चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीमध्ये राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांची फेरनिवड झाल्यानंतर तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला होता आणि अखेर ते चीनचे तिऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. बीजिंग येथील ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी म्हटले की, जगाशिवाय चीनचा विकास होऊ शकत नाही आणि जगालाही चीनची आवश्यकता आहे. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आपली अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे आणि देशात सामाजिक स्थिरताही आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी आम्ही ठोस रणनीती तयार केली आहे.

याप्रसंगी जिनिपग यांनी आपल्या नव्या टीमचीही घोषणा केली. त्यांनी सर्व विरोधकांना हटवत आपल्या विश्वासू लोकांना यामध्ये स्थान दिले. मात्र यात कोणत्याही महिलेचा समावेश नाही. २५ वर्षानंतर पहिल्यांदा चीनच्या कम्युनिस्ट पार्टी पोलितब्यूरोमध्ये कोणतीही महिला नाही.या अगोदर सुन चुनलान पोलितब्यूरोमध्ये एकमेव सदस्य होत्या, ज्या आता निवृत्त झाल्या आहेत. चीन कम्युनिस्ट पार्टी(CCP) दावा करते की ते महिलांना बरोबरीचा हक्क देतात, मात्र वस्तूस्थिती याच्या उलट दिसत आहे.

स्थायी समितीच्या सात सदस्यांची घोषणा –

क्षी जिनपिग यांनी पोलितब्यूरोच्या स्थायी समितीच्या सात सदस्यांच्या नावांचीही घोषणा केली आहे. यामध्ये क्षी जिनपिग यांच्यासमवेत ली कियान्ग, झाओ लेजी, वांग हुनिंग, काई की, ली शी आणि डिंग शुशियांग यांच्या समावेश आहे. ली कियान्ग यांना नवीन पंतप्रधान बनवण्यात आले आहे. क्षी जिनपिग यांनी २२ ऑक्टोबर रोजी चीनचे तत्कालीन पंतप्रधान ली केकियांगला पक्षाच्या नेतृत्वावरून हटवले होते, त्यांच्योबर अन्य तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही हटवले गेले होते.

सदस्य कसे निवडले जातात? –

सीसीपीच्या बैठकीत पक्षाच्या सदस्यांनी नवीन केंद्रीय समितीसाठी मतदान केले. त्यात २०५ सदस्य असून त्यापैकी ११ महिला आहेत. ही समिती पॉलिट ब्यूरो सदस्यांची निवड करते. केंद्रीय समितीची बैठकीत पॉलिट ब्युरोचे २५ आणि स्थायी समितीचे सात सदस्य निवडले जातात.

दरम्यान, पंचवार्षिक अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना अचानक व्यासपीठावरून उतरवण्यात आले. ७९ वर्षांचे जिंताओ जिनिपग यांच्या शेजारीच बसले होते. त्यांना अचानक दोघांनी हाताला धरून खाली उतरवले. हे दोघे जण सुरक्षारक्षक असावेत असा अंदाज आहे. जिंताओ यांच्या वर्तनावरून त्यांची जाण्याची इच्छा नसावी असे दिसले. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हा प्रकार घडला. याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यांची तब्येत बिघडली की अन्य कारणाने त्यांना बाहेर काढले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.