाट्याने वाढीमुळे चिंतेची लाट; आपण डेंग्यूला कसं दूर ठेवू शकतो? वाचा सविस्तर…
(संग्रहित छायाचित्र)

दिल्ली आणि एनसीआर भागात डेंग्यूचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढत आहे. बहुतांश रुग्ण हे कंबर दुखी, डोके दुखी आदी लक्षणं असलेले आढळून येत आहेत. मागील आठवड्यात दिल्लीत एकूण ४१२ प्रकरणे नोंदवली गेली, ही संख्या मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात नोंदवल्या गेलेल्या २१७ प्रकरणांपेक्षा दुप्पट आहे.

एमसीडीच्या रिपोर्टनुसार २१ ते २८ सप्टेंबरपर्यंत ४१२ नवीन प्रकरणं समोर आली होती, जी त्याच्या मागील आठड्यात आढळलेल्या १२९ रुग्ण संख्येच्या तुलनेत जवळपास चौपट आहेत. यावर्षी आजतागायत डेंग्यू रुग्ण संख्या ९३७ पर्यंत पोहचली आहे. जी मागील पाच वर्षांतील २८ सप्टेंबरपर्यंतच्या रुग्ण संख्येपेक्षा सर्वाधिक आहे.

डेंग्यूची नवीन लाट किती चिंताजनक आहे? –

डेंग्यूचा संसर्ग चार भिन्न सीरोटाइप्समुळे होतो. ज्यामध्ये DENV-1, DENV-2, DENV-3 आणि DENV-4 यांचा समावेश आहे. सध्या दिल्लीत DENV- 2 हा प्रकार आढळून येत आहे. अशी माहिती फरिदाबादमधील क्यूआरजी रुग्णालयाचे डॉ. संतोष कुमार अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की डेंग्यूचा DENV-2 हा सर्वाधिक विषाणूजन्य प्रकार मानला जातो आणि यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतो.

पावसानंतर बदलत्या हवामानामुळे डेंग्यूचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. दरवर्षी डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे आढळते.

डेंग्यू हा एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे होतो. यामध्ये रुग्णाला डोकेदुखी, तीव्र तापासोबत स्नायू आणि सांधेदुखीचा त्रास होतो. यासोबतच डेंग्यूच्या तापामुळे शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण देखील कमी होऊ लागते. जर प्लेटलेटची संख्या जास्तच कमी झाली की, रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत डेंग्यू तापाकडे थोडेसे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.

डेंग्यू तापाची लक्षणे? –

डेंग्यूचा डास चावल्यानंतर त्याची लक्षणे तीन ते चार दिवसांत दिसू लागतात. संसर्ग झाल्यानंतर, त्याची लक्षणे रुग्णामध्ये तीन दिवस ते चौदा दिवस टिकतात. डेंग्यू तापासोबत थंडी वाजून ताप येणे, खूप ताप येणे, तसेच घसा, डोके आणि सांधे दुखणे अशी लक्षणे आढळतात. यामुळे रुग्णाला अशक्तपणा देखील जाणवतो आणि काहीही खावेसे वाटत नाही. डेंग्यूबाधित रुग्णाच्या शरीरावर अनेक ठिकाणी गुलाबी रंगाचे पुरळ देखील उठतात. या सगळ्याशिवाय शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते.

प्लेटलेट्स कमी जास्तच कमी झाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.डेंग्यू तापामध्ये रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होऊ लागतात, जे जीवघेणे देखील ठरू शकतात. निरोगी शरीरात दीड ते दोन लाख प्लेटलेट्स असतात. जर ते एक लाखाच्या खाली आले तर त्वरित रुग्णालयात दाखल करावे. जर प्लेटलेटची संख्या २० हजारांपेक्षा कमी असेल तर डॉक्टर प्लेटलेट्स देखील देतात.

डेंग्यूचा प्रतिबंध कसा करायचा? –

डेंग्यू ताप डासांच्या चाव्याव्दारे पसरतो, त्यामुळे तुम्ही डासांपासून जितके दूर राहाल तितके तुमच्यासाठी चांगले होईल. तसेच, आपल्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. आजूबाजूला पाणी साचले तर ते मातीने भरावे. असे करणे शक्य नसेल तर त्यात रॉकेलचे थेंब टाकावे. पावसाळ्यात उघडे पाणी पिऊ नका. पाणी नेहमी झाकून ठेवा. रात्री झोपताना रोज मच्छरदाणी वापरा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या