अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल एक आठवडा ‘गायब’ असलेले चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग अखेर मंगळवारी ‘प्रकट’ झाले आणि आठवडाभर रंगलेल्या लष्करी बंडाच्या अफवांवर पडदा पडला. समाजमाध्यमांमध्ये या अफवेची जोरदार चर्चा झाली आणि त्यावर आधारित अनेक सिद्धांतही मांडले गेले. या सगळय़ाला काही आठवडय़ांवर आलेले कम्युनिस्ट पार्टीचे अधिवेशन, जिनपिंग यांनी पक्षांतर्गत विरोधकांचे सुरू केलेले खच्चीकरण आणि त्याच वेळी बीजिंगमध्ये घडलेल्या काही घटना हे जबाबदार ठरले. 

लष्करी बंडाची अफवा नेमकी काय होती?

चीनमध्ये लष्कराने बंड केले असून राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची चर्चा २४ सप्टेंबरला सुरू झाली. जेनिफर झेंग या अमेरिकेत राहणाऱ्या चिनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम ट्विटरवर एक चित्रफीत टाकली. यामध्ये लष्करी वाहने बीजिंगच्या दिशेने निघाल्याचा दावा करून लष्कराने राजधानी ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तवली. अमेरिकेत राहणारे चिनी लेखक गॉर्डन चँग यांनीही याला दुजोरा दिला.

जिनपिंग देशाबाहेर असताना कट?

शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी जिनपिंग उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये असताना बीजिंगमध्ये या उठावाचा कट शिजल्याचे सांगितले गेले. त्यांच्या अपरोक्ष चिनी कम्युनिस्ट पार्टीमधील त्यांचे लष्करी नेतृत्व काढून घेण्यात आले. याची कुणकुण लागताच समरकंदमधील रात्रीच्या मेजवानीला दांडी मारून ते घाईघाईने चीनला परतले, मात्र विमानतळावरच लष्कराने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले गेले. 

जिंताओ-जिआबाओंचे कारस्थान?

चीनचे माजी अध्यक्ष हु जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबाओ यांनी या कारस्थानाला आकार दिल्याचे सांगितले गेले. जिनपिंग समरकंदमध्ये असताना राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सेंट्रल गार्ड ब्युरोला आपल्या बाजूने वळवले आणि त्यानंतर हा कट अमलात आणल्याचे वृत्त एका परदेशी संकेतस्थळाने दिले. चिनी लष्करामध्ये जनरल असलेले ली किओिमग हे जिनपिंग यांची जागा घेतील, अशी चर्चाही रंगली.

अफवेला बळकटी कशामुळे मिळाली?

समाजमाध्यमांवर २४ तासांपेक्षा जास्त काळ या अफवांचे पेव फुटले असतानाही चीनकडून त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.  त्याच वेळी बीजिंगमधून अनेक उड्डाणे रद्द केल्याचे काही जणांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. विमानांच्या हालचाली दाखवणाऱ्या संकेतस्थळांवर बीजिंगचे आकाश त्या वेळी रिकामे दिसत होते. सुमारे ६० टक्के उड्डाणे रद्द झाल्याचे पर्यटनविषयक संकेतस्थळांवरून स्पष्ट झाले. लष्कराच्या हालचाली दिसू नयेत, यासाठी उड्डाणे रद्द केल्याचा संशय व्यक्त केला गेला. शिवाय या सगळय़ाला पार्श्वभूमी आहे ती रिपब्लिकन पक्षाच्या पंचवार्षिक अधिवेशनची..

सर्वसत्ताधीश होण्याचे जिनपिंग यांचे मनसुबे?

पुढील महिन्यात कम्युनिस्ट पार्टीचे अधिवेशन असून त्यात जिनपिंग यांना पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यायचे आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पक्षांतर्गत विरोधकांना संपवण्याच्या हालचाली सुरू केल्याची शंका उपस्थित होते. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आतापर्यंत किमान दोन माजी मंत्री आणि चार अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली. देशाची सत्ता फक्त आपल्याच हाती ठेवण्याचे त्यांचे हे मनसुबे यशस्वी होऊ नयेत, म्हणून पक्षातल्याच लोकांनी हे बंड घडवले असावे, यावर अनेकांचा विश्वास बसला तर नवल नाही.

बंडाची अफवाच असल्याचे कसे स्पष्ट झाले?

सर्वप्रथम बंडाची चर्चा सुरू होऊन चार-पाच दिवस उलटल्यानंतरही कोणतीच मोठी घडामोड चीनमध्ये घडली नाही. दुसरे म्हणजे चीनमधील कडक करोना नियमांमुळे जिनपिंग यांचे एक आठवडा विलगीकरण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. ही बाब अधिक विश्वासार्ह होती. त्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुढल्या महिन्यात पंचवार्षिक अधिवेशन होणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. शेवटी मंगळवारी एका संग्रहालयातील दालनाची पंतप्रधानांसह पाहणी करतानाचे जिनपिंग यांचे दृश्यच सरकारी वाहिनीवर झळकले आणि बंडाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

खरोखर अफवा की ताकदीची चाचपणी?

लष्कराच्या बंडाचे वृत्त निराधार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले असले तरी चीनच्या भिंतीपलीकडे नेमके काय घडते, हे कुणीच सांगू शकत नाही. कदाचित हे खरोखरच फसलेले बंड असू शकेल. आपली आणि जिनपिंग यांची ताकद अजमावण्यासाठी कुणीतरी ही मुद्दाम अफवा पेरलेली असू शकेल किंवा आपले स्थान अधिक  बळकट करण्यासाठी स्वत: जिनपिंग यांनीच हा बनाव रचला असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. लष्कराच्या पोलादी पडद्याआड काय घडेल, हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र सध्या तरी चीनमध्ये जिनपिंग यांचे स्थान भक्कम असून ते आणखी पाच वर्षांसाठी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी सिद्ध झाल्याचे दिसते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained rebellion rumor of a military china president jinping print exp 0922 ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST