scorecardresearch

Premium

जॉर्जियामध्ये ‘हिंदूफोबिया’ विरोधी ठराव मंजूर; हिंदूफोबिया म्हणजे काय आणि हा ठराव आणण्याची गरज का भासली?

हिंदूफोबिया आणि हिंदूच्या विरोधातील कट्टरतेचा निषेध करण्यासाठी जॉर्जिया विधानसभेने एक ठराव मंजूर केला आहे. अमेरिकेच्या हिंदू समुदायामध्ये जातीभेदावरून सुरू असलेल्या वादातून हा ठराव मंजूर झाल्याचे कळते.

What is Hinduphobia in America
अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात हिंदूफोबिया विरोधातील ठराव मंजूर झाला.

जॉर्जिया विधानसभेने २७ मार्च रोजी ‘हिंदूफोबिया’ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आणि जगभरातील हिंदूंचे या ठारावाने लक्ष वेधले. अशाप्रकारचा ठराव मंजूर करणारे जॉर्जिया अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी लॉरेन मॅकडॉनल्ड, टॉड जोन्स, रिक जॅस्पर्स, डेव्हिड क्लार्क आणि ब्रेंट कॉक्स यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. मॅकडॉनल्ड आणि जोन्स यांनी हा ठराव मांडला होता. दोघेही अटलांटा शहराचे प्रतिनिधित्व करतात. जॉर्जियामधील सर्वाधिक हिंदू समुदाय अटलांटामध्ये राहतो. त्या पार्श्वभूमीवर अटलांटाच्या प्रतिनिधींसाठी हा ठराव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. हा ठराव आणण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिन्याभरापूर्वीच अमेरिकेतील सिएटल शहराच्या नगरपरिषदेने भेदभावाविरोधी धोरणात ‘जातीभेदाचाही’ समावेश केला होता. त्यामुळे अमेरिकेतील हिंदूमध्ये जातीभेद असल्याचे यातून दिसत होते. वरकरणी हिंदूद्वेष आणि हिंदूविरोधातील वाढते गुन्हे लक्षात घेता, जॉर्जियाने हा ठराव आणला असला तरी त्याला सिएटलचा ठराव कारणीभूत असल्याचे दिसत आहे.

Hinduphobia ठरावात काय म्हटले?

‘हिंदूफोबिया आणि हिंदूविरोधी कट्टरता’ हा ठराव मांडतांना सांगितले गेले की, सनातन धर्म (हिंदू धर्म) आणि हिंदूच्या विरोधात काही घटक घातक कारवाया करत आहेत आणि हिंदूंना अपमानास्पद वागणूक देत आहेत. या भेदभावावरून त्यांच्या मनातली भीती आणि द्वेष दिसून येत आहे. हिंदू धर्म हा जगातला सर्वात मोठा आणि सर्वात जुना धर्म असून जगभरातील १०० हून अधिक देशात १.२ अब्ज हिंदू धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. विविध देशांत वास्तव्य करत असताना तेथील मूल्यांचा स्वीकार, परस्परांबद्दल सौहार्द आणि शांततापूर्ण पद्धतीचा व्यवहार हिंदूजनांकडून केला जातो.

या ठरावात पुढे म्हटले की, अमेरिकेच्या बहुढंगी संस्कृतीमध्ये ४ दशलक्षहून अधिक हिंदू वास्तव्य करत आहेत. तसेच अमेरिकन-हिंदू समुदायाने अमेरिकेच्या विविध क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्र, आयुर्वेद, योग, खाद्यसंस्कृती, ध्यानधारणा, संगीत आणि कला यांसारख्या अनेक क्षेत्रात हिंदू धर्मीयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

गेल्या काही दशकांपासून अमेरिकेच्या विविध भागांमध्ये हिंदू-अमेरिकन नागरिकांविरोधात द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, असेही या ठरावात नमूद करण्यात आले. यासाठी रुटगर्स विद्यापीठाच्या २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालाचा दाखला देण्यात आला. हिंदूंच्या पवित्र ग्रंथावर आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंसा आणि दडपशाहीची पद्धत विकसित करण्याचा प्रयत्न शैक्षणिक क्षेत्रातील काही मंडळींनी केला. ज्यामुळे हिंदूफोबियाला एकप्रकारे संस्थांत्मक अधिष्ठान मिळत असल्याची तक्रार ठरावाच्या माध्यमातून केली गेली.

हा ठराव काय सूचित करतो?

