Ahmedabad plane crash after one month: अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये दुपारचे १.३० वाजले होते. बरोबर एक महिन्यापूर्वी १२ जूनला एअर इंडियाचे विमान-१७१ टेकऑफनंतर काही मिनिटांतच एका वसतिगृहावर जाऊन कोसळले. बीजे मेडिकल कॉलेजच्या परिसरात हवेत प्रचंड उकाडा पसरला होता. काही क्षणात २६० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर लगेचच परिसर लोकांनी गजबजून गेला. बचाव पथकं, पोलिस, नातेवाईक, बघणारे लोकं सगळ्यांचीच गर्दी झाली. महिनाभरानंतर अपघातात आग लागलेल्या झाडांचे फक्त जळालेले अवशेष पाहून महिनाभरापूर्वीपर्यंत हा परिसर किती गजबजलेला असेल याची कल्पना येते. अपघात झाल्यावर काही क्षण कोणालाही काही समजले नाही की नेमकं काय घडलं. परिसरात एकच आक्रोश आणि धावपळ सुरू होती. त्या परिस्थितीत बचाव पथकाने तात्काळ काम सुरू केले होते.
बोईंग ७८७ ड्रीमलायनरचे शेपूट अपघातानंतर अनेक दिवस जिथे अडकले होते, त्या इमारतीला गूगल मॅपवर ‘एआय ०१७१ ग्राउंड झिरो’ असे टॅग लावले आहे.
अतुल्यम १ ते ४ या चार वसतिगृह इमारती काळ्या पडलेल्या आणि पडीक दिसत आहेत. त्यांच्या माजी रहिवाशांसह वैद्यकीय विद्यार्थ्यांना इतर कॅम्पसमध्ये हलवण्यात आले. गुजरात पोलिसांनी विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) साठी अपघातस्थळावरील काही अडथळे दूर केले. ड्रिमलायनरचा मलबा अहमदाबाद विमानतळाच्या आवारात फक्त ६.६ किमी अंतरावर आहे. हा मलबा अपघाताच्या दोन आठवड्यांनंतर हलवण्यात आला होता.
आयजीपी कंपाउंडमधील अतुल्यम वसतिगृहात सुमारे १५० वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर राहत होते. या परिसरात पूर्वी पोलिस प्रमुखांचे कार्यालय होते. आता या विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरांना इतर निवासस्थानांमध्ये हलवण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेक जण अपघातस्थळाशेजारी असलेल्या वसतिगृहातील इमारतींमध्ये राहत असल्याने गमावलेल्या सहकाऱ्यांच्या आठवणी त्यांना रोज डोळ्यासमोर दिसतात. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये चार वैद्यकीय विद्यार्थी होते.
यूके आणि अमेरिकेतली भागीदार तपासकर्त्यांसह अपघातस्थळी तपास करत असलेल्या भारतीय एएआयबीने अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला एक प्राथमिक अहवाल सादर केला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त जयपालसिंग राठोड यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “एएआयबीने घटनास्थळाचे काम जवळपास पूर्ण केले आहे आणि पुढील आठवड्यापर्यंत ते आपला अहवाल प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे.”
लंडन गॅटविकला जाणारे हे विमान १२ जून रोजी दुपारी १.३८ वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानात असलेल्या २४२ जणांपैकी २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर विश्व कुमार रमेश हे या अपघातातून वाचले. विमान जिथे कोसळले तिथल्या एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी मेस इमारतीच्या टेरेसच्या वरच्या भागाचे नुकसान झाले आणि तो एका बाजूला झुकलेला दिसतो. मेडिसिटीच्या अखत्यारीत हे वैद्यकीय महाविद्यालय येते. मेडिसिटीच्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मेस इमारतीचे मोठे नुकसान झाले आणि अतुल्यम वसतिगृह १ ते ४ आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते आणि विमान त्यांच्या शेजारीच कोसळले होते. मात्र, अतुल्यम ८ पूर्णपणे सुरक्षित राहिले. बचाव कार्यादरम्यान अतुल्यम ८चा वापर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) ऑपरेशन बेस म्हणून करण्यात आला होता. आता ते वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोपवण्यात आले आहे.
बीजेएमसीच्या डीन डॉ. मीनाक्षी पारीख यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “विद्यार्थ्यांचे कॅम्पसमधील इतर वसतिगृहांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. आम्ही काही खोल्या भाड्याने घेतल्या आहेत आणि काही विद्यार्थ्यांना तिथे हलवले आहे.”
