संदीप नलावडे
पश्चिम आशियातील सर्वांत मोठा अरब देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये चक्क पहिले मद्यविक्रीचे दुकान (वाइन शॉप) सुरू होणार आहे. देशाची राजधानी रियाधमध्ये सुरू होणाऱ्या या वाइन शॉपमध्ये मुस्लीम धर्मीय वगळून अन्य व्यक्तींना, म्हणजे परदेशी मुत्सद्दी व्यक्तींना मद्य मिळणार आहे. या मुस्लीम राष्ट्राने मद्यविक्रीच्या धोरणामध्ये बदल करण्याचे कारण काय यासंबंधीचा आढावा…
सौदी अरेबियाने मद्यविक्रीसंबंधी काय निर्णय घेतला आहे?
कट्टर इस्लाम धर्मीय असलेल्या सौदी अरेबियामध्ये अल्कोहोल निषिद्ध मानले जाते. त्यामुळे या देशात मद्यनिर्मिती, मद्यविक्री आणि मद्यप्राशन यांवर बंदी आहे. मात्र बिगरमुस्लीम मुत्सद्दी आणि विविध देशांच्या दूतावासातील अधिकारी यांच्यासाठी सौदी अरेबिया या देशाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राजधानी रियाध या शहरात देशातील पहिले मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दुकानातून मुस्लीम धर्मीयांना मद्यखरेदी करण्यास बंदी असेल. बिगरमुस्लिमांना मात्र या दुकानातून मद्यखरेदीस मुभा आहे. मद्य खरेदीसाठी ग्राहकांना मोबाइल ॲपवरून नोंदणी करावी लागणार आहे, तसेच परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड प्राप्त केल्यानंतरच मद्य खरेदी करता येणार आहे. महिन्यातील कोट्याप्रमाणे मद्य मिळणार आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘व्हिजन २०३०’ योजनेंतर्गत हे पाऊल उचलले आहे.
आणखी वाचा-अंतरिम अर्थसंकल्प ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जागतिक आर्थिक दृष्टिकोन, बजेटमध्ये काय असणार?
सौदी अरेबियाने हा निर्णय घेण्यामागचे कारण काय?
सौदी अरेबिया हा जगातील सर्वाधिक तेलसमृद्ध देश असल्याने अनेक देशांची राजनैतिक कार्यालये या देशांत आहेत. तरी मुस्लीम राष्ट्र असल्याने या देशांत अनेक कठोर कायदे असून मद्यविक्रीस संपूर्ण बंदी आहे. मात्र राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी आर्थिक सुधारणेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ आखले आहे. यानुसार पर्यटन व्यवसाय आणि अन्य उद्योगांना चालना देण्यासाठी मद्यदुकान सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. तेलानंतरची अर्थव्यवस्था निर्माण करणे हा ‘व्हिजन २०३०’चा उद्देश असून या व्यापक योजनांचा हा एक भाग आहे. रियाधच्या ‘डिप्लोमॅट क्वार्टर’मध्ये हे नवीन मद्यविक्री दुकान उघडण्यात आले आहे. या परिसरात विविध देशांचे दूतावास असून राजदूत व विविध राजनैतिक अधिकारी या भागात राहत असल्याने त्यांना या दुकानातून मद्य मिळू शकणार आहे.
सौदी अरेबियाचे ‘व्हिजन २०३०’ काय आहे?
सौदी अरेबियाच्या राजकुमार सलमान यांनी सुरू केलेल्या ‘व्हिजन २०३०’ या सरकारी कार्यक्रमाची घोषणा २५ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली होती. ज्याचा उद्देश आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या बदल करणे हा आहेच, त्याशिवाय तेलाशिवाय अन्य मार्गाने अर्थव्यवस्था निर्माण करणे हाही यामागचा उद्देश आहे. ‘व्हिजन २०३०’नुसार सौदी अरेबिया देशात गुंतवणूक वाढविण्यावरही भर दिला जात असून रियाधमध्ये गुंतवणूक कायदा व्यवसाय नियमन क्षेत्राची (आयएलबीझेड) स्थापना करण्यात आली आहे. ‘व्हिजन २०३०’मध्ये स्थानिक उद्योग आणि लॉजिस्टिक हब विकसित करणे आणि सौदी नागरिकांसाठी लाखो नोकऱ्या जोडण्याचे उद्दिष्ट आहे. त्याशिवाय विविध क्षेत्रांमध्ये महिलांना स्थान देण्याचा सामाजिक प्रयत्नही ‘व्हिजन २०३०’नुसार केला जात आहे. महिलांच्या कल्याणासाठी कायद्यात बदल करण्यात आले असून क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहण्याची परवानगी, महिलांना वाहन चालविण्यास परवानगी, महिलांवरील प्रवास निर्बंध उठविणे आदी निर्णय घेण्यात आले आहे. त्याशिवाय पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व्हिसाच्या धोरणांतही बदल केले आहेत. २०१९ मध्ये १९ देशांतील प्रवाशांना ८० डॉलरचे शुल्क आकारून ९० दिवसांपर्यंत देशाला भेट देण्याची परवानगी देणारा पर्यटन व्हिसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आणखी वाचा-ज्ञानवापी प्रकरण : प्रार्थनास्थळांवरील कायदा अन् त्याच्या समोरील आव्हाने
कोणत्या देशांमध्ये मद्यविक्रीस बंदी आहे?
सौदी अरेबियामध्ये मद्यविषयक कठोर कायदे आहेत. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यास कठोर शिक्षा सुनावली जाते. चाबकाचे फटके, हद्दपार, दंड किंवा कारावास अशा प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात. परदेशी नागरिकांना हद्दपारीचा सामना करावा लागतो. सुधारणांचा भाग म्हणून चाबकाची शिक्षा मुख्यत्वे तुरुंगाच्या शिक्षेने बदलली आहे. सौदी अरेबियासह बांगलादेश, इराण, कुवेत, लिबिया, कतार, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सुदान, येमेन, सोमालिया, संयुक्त अरब अमिराती यांसह विविध देशांमध्ये मद्यनिर्मिती व विक्रीस बंदी आहे. २०२२ मध्ये फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद भूषविणाऱ्या कतारने सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी दारूवर बंदी घातली होती. मालदीवमध्ये स्थानिक नागरिकांना मद्यप्राशन करण्यास बंदी आहे, मात्र परदेशी पर्यटकांना मुभा आहे. काही देशांमध्ये काही ठरावीक प्रदेशांमध्ये मद्यविक्री व प्राशन करण्यास बंदी आहे. भारतात गुजरात, बिहार, नागालँड, मिझोराम या राज्यांमध्ये मद्यविक्री व प्राशन करण्यास बंदी आहे.
sandeep.nalawade@expressindia.com