पाकिस्तानचे फर्स्ट लेडी हे पद हे राष्ट्रपतींच्या पत्नीला मिळत असते, परंतु राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या मुलीला पाकिस्तानच्या फर्स्ट लेडीचं पद देणार आहेत. देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी त्यांची मुलगी असिफा भुट्टो झरदारी यांना देशाची पहिली महिला म्हणून औपचारिक पद्धतीने मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः देशाची पहिली महिला ही राष्ट्रपतींची पत्नी असते. तसं पाहिलं तर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी आपल्या मुलीला फर्स्ट लेडी पदासाठी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक पावलामुळे असिफा भुट्टो यांना पहिल्यांदाच प्रतिष्ठित फर्स्ट लेडीच्या स्थानावर पोहोचवले आहे, जो देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे.
झरदारींनी आपल्या मुलीला फर्स्ट लेडी म्हणून का निवडले?
असिफा ही पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि देशाचे दोन वेळा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या झरदारी यांची ३१ वर्षांची सर्वात लहान मुलगी आहे. २००७ मध्ये एका निवडणूक रॅलीत बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली. त्यामुळे २००८ ते २०१३ या काळात झरदारी यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात पहिल्यांदा हे पद रिक्त राहिले. पाकिस्तानस्थित मीडिया हाऊस एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, झरदारी यांनी आपल्या मुलीला फर्स्ट लेडी बनवणार असल्याचे सांगितले आहे. खरं तर त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) आधीच असिफाची चर्चा करण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी होते.
कोण आहेत असिफा भुट्टो झरदारी?
भुट्टो आणि झरदारीच्या तीन अपत्यांपैकी असिफा ही सर्वात लहान मुलगी आहे. तिची आई बेनझीर भुट्टो यांनी सुरू केलेल्या पोलिओ लस मोहिमेत ती सक्रिय होती. त्यानंतर असिफाने पोलिओ निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात काम केले आणि पोलिओमुक्त पाकिस्तानची राजदूत बनली. तिने पोलिओशी लढण्यासाठी मोहिमा चालवल्या, संबंधित अधिकाऱ्यांना भेटली आणि बाधित कुटुंबांना भेट दिली, ज्यामुळे जनतेवर प्रभाव पडला. असिफा ही खूप यशस्वी मुलगी आहे. तिने युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. २०१२ मध्ये नोबेल शांतता विजेती मलाला युसुफझाईला बर्मिंगहॅम येथे भेटण्यासाठी झरदारी गेले होते, तेव्हा तिच्या वडिलांसमवेत असताना असिफा पहिल्यांदा चर्चेत आली होती. झरदारी आणि तत्कालीन १९ वर्षीय असिफा यांनी मलालाच्या कुटुंबीयांची आणि तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे. २१ व्या वर्षी ऑक्सफर्ड युनियनला संबोधित करणारी ती सर्वात तरुण पाकिस्तानी महिला होती. २०२० मध्येच असिफाने राजकारणात पदार्पण केले होते. २०१५ पासून पाकिस्तानात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. फर्स्ट लेडी म्हणून तिच्या संभाव्य नियुक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. राजघराण्यातील तरुणी पाकिस्तानच्या राजकारणात भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय. २०१९ मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, तिने पाकिस्तानच्या लोकांसाठी उभे राहून लढण्याच्या तिच्या कुटुंबाच्या आत्मियतेबद्दल सांगितले.
असिफा राजकारणात किती सक्रिय?
गेल्या दशकभरात असिफा झरदारी प्रकाशझोतात आल्या असून, प्रभावशाली भुट्टो-झरदारी कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये मुलतान येथे झालेल्या रॅलीतून तिने राजकीय पदार्पण केले आणि पीपीपीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. यंदा ८ फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा भाग होत्या. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी पक्षाचे तत्कालीन उमेदवार आणि तिचा भाऊ बिलावल भुट्टो झरदारी यांना पाठिंबा मिळावा, यासाठी विविध रॅलींचे आयोजन केले होते. डॉनमधील वृत्तानुसार, राष्ट्रपती झरदारी यांनी आपल्या तीन मुलांना मुलगा बिलावल आणि मुली भक्तावर, असिफा यांना पीपीपीमध्ये सामील करून घेण्याचे आपले इरादे सार्वजनिक केले होते. तिच्या भावाने काही काळ पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले, तर वडिलांबरोबर नेहमीच असिफाला पाहायला मिळत होते. ती बहुतेक भाषणे आणि राजकीय समारंभ, रॅलींमध्ये उपस्थित राहायची. तिने पक्षात आणि देशात स्वतःचं एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे डॉनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचाः विश्लेषण : शेअर बाजारात कशी होते नवीन गुंतवणूकदारांची फसवणूक? सेबीचा सावधगिरीचा सल्ला काय?
