इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात ट्विटरच्या अधिग्रहणाचा व्यवहार पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे ट्विटरची मालकी आली. यानंतर त्यांनी सर्वप्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आणि कायदेशीर व्यवहार व धोरण प्रमुख विजया गड्डे यांना कामावरून कमी करून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. मात्र तरीही मस्क यांना त्यांच्या कंपनीशी निगडित महत्त्वाचे निर्णय घेताना एका भारतीयाचीच मदत घ्यावी लागत आहे. चेन्नईस्थित टेक्नोलॉजिस्ट आणि गुंतवणुकदार श्रीराम कृष्णन हे सध्या मस्क यांना मदत करत आहेत, जे सध्या 16Z मध्ये भागीदार आहेत. जाणून घेऊयात श्रीराम कृष्णन यांच्याविषयी अधिक माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीराम कृष्णन यांनी एक ट्वीट केलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘अनेक जणांना याची माहिती आहे की मी इलॉन मस्क यांनी ट्विटर चालवण्यासाठी तात्पुरती मदत करत आहे. ही अतिशय महत्त्वाची कंपनी असून जगावर तिचा मोठा प्रभाव पडू शकतो आणि ही गोष्ट मस्क करू शकतात, असं मला वाटतं.’

चेन्नईमध्येच निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले –

श्रीराम कृष्णन हे चेन्नईमध्ये वाढलेले आहेत. तिथे त्यांचा जन्म एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील विमा कंपनीत काम करत होते आणि आई गृहिणी होती. श्रीराम यांची त्यांच्या पत्नीशी पहिल्यांदा भेटही विशेष होती. २००२ मध्ये दोघेजण याहू मेंसेंजरवर भेटले होते. २००५ मध्ये कृष्णन अमेरिकेतील सीएटल येथे गेले आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम सुरू केले, तेव्हा ते २० वर्षांचे होते.

अनेक टीमचे नेतृत्व केले आहे –

मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केलेले आहेत आणि श्रीराम कृष्णन यांना त्यांच्या अगोदरच्या अनुभवावरून वरिष्ठ पदासाठी प्राधान्य दिले जाऊ शकते. कृष्णन हे एक टेक्नोलॉजिस्ट आणि अभियंता आहेत. ते त्या स्टार्टअप्समध्ये गुंतणूक करतात, जे नुकतेच सुरू होत आहेत. आतापर्यंत कृष्णन यांनी अशा एकूण २३ गुंतवणुकी केल्या आहेत. त्यांची सर्वात अलीकडील गुंतवणूक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी Lasso Labs मध्ये होती, जिथे Lasso Labs ने ४.२ दशलक्ष डॉलर निधी उभारला. याअगोदर कृष्णन यांनी ट्विटर, मेटा आणि मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट आणि इंजिनिअरिंग टीमचे नेतृत्व केलेले आहे. याशिवाय ते बिट्सकी, हॉपिन आणि पॉलीवर्कच्या मंडळावरही आहेत.

ट्वीटरसोबत जुनं नातं –

16Z मध्ये येण्यापूर्वी श्रीराम कृष्णन ट्विटरसोबतच होते. येथे त्यांनी टाइमलाइन, नवीन युजर्सचा अनुभव, शोध आणि प्रेक्षक वाढीवर काम केले. त्या अगोदरही त्यांनी स्नॅप आणि फेसबुकसाठी विविध मोबाइल अॅण्ड प्रॉडक्ट्सवर काम केले आहे. यामध्ये स्नॅपचा डायरेक्ट रिस्पॉन्स अॅड्स बिझनेस आणि फेसबुक ऑडियन्स नेटवर्क यांचा समावेश आहे.

श्रीराम यांनी आपले करिअर मायक्रोसॉफ्टमधून सुरू केले होते. तिथे त्यांनी विंडोज अझूरशी संबंधित अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले होते. प्रोग्रॅमिंग विंडोज अझूर या पुस्तकाचे ते लेखकही आहेत. एवढच नाही तर श्रीराम यांनी पत्नी आरती राममूर्ती यांच्यासोबत एक पॉडकास्ट/ यूट्यूब चॅनलही होस्ट केले आहे.

मस्क यांच्याशी संबंध कसा आला –

कृष्णन आणि राममूर्ती यांच्या क्लबहाउसवरील प्रभावशाली कार्यक्रम ‘द गुड टाईम्स शो’ यामध्ये फेब्रुवारी २०२१ मध्ये मस्क दिसले होते. कॅलिफोर्नियामधील हॉथॉर्न येथील SpaceX मुख्यालयाच्या भेटीदरम्यान ते त्यांना आधी भेटले होते. या शोमध्ये मार्क झुकरबर्ग आणि दिवगंत फॅशन डिझायनर व्हर्जिल अबलोह हेही दिसले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained who is sriram krishnan who helped elon musk in twitter acquisition msr
First published on: 01-11-2022 at 17:31 IST