सध्या सोशल मीडियावर एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नावाचं हे पत्र असून यात सर्व विद्यापीठांना ऑफलाईन परीक्षा घेणं बंधनकारक करण्यात आल्याचा उल्लेख आहे. करोनाचे नियम पाळून सर्व विद्यापीठांनी ऑफलाईन परीक्षा घ्यावी, असं या पत्रात लिहिलेलं आहे. मात्र हे पत्र खोटं असल्याची माहिती आता समोर येत आहे.
पीआय़बीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत हे पत्र खोटं असल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सध्या सोशल मीडियावर विद्यापीठांना ऑफलाईन परीक्षा घेण्याचे आदेश देणारं एक पत्र व्हायरल होत आहे. हे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने पाठवलं असल्याचंही या पत्रातून कळत आहे. मात्र हे पत्र खोटं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही.
UGC त्यांची अधिकृत वेबसाइट ugc.ac.in द्वारे विद्यार्थी आणि विद्यापीठांना सेमिस्टर परीक्षांबाबत केलेले बदल आणि निर्णय याबद्दल माहिती देत असते. कोविड-१९ महामारीच्या काळात, जेव्हा शिक्षण प्रणाली वर्गात शिकविण्यापासून ऑनलाइन वर्गांकडे वळली, तेव्हा UGC ने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या वेबसाइटवर सार्वजनिक सूचनांद्वारे अंतिम मुदती आणि परीक्षेशी संबंधित इतर संबंधित माहिती वेळोवेळी दिली आहे.