जर तुम्ही एखाद्या दूरवरच्या प्रवासाला निघालात आणि रेल्वेतून अचानक उतरत असाल तर, पुन्हा प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तिकीट घ्यावेच लागते. यामुळे प्रवाशांना अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवाशांची ही अडचण आता दूर होणार आहे, कारण भारतीय रेल्वे आता ‘Break Journey Rule’ घेऊन आली आहे. ज्याद्वारे तुम्ही परत तिकीट न काढता तुमचा प्रवास पुन्हा सुरू करू शकतात. जाणून घेऊयात हा नियम नेमका काय आहे?
खरंतर रेल्वेच्या या विशेष सुविधेबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. कारण, सर्वसाधारणपणे लोकांना हेच माहीत आहे की, ज्या स्टेशनवर तुम्ही उतरलात तिथून पुढे प्रवास सुरू करण्यासाठी तुम्हाला परत तिकीट खरेदी करावे लागते.
नियमासाठी अट काय? –
रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जर एखाद्या प्रवाशांने लांबच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षित केले असेल, तर त्याला मध्येच एखाद्या रेल्वेस्टेशनवर उतरण्यास आणि दोन दिवसांच्या आतमध्ये पुन्हा रेल्वेने पुढील प्रवासाला सुरुवात करण्याची सुविधा मिळते. मात्र यासाठी काही ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत संबंधित प्रवाशाला फार त्रास होत नाही.
Break Journey Rule नेमका काय आहे? –
जर एखाद्या प्रवाशाचे तिकीटाचे आरक्षण हे ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी असेल, तर तो प्रवासी प्रवासादरम्यान एका स्टेशनवर उतरून दोन दिवसांसाठी आपला प्रवास थांबवू शकतो. मात्र या सुविधेचा लाभ तेव्हा घेता येतो, जेव्हा प्रवासाच्या सुरुवातीपासून ५०० किलोमीटरचे अंतर पूर्ण झालेले असेल.
याशिवाय आपले तिकीट हे एक हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरासाठीचे असेल, तर रेल्वे तुम्हाला संपूर्ण प्रवासात दोनदा आपला प्रवास थांबवण्याची सुविधा देते. अशावेळी तुमच्याकडे दोनदा दोन दिवस थांबण्याचा पर्याय असतो.
ही बाब लक्षात ठेवावी लागणार –
रेल्वेची ही सुविधा अतिशय चांगली आहे, मात्र या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर एखाध्या प्रवाशाला आपला प्रवास मध्येच थांबवायचा असेल आणि नंतर पुढील प्रवास त्याच तिकीटावर करायचा असेल, तर त्याला ही माहिती स्टेशन व्यवस्थापक किंवा तिकीट कलेक्टरला द्यावी लागेल आणि त्यांच्या परवानगीनंतरच प्रवास थांबवता येईल.
खरंतर, रेल्वे नियमानुसार प्रवाशांना आपला प्रवास थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, ही माहिती स्टेशन व्यवस्थापक आणि टीटीईला देणे आवश्यक असते. असे केल्यामुळे तुम्हाला पुन्हा तुमचा प्रवास सुरू करण्यास कुठलीही अडचण येणार नाही.