होम आयसोलेशनमध्ये राहून गोळ्या-औषधांच्या मदतीने करोनावर मात करणाऱ्या अनेकांना आता वेगळाच त्रास जाणवू लागला आहे. रुग्णालयामध्ये दाखल न होता घरीच उपचार घेऊन करोनावर मात करणाऱ्यांना आयसोलेशनच्या कालावधीनंतरही करोनाची लक्षणं दिसत आहेत. यामध्ये सौम्य स्वरुपाचा ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होते, खोकला, छातीत भरुन येणे, गरगरल्यासारखं होणं, सांधेदुखी, डोकेदुखी, इन्सोमेनिया यासारख्या लक्षणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच पहिल्या डोसनंतर करोनाचा संसर्ग झालेल्या आणि त्यामधून बऱ्या झालेल्या व्यक्तींना करोनावर मात केल्यानंतर किमान सहा ते आठ आठवडे करोनाची लस घेता येत नाही. त्यामुळेच त्यांनाही या लक्षणांचा त्रास होताना दिसत आहे. या पद्धतीच्या त्रासाला लाँग कोव्हिड असं म्हणतात. मात्र लाँग कोव्हिड म्हणजे नक्की काय? या समस्येकडे डॉक्टर कसं पाहतात याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?

नक्की हा प्रकार आहे तरी काय?

करोनामुक्तीनंतरही करोनाची वर उल्लेख केलेली लक्षणं रुग्णांमध्ये चार ते १२ आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये हा कालावधी अधिक असू शकतो, असं डॉक्टर सांगतात. या लक्षणांमुळे अनेकदा करोनावर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा आपल्याला करोनाचा संसर्ग झाला की काय असं वाटू लागतं. या अशापद्धतीच्या आजारपणाला पोस्ट कोव्हिड सिंड्रोम किंवा लाँग कोव्हिड असं म्हटलं जात. अशा प्रकरणांमध्ये रुग्णाने आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं तज्ज्ञ सुचवतात.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?

हा त्रास नक्की कशामुळे होतो?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार करोनाचा परिणाम केवळ श्वसनयंत्रणेवर होत नाही तर इतर अनेक गंभीर परिणाम करोना विषाणूमुळे होतात. शरीरामधील अनेक अवयवांवर करोनाचा परिणाम होतो. यामध्ये फुफ्फुसं, यकृत, हृदय, मज्जासंस्था, मूत्रपिंड यासारख्या अवयवांचा समावेश असतो. सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना करोना संसर्गाचा आणखीन त्रास होण्याची शक्यता असते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याच्या कोणत्या अवयवांवर किती परिणाम होतो याचं प्रमाण वेगवेगळं असतं. “करोनामुक्त झालेल्या अनेकांना लाँग कोव्हिडचा त्रास होताना दिसत आहे. लाँग कोव्हिडचा त्रास तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ जाणवू शकतो. करोना विषाणूचा परिणाम झाल्यानंतर शरीरातील अवयवांना पुन्हा आधीप्रमाणे काम करण्यासाठी म्हणजेच रिकव्हरीसाठी थोडा वेळ लागतो. ही रिकव्हरी पूर्ण होत नाही तोपर्यंत अशी लक्षणं दिसत राहतात,” असं सिव्हील सर्जन असणाऱ्या डॉ. अजय बग्गा यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं

अ‍ॅक्टीव्ह लाइफस्टाइलमुळे यावर सहज मात करता येते का?

अ‍ॅक्टीव्ह लाइफस्टाइलमुळे यावर मात करण्यासाठी नक्कीच मदत होते असं डॉक्टर सांगतात. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाँग कोव्हिडचा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. लस घेतल्यास लाँग कोव्हिडच्या काळातील लक्षणं कमी होऊ शकतात असं डॉक्टर सांगतात. मात्र करोनामुक्त झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनंतरच लस घेता येत असल्याचंही डॉक्टरांनी अधोरेखित केलं आहे.

लाँग कोव्हिडचा त्रास होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचं ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्सने म्हटलं आहे. या केंद्रांमध्ये श्वसनाचे व्यायाम, ठराविक अंतर चालणे यासारख्या गोष्टींच्या मदतीने फुफ्फुसांची क्षमता पुन्हा आधीसारखी करण्यास मदत होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. “करोनावर मात केलेल्यांना त्या आजारामधून पूर्णपणे बाहेर आणणे आणि त्यांना आरोग्यविषय गोष्टींसाठी प्रेरणा देणं गरजेचं आहे. करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी लाँग कोव्हिड किंवा करोनानंतर जाणवणाऱ्या लक्षणांबद्दल फार विचार करणं फायद्याचं नाहीय. म्हणून त्यांनी व्यायाम आणि इतर गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे,” असं जालंदरमधील डॉक्टर ए. कपूर यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

“अ‍ॅक्टीव्ह लाइफस्टाइलमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा व्यायामाचा समावेश असतो. यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. व्यायाम करणाऱ्यांमधील रोगप्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच त्यांची ताकदही वाढते. करोनामुळे या दोन्ही गोष्टींवर झालेला परिणाम भरुन काढण्यासाठी व्यायाम फायद्याचा ठरतो,” असं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंजाब विभागाचे प्रमुख डॉ. परमजित मान यांनी सांगितलं. व्यायाम केल्याने मानसिक आरोग्यही उत्तम राहण्यासाठी मदत होते असंही डॉ. मान म्हणाले.

इनअ‍ॅक्टीव्ह किंवा बसून काम करण्याच्या लाइफस्टाइलमुळे नकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती वाढते जी लाँग कोव्हिडमध्ये धोकादायक ठरु शकते. योग्य आहार (ज्यामध्ये पालेभाज्या, फळं आणि जंक फूडऐवजी उत्तम घरगुती पद्धतीचं जेवणाचा समावेश असतो), व्यायाम, पुरेशी झोप या गोष्टींची काळजी करोनामधून बरं झाल्यानंतरही घेणं गरजेचं आहे, असं डॉक्टर्स सांगतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is long covid and how can one tackle it scsg
First published on: 01-06-2021 at 09:04 IST