नुकसान झालेल्या मेससाठी शेजारी असलेल्या सोपानम ७ आणि सोपानम ८ वसतिगृहाच्या इमारतींमध्ये एक नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. “आम्ही तिथून कँटिन रिकामे केले आणि तिथे पर्यायी सोय करण्यात आली. आम्ही २७ स्वयंपाकघरे उभारली, त्यांना नवीन भांडी आणि एका महिन्याचा खर्च दिला”, अशी माहिती डॉ. पारीख यांनी दिली.
एएआययबीकडूनच नुकसान झालेल्या वसतिगृहाच्या नुकसानाची पाहणी करून अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर सरकार त्या इमारतींची पुनर्बांधणी करेल किंवा त्या पाडून पुन्हा नवीन बांधायची की नाही हा निर्णय घेईल. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाने २३ जून रोजी वर्ग पुन्हा सुरू केले आणि २४ जून रोजी मृतांसाठी प्रार्थना सभादेखील आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसांनी परीक्षा घेण्यात आल्या. डॉ. पारिख यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी उपचारात्मक परीक्षा घेतल्या जातील. ज्यांना त्यांची आवश्यकता आहे त्यांना लेखकही पुरवले जातील, असेही डॉ. पारीख यांनी सांगितले.
नेमकं त्या दिवशी काय घडलं?
- सकाळी ११.१७ वाजता: एअर इंडियाचे ड्रिमलायनर VT-ANB नवी दिल्लीहून अहमदाबादला उतरले
- दुपारी १.१८.३८ वाजता: विमानतळावर बे ३४ वरून सदर विमान निघताना दिसून येते
- दुपारी १:२५:१५: क्रू सदस्यांनी टॅक्सी क्लिअरन्सची परवानगी मागितल्यानंतर एअर ट्राफिक कंट्रोलकडून सदर परवानगी दिली जाते. यानंतर विमान रनवे २३ च्या दिशेने जाते
- दुपारी १:३२:०३: विमान ग्राऊंड कंट्रोलकडून टॉवर कंट्रोलकडे हस्तांतरित केले जाते
- दुपारी १:३७:३३: उड्डाणासाठीची परवानगी मिळते
- दुपारी १:३७:३७: उड्डाणासाठी विमान सज्ज होते
- दुपारी १:३८:३९: विमान उड्डाण घेते
- दुपारी १:३८:४२: विमानाने १८० नॉट्स इतका कमाल वेग प्राप्त केला. यानंतर अचानक इंजिन १ आणि इंजिन २ बंद झाले. इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विच रन वरून कटऑफवर गेल्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला
- दुपारी १:३८:४७: दोन्ही इंजिनचे काम हळूहळू निष्क्रिय होत जाते. रॅटमधून हायड्रॉलिक पॉवर पुरवण्यास सुरुवात होते
- दुपारी १:३८:५२: इंजिन १ चा इंधन कटऑफ स्विच रनवर परत आणला जातो
- दुपारी १:३८:५६: इंजिन २ चाही इंधन कटऑफ स्विच पूर्ववत करण्यात येतो

अतुल्यम वसतिगृहाबाहेरील मुख्य रस्त्यावर तीन पोलिस चौक्या आहेत. एक चौकी घोडा कॅम्प रस्त्यावर १२०० खाटांच्या महिला, बाल आणि सुपर-स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आहे. दुसरी चौकी राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे, जी प्रभावित वसतिगृह इमारतींच्या अगदी समोर आहे. इथून वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहे. अपघातस्थळाच्या परिसरात आणि विमानतळावरील गुजरात स्टेट एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या आसपास १००हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत, असे अतिरिक्त सीपी राठोड यांनी सांगितले. राठोड यांनी सांगितले की, “विमान पाहण्यासाठी स्थानिक लोक उत्सुक होते. तसंच मृतांचे नातेवाईक श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. वैद्यकीय विद्यार्थीही त्यांचे सामान शोधण्यासाठी आले होते. अपघातस्थळी साधारण १५ दिवस गर्दी होती. सुरुवातीच्या दोन आठवड्यांत कडक सुरक्षा होती, बॅरिगेट्स लावल्यानंतर ती कमी झाली.”
मेघानीनगरमधील गुजरात हाउसिंग बोर्ड अपार्टमेंटजवळील भिंतीला भगदाड पडलेल्या ठिकाणी काही दिवस पोलिस तैनात करण्यात आले होते. तिसरी पोलिस चौकी वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे, जिथे गुजरात औद्योगिक सुरक्षा दलाचे चौकीदार राजेंद्र पाटणकर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे तेच प्रवेशद्वार आहे, जिथून अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी स्तब्ध होऊन बाहेर पडले होते.