अन्वय सावंत

इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणारी प्रीमियर लीग ही जगातील सर्वांत लोकप्रिय फुटबॉल लीग मानली जाते. या लीगचा भाग असलेल्या चेल्सी संघाची व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात नामांकित आणि मौल्यवान क्लबमध्ये गणना होते. मात्र, १९०५मध्ये अस्तित्वात आलेल्या चेल्सी संघाचा खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ हा २००३ वर्षापासून सुरू झाला. याच वर्षी रशियन उद्योजक रोमन अब्रामोव्हिच यांनी १.४ अब्ज पौंडला चेल्सी संघाचे मालकी हक्क मिळवले. त्यानंतर चेल्सीने इंग्लंड आणि युरोपातील विविध स्पर्धांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. मात्र, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता विविध समीकरणे बदलली असून रशियन अब्रामोव्हिच यांना चेल्सी संघ विकावा लागला आहे. परंतु हे नक्की का घडले आणि आता चेल्सीचे नवे मालक कोण असणार, याचा घेतलेला आढावा.

candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

अब्रामोव्हिच यांना चेल्सी संघाचे मालकी हक्क का सोडावे लागले?

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अब्रामोव्हिच यांनी २ मार्च रोजी चेल्सी संघ विकण्याचा निर्णय घेतला. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अब्रामोव्हिच यांच्या इंग्लंडमधील मालमत्ता गोठवण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. अब्रामोव्हिच यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याची कायमच चर्चा केली जाते. ब्रिटिश सरकारने अब्रामोव्हिच यांच्या मालमत्ता गोठवल्यामुळे त्यांना चेल्सी संघाची विक्री करता येणार नव्हती. तसेच चेल्सीला तिकीटे आणि वस्तूंची विक्री करण्यावरही निर्बंध घालण्यात आले. परंतु, चेल्सी संघाला सामने खेळता यावेत यासाठी सरकारने ‘विशेष परवाना’ दिला आणि केवळ हंगामी तिकीट असलेल्या चाहत्यांनाच हे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर इंग्लंड सरकारने अब्रमोव्हिच यांना चेल्सी संघाचे मालकी हक्क लवकरात लवकर सोडण्याचे आदेश दिले. आता दोन महिन्यांच्या वाटाघाटींनंतर पश्चिम लंडनमधील चेल्सी क्लब विकला गेला.

कोण आहेत अब्रामोव्हिच? त्यांच्या कार्यकाळात कशी होती चेल्सीची कामगिरी?

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या अन्य रशियन उद्योजकांप्रमाणे अब्रामोव्हिच यांनी तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारातून आपले आर्थिक साम्राज्य उभे केल्याचे म्हटले जाते. तसेच त्यांनी रशियाच्या पूर्वेकडील ‘स्वायत्त’ प्रदेश चुकोत्काचे गव्हर्नर म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी २००३मध्ये ब्रिटिश उद्योजक केन बेट्स यांच्याकडून चेल्सी संघ खरेदी केला. त्यांच्या १९ वर्षांच्या कार्यकाळात चेल्सीने तब्बल २१ चषकांवर आपले नाव कोरले. चेल्सीने २००३ वर्षानंतर पाच वेळा प्रीमियर लीग, दोन वेळा चॅम्पियन्स लीग, पाच वेळा एफए चषक, तीन वेळा लीग चषक, दोन वेळा युरोपा लीग, दोन वेळा कम्युनिटी शिल्ड तसेच प्रत्येकी एकदा ‘युएफा’ सुपर चषक आणि ‘फिफा’ क्लब विश्वचषक या फुटबॉल स्पर्धा जिंकल्या. तसेच चेल्सीला युरोपीय स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळावे, यासाठी अब्रामोव्हिच यांनी आर्थिक नुकसानही सहन केले. त्यांनी चेल्सीला १.५ अब्ज पौंडचे व्याजमुक्त कर्जही दिले आणि या संघाची विक्री करताना नव्या मालकांना या कर्जाची परतफेड करावी लागणार नसल्याचे स्पष्ट केले. 

चेल्सीचे नवे मालक कोण?

चेल्सी क्लबची मालकी आता अमेरिकन उद्योजक टॉड बोएली यांच्या समूहाने मिळवली आहे. बोएली हे एल्ड्रिज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच बोएली हे अमेरिकेतील बेसबॉल संघ लॉस एंजलिस डॉजर्स, बास्केटबॉल संघ लॉस एंजलिस लेकर्स आणि महिला बास्केटबॉल संघ लॉस एंजलिस स्पार्क्स यांचे मालकी हक्क असलेल्या कंपनीचे भागधारकही आहेत. त्यांनी क्लियरलेक कॅपिटल कंपनी, रियल इस्टेट व्यावसायिक जोनाथन गोल्डस्टीन, स्विस अब्जाधीश हॅन्सयोर्ग वाइस आणि गुगेनहाइमम पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क वॉल्टर यांच्यासोबत मिळून चेल्सी संघ खरेदी केला आहे.

बोएहली यांच्या समूहाने किती किमतीत चेल्सी संघ खरेदी केला?

‘फिफा’ क्लब विश्वचषक विजेत्या आणि २०२१मधील चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सी संघाची विक्री २.५ अब्ज पौंडला (३.१ अब्ज डॉलर) करण्यात आली आहे. जागतिक संघविक्रीमधील हा विक्रमी आकडा मानला जात आहे. या विक्रीतून अब्रामोव्हिच यांना कोणताही फायदा होणार नाही. रशिया-युक्रेन युद्धात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी कार्यरत संस्थांना या व्यवहारातून निधी द्यावा, असा पर्याय अब्रामोव्हिच यांनी सुचवला आहे.