संदीप कदम

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. काही खेळाडूंसाठी ही विश्वचषक स्पर्धा अखेरची ठरली आहे. पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वचषक जिंकण्याची संधी हुकली. तर, अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहोचल्याने लिओनेल मेसीला अजूनही जेतेपद मिळवण्याची संधी आहे. या दोघांसह अन्य काही खेळाडूंसाठी ही स्पर्धा अखेरची ठरली. हे खेळाडू कोणते याचा आढावा.

ख्रिस्तिआनो रोनाल्डो, पोर्तुगाल

रोनाल्डो हा जागतिक फुटबॉलमधील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. ३७ वर्षीय रोनाल्डोने विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी आपला क्लब मँचेस्टर युनायटेड आणि या संघाच्या व्यवस्थापनावर टीका होती. त्यामुळे युनायटेडने परस्पर सामंजस्याने रोनाल्डोसोबतचा करार मोडला. त्याचा समावेश असताना पोर्तुगालने युरोपीयन चॅम्पियनशिप, नेशन्स लीग जिंकली आहे. मात्र, पोर्तुगालला विश्वचषक जिंकवून देण्यात रोनाल्डोला यंदाही अपयश आले. आंतरराष्ट्रीय सर्वाधिक गोलच्या विक्रमाचा मानकरी रोनाल्डोच्या पदरी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही पदरी निराशा पडली. पोर्तुगालचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आणि रोनाल्डोचे विश्वविजयाचे स्वप्न धुळीस मिळाले.

लिओनेल मेसी, अर्जेंटिना

अर्जेंटिना संघाने गतउपविजेत्या क्रोएशियन संघाला पराभूत करत विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे विश्वविजेतेपद मिळवण्यापासून मेसी अवघा एक पाऊल दूर आहे. या स्पर्धेनंतर आपण पुन्हा विश्वचषकात खेळणार नसल्याचे मेसीने संकेत दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत मेसीने पाच गोल करण्यासह गोल करण्यासाठी साहाय्यही केले आहे. अर्जेंटिनाला २०२१ कोपा अमेरिकेचे जेतेपद मिळवून देण्यात मेसीने निर्णायक भूमिका पार पाडली होती. २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत मेसीच्या अर्जेंटिनाने अंतिम फेरी गाठली, मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी त्याला जेतेपद मिळवण्याची अखेरची संधी आहे आणि त्याचे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल.

विश्लेषण: अर्जेंटिनासाठी ‘मेसी मॅजिक’ अजूनही निर्णायक… मेसीला थोपवणे शक्य आहे का?

ऑलिव्हिए जिरूड, फ्रान्स

फ्रान्सला आघाडीपटू ऑलिव्हिए जिरूड आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत. ३६ वर्षीय जिरूड विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर राष्ट्रीय संघात राहण्याची शक्यता कमी आहे. एसी मिलानचा आघाडीपटू असलेल्या जिरूडने आपल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय संघाच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. जिरूडने फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल झळकावणाऱ्या थिएरी ऑन्रीचा (५१) विक्रम मोडीत काढला. त्याचे आता ५२ गोल झाले आहेत. फ्रान्सने मोरोक्कोला पराभूत करत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

लुका मॉड्रिच, क्रोएशिया

रेयाल माद्रिदचा ३७ वर्षीय मध्यरक्षक लुका मॉड्रिच अजूनही आपल्या क्लबसाठी निर्णायक कामगिरी करताना दिसत आहे. यंदाच्या विश्वचषकात क्रोएशियाला अपेक्षित चमक दाखवता आली नाही. २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत मॉड्रिचच्या कामगिरीच्या बळावर क्रोएशियाने अंतिम फेरी गाठली होती, तसेच मॉड्रिचला ‘गोल्डन बॉल’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या वेळी क्रोएशियाच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तिथे त्यांना अर्जेंटिनाकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे विश्वविजेतेपदाचे मॉड्रिचचे स्वप्न भंगले.

लुईस सुआरेझ, ऊरुग्वे

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ऊरुग्वे संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. या स्पर्धेत ३५ वर्षीय आघाडीपटू लुईस सुआरेझकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र त्याला या स्पर्धेत चुणूक दाखवता आली नाही. त्याची गोलची पाटीही स्पर्धेत कोरीच राहिली. एक मजबूत संघ म्हणून उरुग्वेकडे या स्पर्धेच्यापूर्वी पाहिले जात होते, मात्र आपल्या कामगिरीने त्यांनी निराशा केली. या स्पर्धेपूर्वी सुआरेझची लय पाहता त्याच्याकडून दमदार कामगिरी अपेक्षा होती. पण, त्याला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. त्याचा फटका उरुग्वेला बसला. आपल्या देशाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या सुआरेझने या स्पर्धेत एकही गोल केला नाही आणि त्याचे वय पाहता तो पुढील विश्वचषक खेळण्याची शक्यताही कमीच आहे.

विश्लेषण : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गोलकीपरची कामगिरी कशी ठरतेय निर्णायक?

रॉबर्ट लेवांडोवस्की, पोलंड

पोलंड विश्वचषकासाठी पात्र झाला, तेव्हापासून सर्वांच्या नजरा या तारांकित आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीवर होत्या. बार्सिलोनाकडून खेळण्यास सुरुवात केल्यापासून त्याने आपली गोल करण्याची लय कायम राखली आहे. त्याने या हंगामात १९ सामन्यांमध्ये १८ गोल केले. १९८६च्या मेक्सिको विश्वचषक स्पर्धेपासून पोलंडला साखळी फेरीच्या पुढे जाता आलेले नव्हते. मात्र, ३४ वर्षीय लेवांडोवस्कीच्या कामगिरीच्या जोरावर पोलंडने यंदा उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. पोलंडला या फेरीत फ्रान्सकडून पराभूत व्हावे लागले. पोलंडने स्पर्धेत तीन गोल झळकावले आणि त्यापैकी दोन गोल लेवांडोवस्कीचे होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्जिओ बुस्केट्स, स्पेन

बुस्केट्स अजूनही स्पेन संघातील सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक असल्याचे त्याने गेल्या वर्षी युरोमधील आपल्या कामगिरीमुळे अधोरेखित केले होते. बुस्केट्सने स्पेनकडून खेळताना अनेक संस्मरणीय क्षण अनुभवले आहेत. त्याने याआधीच २०१० विश्वचषक आणि २०१२ युरो चषक जिंकले आहेत. स्पेनच्या संघाने यंदा विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतपर्यंत मजल मारली, मात्र त्यांना मोरोक्कोकडून शूटआऊटमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे स्पेन आणि बुस्केट्सचे आव्हान संपुष्टात आले.