scorecardresearch

Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

अनेकांनी पहिला डोस घेतला असून लस उपलब्ध नसल्याचे दुसरा डोस घेताना अडचणी येतायत

covishield and covaxin vaccination
(मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवलाय. दिवसोंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढताना असतानाच दुसरीकडे करोना प्रतिबंधक लस १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना देण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आलीय. मात्र असं असतानाही लसींचा तुटवडा असल्याने लस घेण्यात अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, ज्यामध्ये मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या नियमांबरोबरच लसीकरण हा करोनापासून सुरक्षित राहण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?

मात्र पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी अनेकजण स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लसींचा तुटवडा असल्याने दोन लसींमधील कालावधी चुकण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. याचसंदर्भात बंगळुरुमधील चनिंगहॅम रोडवरील फोर्टीस रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर के. एस. सतीश आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात.

लस घेतल्याने आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे विषाणू संसर्गाची शक्यता कमी होते. विषाणू आणि लस कशाप्रकराची आहे यावर दोन लसींमधील अंतर किती असते हे ठरतं. “कोव्हिड १९ लसींबद्दल बोलायचं झाल्यास संशोधनामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी एक डोस पुरेसा नाहीय असं दिसून आलं आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्त अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण होते,” असं डॉ. सतीश सांगतात.

नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

दोन डोस घेण्यामध्ये अंतर किती असावं?

लसी कशी आहे यावर हे ठरवलं जातं. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी अॅण्डीबॉडीज तयार व्हायला किती वेळ लागतो यावर दोन डोसांमधील अंतर किती असावं हे ठरवलं जातं. “प्रत्येक लसीचा हा कालावधी वेगाल असतो. कोव्हिशिल्डसाठी सहा ते आठ आठवडे हा योग्य वेळ असून तो अगदी १२ आठवड्यांपर्यंत जाऊ शकतो. कोव्हॅक्सिनच्या बाबतीत हा कालवाधी २८ दिवसांचा असतो,” असं डॉ. सतीश म्हणाले.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना काळात रुग्णालयांकडून पाठवला जाणारा SOS म्हणजे काय?, त्याचा अर्थ काय असतो?

“भारत सरकारने दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे केलं आहे. कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दुसऱ्या डोससाठी जेवढा उशीर केला जाईल तेवढा त्याचा अधिक फायदा होईल,” असं डॉ. अन्नदाते सांगतात. “आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेतला तर ७० टक्के रोगप्रतिकारशक्ती मिळते. १२ आठवड्यांनी घेतला तर ९० टक्के रोगप्रतिकारशक्ती मिळते,” असंही डॉ. अन्नदातेंनी स्पष्ट केलं.

कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर किती असू शकतं याबद्दल बोलताना डॉ. अन्नदाते यांनी, “कोवॅक्सिनचा डोस लांबवण्याची मूभा नाहीय. कारण कोव्हिशिल्ड ही लाइव्ह म्हणजेच जिवंत लस आहे तर कोवॅक्सिन ही डेड म्हणजेच मृत लस आहे. कोवॅक्सिनला दुसरा डोस चार आठवड्यांनीच घ्यावा लागतो,” असं सांगितलं.

दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय? असं झाल्यास काही दुष्परिणाम दिसतो का किंवा पहिल्या लसीचा परिणाम कमी होतो का?

दोन डोसमधील नियोजित कालावधीमध्येच लसीकरण करुन घेणं फायद्याचं ठरतं. शरीरामध्ये योग्य प्रकारे अॅण्टीबॉडी तयार व्हाव्यात म्हणून कंपन्यांनी दिलेल्या निर्देशांनुसारच लस घ्यावी. मात्र दोन लसींमधील कालावधी वाढला तरी त्याचा काहीही दुष्परिणाम होत नाही. “नियोजित वेळेपेक्षा दोन किंवा तीन आठवड्यांनी हा कालावधी वाढला तर अॅण्टीबॉडीचा विषाणूला असणारा प्रतिकार अपेक्षेइतका शक्तीशाली नसतो,” असं डॉ. सतीश यांनी सांगितलं.  मात्र दोन डोसमध्ये अंतर पडल्याने पुन्हा पहिल्यापासून लसीकरणाची पूर्ण सायकल सुरु करण्याची गरज नसते. “दोन डोसमध्ये अंतर पडलं तरी लवकरात लवकर दुसरा डोस घेण्याचा प्रयत्न करा,” असं डॉ. सतीश सांगतात.

नक्की वाचा >> समजून घ्या : प्राणवायू म्हणून ओळखला जाणारा ‘मेडिकल ऑक्सिजन’ घातक कसा ठरु शकतो?

लसीकरण शास्त्रानुसार पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी कितीही उशीर झाला तरी संपूर्ण लसीकरण प्रक्रिया पुन्हा केली जाऊ नये, असा सल्ला डॉ. अन्नदातेंनी दिलाय. दोन डोसमध्ये कितीही अंतर असलं किंवा उशीर झाला तरी पहिल्या डोसचा परिणाम तुमच्या शरीरावर झाला असल्याने संपूर्ण लसीकरण परत करण्याची गरज नसते. पहिल्या डोसनंतर नियोजित कालावधी उलटून गेल्यावर लवकरात लवकर डोस घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं डॉ. अन्नदाते म्हणाले. लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होत नसले तरी पुढचा डोस लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-05-2021 at 18:05 IST