पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूरच्या कन्हानमध्ये जाहीर सभा पार पडली. ही सभा नागपूर आणि भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठी एकत्रित होती. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे’, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
“१९ एप्रिलला आपल्याला एक खासदार निवडायचा नाही, तर येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी भारताला मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. विकसित भारताच्या संकल्पनेसाठी मतदान करायचे आहे. सध्या मीडियावाले एक सर्व्हे दाखवत आहेत. या सर्व्हेत ‘एनडीए’चा मोठा विजय दिसत आहे. पण मी आज त्यांची मदत करणार आहे. मीडियावाले सर्व्हेमध्ये एवढा खर्च का करत आहेत. मी त्यांना सल्ला देतो की, ज्यावेळी मोदींना शिव्या पडतात, ज्यावेळी मोदींवर विरोधक टीका करतात तेव्हा समजून जायचे की पुन्हा एकदा मोदी सरकार”, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.
हेही वाचा : “नाराजी दाखवायची असेल तर आम्ही…”, सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा
“आजकाल इंडिया आघाडीवाले सध्या एक खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत. जर पुन्हा मोदी पंतप्रधान झाले तर संविधान धोक्यात येईल, असा खोटा प्रचार ते करत आहेत. मग आणीबाणीच्या काळात देश धोक्यात नव्हता का? उत्तर ते दक्षिणपर्यंत एक प्रकारे चारही बांजूनी त्यांनी कब्जा केला होता. त्यावेळी संविधान धोक्यात नव्हते का? आता एक गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला तर इंडिया आघाडीला देशाचे संविधान धोक्यात दिसते. मराठीत एक म्हण आहे, पाण्यावर कितीही लाठी मारली तरी पाणी दुंभगत नाही. तसेच गरीबाच्या या मुलावर कितीही हल्लाबोल केला तरी नरेंद्र मोदी या देशातील जनतेच्या सेवेतून मागे हटणार नाही”, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सुनावले.
“मी देशाच्या नागरिकांना आवाहन करतो की, देशाच्या नावावर मतदान द्या. हे इंडिया आघाडीवाले ताकदवान झाले तर देशाचे तुकडे तुकडे करतील. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा देऊ नका. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र, इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा झाली पाहिजे”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी केला.