विश्लेषण : युक्रेन युद्धात रशिया वापरणार आहे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त ठरलेलं शस्त्र Butterfly Mine

तळहातावर मावेल अशा आकाराचे हे एक भू सुरुंग आहे जे डोनबास आणि क्रामातोर्स्क भागाचे संरक्षण करण्याकरता रशिया वापरण्याच्या तयारीत असल्याची माहिती इंग्लंडच्या गुप्तचर विभागाने दिली आहे

विश्लेषण : युक्रेन युद्धात रशिया वापरणार आहे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त ठरलेलं शस्त्र Butterfly Mine
विश्लेषण : युक्रेन युद्धात रशिया वापरणार आहे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त ठरलेलं शस्त्र Butterfly Mine

युक्रेन-रशिया युद्धाला आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला असून रशिया अजुनही युक्रेनवर निर्णायक विजय मिळवू शकलेला नाही. जेमतेम अर्धा युक्रेनवर रशियाने ताबा मिळवला असून जिंकलेला भाग राखण्याचे रशियापुढे आव्हान आहे. असं असतांना रशिया काही ठिकाणी अत्यंत वादग्रस्त ठरलेले भू सुरुंग – Butterfly Mine वापरण्याच्या तयारीत असल्याची माहिती इंग्लडच्या गुप्तचर विभागाने दिली आहे.

गुप्तचर विभागाची काय माहिती आहे?

युक्रेनच्या पुर्व भागातीली डोनबास आणि क्रामातोर्स्क हे भाग जरी रशियाने जिंकले असले तरी तो भाग पुन्हा ताब्यात यावा यासाठी युक्रेनचे सैन्य हे स्थानिक नागरीकांसह पुन्हा एकदा प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा यापासून संरक्षण करण्यासाठी रशियाने या भागात Butterfly Mine चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती इंग्लंडच्या गुप्तचर विभागाची आहे. यामध्ये PFM-1 आणि PFM-1S असे दोन प्रकारचे भू सुरुंग वापरले जाणार आहेत. त्यामुळे या भागात जेवढी जीवितहानी आत्तापर्यंत झाली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

Butterfly Mine नेमकं काय आहेत?

तळहातावर मावतील अशा आकाराचे आणि फुलपाखराप्राणे दिसणारे हे भू-सुरुंग आहेत. यामध्ये फुलपाखराच्या पंखाप्रमाणे दिसणारी एक बाजू ही काहीशी मोठी पण पातळ असते असते तर दुसरी बाजू ही लहान पण तुलनेत जाडी असती. लहान बाजुमध्ये फ्युज असतो जो मध्य भागाशी जोडलेला असतो. याच भागामध्ये द्रवयुक्त स्फोटकही असतं. तर उंचावरुन खाली पडतांना मोठी बाजू ही एक प्रकारे काही काळ हवेत तरंगण्यास मदत करते.

Butterfly Mine हे PFM-1 आणि PFM-1S अशा दोन प्रकारात आहे. यापैकी PFM-1 प्रकारच्या भू सुरुंग जमिनीवर पडल्यावर त्याचा थेट स्फोट होतो, तर PFM-1S या भू सुरुंगामध्ये एक तासापासून ते ४० तासामध्ये वेळ निश्चित करत स्फोट होण्याची क्षमता आहे. याचे वजन ५ किलोपर्यंत असते तर जेमतेम ४० ग्रॅम वजन असलेले पण अत्यंत शक्तीशाली असं स्फोटकं यामध्ये असते.

हे धोकादायक का आहे?

Butterfly Mine चा रंग हिरवा असल्याने जमिनीवर किंवा हवेत ते एखाद्या फुलपाखराप्रमाणे दिसते. त्यामुळे ते ओळखणे हे कठिण जाते. हे शस्त्र साध्या हातानेच काय तर एखाद्या छोट्या तोफेतून, हेलिकॉप्टरमधून शेकडोंच्या संख्येने हव्या त्या ठिकाणी फेकता येते. थोडक्यात अगदी कमी कालवधीमध्ये हे शस्त्र युद्धभुमिवर हव्या त्या ठिकाणी पेरली जाऊ शकतात. या शस्त्रामुळे सैनिक किंवा नागरीक यांचा क्वचितच मृत्यु होण्याची जरी शक्यता असला तरी व्यक्ती जबर जखमी किंवा कायमचा जायबंदी करण्याची क्षमता यात आहे. ५ किलोपेक्षा जास्त वजनाचा दाब यावर जरी पडला तरी त्याचा स्फोट होतो. सर्वात म्हणजे हे निकामी करता येत नाही. विशेषतः जर नागरी वस्त्यांमध्ये अशा प्रकारची स्फोटकं वापरली तर त्यामुळे जायबंदी होणाऱ्यांची संख्या मोठी असू शकते.

अफगाणिस्तान युद्धात तेव्हाच्या सोव्हिएत रशियाने Butterfly Mine चा मुक्तहस्ते, मोठ्या प्रमाणात वापर केला होता. मुजाहिदीन विरोधात वापरलेल्या या शस्त्रामुळे एका अंदाजानुसार ३० हजार पेक्षा जास्त लोकं जखमी झाले होते, यामध्ये नागरीकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. विशेषतः एखाद्या खेळण्याप्रमाणे हे स्फोटक दिसत असल्याने काही लहान मुलेही जखमी झाली होती.

जीनेव्हा करारानुसार युद्धात अशा प्रकारची शस्त्रास्त्रांच्या वापरण्यास बंदी आहे. असं असतानाही रशियाकडून Butterfly Mine च्या संभाव्य वापरामुळे लांबलेले युक्रेन युद्ध पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : कल्याण-शीळ कोंडीचे दुखणे थांबणार कधी?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी