शुक्रवारची सकाळ ही जपानसह भारतासाठीही धक्कादायक ठरली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी नारा शहरात एका रॅलीदरम्यान हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचवता आले नाही. जपानच्या एनएचके वर्ल्ड रेडिओने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ते शुक्रवारी सकाळी पश्चिम जपानमधील नारा शहरात एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यादरम्यान त्याच्या अगदी जवळ आल्यावर हल्लेखोराने त्याच्यावर एकापाठोपाठ दोन गोळ्या झाडल्या.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

शिंजो आबे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यात त्यांच्या छातीत गोळी लागली होती. शिंजोवरील हल्ल्यामुळे केवळ जपानच नाही तर भारतालाही दुःख झाले आहे. संपूर्ण भारत त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता. आबे भारतीयांच्या पसंतीस उतरण्यामागे एक मोठे कारण आहे. आबे यांचे भारताशी विशेष संबंध होते. जपान आणि भारत यांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. योग, सिनेमा, खाद्यपदार्थ याबरोबरच भारतीय संस्कृतीचेही ते खुलेपणाने कौतुक करत होते. भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थ जपानमध्ये किती लोकप्रिय आहेत हेही शिंजो यांनी सांगितले होते. शिंजो यांच्या कार्यकाळात जपानचे भारतासोबतचे वेगळ्या संबंध उंचीवर गेले. भारताशी घनिष्ठ संबंधांचे ते पुरस्कर्ते राहिले आहेत. यामुळे २०२१ मध्ये भारताने त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता.

Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; तीन तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

शिंजो आबे कोण होते?

शिंजो आबे हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते. शिंजो आबे यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५४ रोजी जपानची राजधानी टोक्यो येथे झाला. शिंजो आबे हे त्यांच्या कुटुंबातील राजकारणात सक्रिय असणारे तिसऱ्या पिढीचे नेते होते. त्यांचे वडील शिंतारा आबे यांच्या व्यतिरिक्त त्यांचे आजोबा कोन आबे हे देखील जपानचे ज्येष्ठ राजकारणी होते. आबे यांचे पंजोबा म्हणजेच त्यांच्या आजोबांचे वडील योशिमा ओशिमा हे इम्पीरियल जपान आर्मीमध्ये जनरल म्हणून तैनात होते. शिंजो आबे यांची आई योको किशी १९५७ ते १९६९ या काळात पंतप्रधान असलेल्या नोबू किशी यांची मुलगी आहे.

पाहा व्हिडीओ –

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी सर्वाधिक काळ हे पद भूषवले आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारत आणि जपानमधील संबंध अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले. भारत आणि जपानमध्ये यापूर्वीही चांगली मैत्री होती, मात्र शिंजो आबे यांनी त्यांच्या कार्यकाळात या मैत्रीत भर घातली. यामुळेच गेल्या वर्षी भारताने त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मविभूषणने सन्मानित केले होते. जपानने भारतात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले आहेत. देशातील मेट्रो प्रकल्पात जपाननेही मोठे योगदान दिले आहे.

शिंजो आबे हे जपानची राष्ट्रीय सुरक्षा, तांत्रिक विकास आणि इतर देशांसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. शिंजो आबे यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही उत्तम काम केले. यामुळेच त्यांना एकापाठोपाठ एक सलग सहा निवडणुका जिंकता आल्या. आपल्या परराष्ट्र धोरणाच्या जोरावर शिंजो आबे यांनी शेजारील देशांशी समतोल संबंध राखले, त्यानंतर चीन आणि अमेरिकेसारख्या महासत्तांशी जपानचे संबंध सुधारण्याचा पवित्रा घेतला.

PHOTOS: भाषण, गोळ्यांचा आवाज, धूर अन् धावपळ…; शिंजो आबेंच्या हल्लेखोराला पकडलं ‘तो’ क्षण

भारतासोबत खास संबंध

शिंजो आबे हे भारतासाठी अतिशय खास नेते होते. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या बाजूने उभे राहणे असो किंवा संकटकाळात भारताला मदत करणे असो, शिंजो आबे यांच्या नेतृत्वाखाली जपानने नेहमीच भारताला साथ दिली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भागीदारीसह शिंजो आबे यांनी भारत-जपान संबंधांना नव्या उंचीवर नेले. शिंजो आबे यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताला भेट दिल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा दिली.

शिंजो आबे हे २०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेले जपानचे पहिले पंतप्रधान होते. यावरून त्यांचे भारताशी असलेले सखोल नाते दिसून येते. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना भारतासोबत चांगले संबंध हवे होते. भारतातील यूपीए सरकार असो किंवा एनडीएचे असो, जपानशी भारताचे संबंध वाढतच गेले, याचे कारण हेच होते.

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदी यांची मैत्री

भारताचे पंतप्रधान होण्याच्या आधीपासून नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांची मैत्री होती. २००७ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना शिंजो आबेंना पहिल्यांदा भेटले. यानंतर हे दोन्ही नेते २०१२ मध्ये भेटले होते. २६ जानेवारी २०१४ रोजी जेव्हा शिंजो आबे प्रजासत्ताक दिनी विशेष पाहुणे म्हणून आले होते. परंतु प्रोटोकॉलनुसार ते पंतप्रधान मोदींना भेटू शकले नाहीत, तेव्हा पंतप्रधान मोदी शिंजो आबे यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन विचारपूस केली होती. त्याच वेळी, या दोन्ही नेत्यांनी नेहमीच हे सुनिश्चित केले की दोन्ही नेत्यांचे जगाबद्दलचे मत सारखेच राहील जेणेकरून दोन्ही मित्र देशांच्या विकासात कोणताही अडथळा येऊ नये. शिंजो आबे यांच्या कार्यकाळातच जपानने भारताला अणुशक्ती असलेला देश म्हणून स्वीकारले. भारत आणि जपान यांच्यात २०१६ मध्ये नागरी अणु करार झाला होता.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; PM मोदींसोबत होते मैत्रीपूर्ण संबंध, पाहा PHOTOS

आबे यांनी पंतप्रधानपद का सोडले होते?

शिंजो आबे हे दीर्घकाळ जपानचे पंतप्रधान होते. शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी जड अंत:करणाने राजीनामा दिल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. शिंजो आबे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिंजो आबे यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली होती. पद सोडण्यापूर्वी शिंजो आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.

बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानची महत्त्वाची भूमिका

सप्टेंबर २०१७ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबादमध्ये देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली होती. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्राची राजधानी आणि गुजरातमधील अहमदाबाद दरम्यान तयार होत आहे. हा प्रकल्प जपानच्या सहकार्याने बनवला जात आहे. या प्रकल्पासाठी भारत आणि जपानमध्ये करार झाला आहे. त्याचप्रमाणे भारतात मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात जपाननेही महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर भारतानेच मेट्रोचा विस्तार करून नवीन मेट्रो रेल्वे मार्ग बांधले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why shinzo abe was given padma vibhushan know what is the special connection with india abn
First published on: 08-07-2022 at 14:53 IST