प्रथम महिला म्हणून नियुक्ती झाल्यास असिफाची भूमिका काय असेल?
डॉनच्या म्हणण्यानुसार, फर्स्ट लेडी पारंपरिकपणे डिनरचे आयोजन करतात आणि घरगुती उपक्रम राबवतात, कॉन्फरन्स आणि शिखर परिषदांना संबोधित करतात आणि विविध कारणांसाठी बिगर सरकारी संस्थांना (एनजीओ) मदत करतात. विशेष म्हणजे त्यांची आजी नुसरत भुट्टो यांनी फर्स्ट लेडी म्हणून काम पाहिले होते. त्या PPP च्या सक्रिय सदस्य होत्या, नॅशनल असेंब्लीचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले होते . पंतप्रधान शेहबाज शरीफ हे लोकप्रिय स्त्रीवादी आवाज आहेत, त्यांनी आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. महिला अन् मुलांच्या हक्कांसाठी वकिली केली आहे.
हेही वाचाः विश्लेषण : पश्चिम बंगालच्या निवडणूक रणात कोणाची सरशी? ममतांच्या साम्राज्याला भाजप धक्का देईल?
असिफाला प्रोटोकॉल आणि विशेषाधिकार दिले जाणार
राष्ट्रपती झरदारी मुलगी असिफा भुट्टो यांना पाकिस्तानची फर्स्ट लेडी म्हणून घोषित करतील. असिफा भुट्टो झरदारी यांना प्रथम महिला म्हणून योग्य असलेले प्रोटोकॉल आणि विशेषाधिकार दिले जाणार आहेत. खरं तर हा निर्णय उल्लेखनीय आहे, कारण असिफा भुट्टो या फर्स्ट लेडी पदावर विराजमान झालेल्या राष्ट्रपतींची पहिली मुलगी ठरणार आहे. रविवारी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे सह अध्यक्ष आसिफ झरदारी यांनी पाकिस्तानचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, त्यांनी अधिकृतपणे दुसऱ्यांदा राष्ट्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला, असे डॉनने वृत्त दिले आहे. यापूर्वी त्यांनी २००८ ते २०१३ या काळात पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, झरदारी यांनी शनिवारी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पश्तूनखा मिली अवामी पार्टी (पीकेएमएपी) प्रमुख महमूद खान अचकझाई यांना पराभूत करण्यासाठी निवडणुकीत ४११ मते मिळविली, तर विरोधी पार्टीचे खान यांना केवळ १८१ मते मिळाली.
मुलींनी याआधी फर्स्ट लेडी म्हणून भूमिका निभावल्या आहेत का?
पाकिस्तानात तर यापूर्वी असे घडलेले नाही. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांची मुलगी मार्था जेफरसन रँडॉल्फ यांनी त्यांच्या शासनकाळात फर्स्ट लेडी म्हणून काम केले. आणखी एक अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांची सून आणि भाची यांनीसुद्धा फर्स्ट लेडी म्हणून काम पाहिले. पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी इस्लामाबाद येथील राष्ट्रपती भवनात झरदारी यांना शपथ दिली. नवनिर्वाचित पंतप्रधान शहबाज शरीफ आणि माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याशिवाय लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा आणि पीपीपी प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी हेही त्यांच्याबरोबर उपस्थित होते. झरदारी हे लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या चार राष्ट्रपतींपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांचा पाच वर्षांचा घटनात्मक कार्यकाळ पूर्ण केला आहे, असे डॉनने वृत्त दिले आहे.