ठराव मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. हा एक साधा ठराव असून यातून कुणालाही डिवचण्याचा आमचा प्रयत्न नाही. अटलांटाच्या फोर्सिथ काऊंटीमधील नागरिकांची भावना या ठरावाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही मांडली आहे. या पलीकडे या ठरावातून आम्हाला कुणालाही आव्हान द्यायचे नाही. या ठराव्याच्या शेवटी म्हटले, “फोर्सिथ काऊंटीमधील लोकप्रतिनिधी हिंदूफोबियाचा निषेध करत आहेत. हिंदूविरोधी कट्टरतावाद आणि असहिष्णू वागणूकीचा आम्ही विरोध करतो. फोर्सिथ काऊंटीमधील अमेरिकन हिंदूंनी विविधतेचा स्वीकार केलेला आहे. हिंदू समुदायाकडून कायद्याचा आदर केला जातो, जॉर्जियाचे आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ जपण्यात नेहमीच त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधी या नात्याने विधीमंडळात आम्ही हा ठराव मांडत आहोत.”

सिएटलच्या भेदभाव विरोधी ठरावामध्ये जातीचा समावेश करण्यात आला होता, मात्र जॉर्जियामधील ठरावामध्ये अशा कोणत्याही बाबींचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

हे वाचा >> विश्लेषण : सिएटलमधील जातीभेद बंदीवरून वाद काय? भारतीयांमध्ये दोन तट कसे पडले?

या ठरावामागे कोण आहेत?

कोअलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (CoHNA) अटलांटा चॅप्टर या संस्थेने जॉर्जियाच्या विधानसभेत हा ठराव आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या संघटनेकडून २२ मार्च रोजी जॉर्जिया स्टेट कॅपिटल येथे पहिल्या हिंदू वकिली दिवसाचे (Hindu Advocacy Day) आयोजन केले होते. या ठरावाबाबत बोलताना CoHNA चे उपाध्यक्ष राजीव मेनन म्हणाले, “रिपब्लिकन आमदार लॉरेन मॅकडॉनल्ड आणि टॉड जोन्स आणि इतर आमदारांसोबत काम करणे ही आमच्यासाठी सन्मानजनक बाब होती. हा ठराव मंजूर करण्यासाठी सर्वांनी जे मार्गदर्शन दिले, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.”

कोहना (CoHNA) संघटना काय आहे?

कोहना (CoHNA) हा उत्तर अमेरिकेतील हिंदू समुदायाला कायदेशीर सल्ला देणारा गट आहे. हिंदू समुदायाच्या हितांचे रक्षण करण्याचे काम संघटनेकडून केले जाते. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी सोडविणे आणि हिंदू संस्कृती आणि परंपरांबद्दल जनजागृती करण्याचे काम कोहनाकडून केले जात असल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

कोहनाचे सरचिटणीस शोभा स्वामी या ठरावाबाबत बोलताना म्हणाल्या की, हिंदूफोबियाचे नरेटिव्ह हे मेहनती, कायद्याचा सन्मान करणाऱ्या आणि अमेरिकेच्या बहुढंगी संस्कृतीला आणखी श्रीमंत करणाऱ्या हिंदू समुदायावर नकारात्मक प्रभाव टाकत आहे. त्यामुळेच आम्ही जॉर्जियाच्या आमदारांसोबत या विषयाबाबत चर्चा केली. हिंदूच्या विरोधात उफाळणारा द्वेष आणि कट्टरतावाद कुठेतरी थांबावा यासाठी कायदे तयार व्हायला हवेत, अशी मागणी केली.

अमेरिकेतील अनिवासी भारतीयांमध्ये जातीभेदाचा विषय कसा आला?

अमेरिकन भारतीय समुदायामध्ये सध्या दोन गट पडल्याचे दिसत आहे. एकाबाजूला, जातीभेदाविरोधातील कायदे हे हिंदूवर अन्याय करणारे असल्याचे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या बाजूला, अमेरिकेत जातीभेद होत असल्याचा आरोप करत त्याविरोधात लढण्याची तयारी दाखविणाऱ्यांचा एक गट आहे.

हे वाचा >> जातिभेदाविरोधात अमेरिकेत लढा देणाऱ्या क्षमा सावंत आहेत तरी कोण?

फेब्रुवारी २०२३ मध्ये, अमेरिकेच्या सिएटल शहराने भेदभावविरोधी धोरणात ‘जात’ या घटकाचा समावेश करण्याचा ठराव समंत केला. बोस्टन ब्रँडिज विद्यापीठ, कॅलिफोर्निया राज्य विद्यापीठ, कॉल्बी महाविद्यालय, ब्राऊन विद्यापीठ, डेव्हिस येथील कॅलिफॉर्निया विद्यापीठ आणि हॉरवर्ड विद्यापीठ यांनी देखील अशाच प्रकारचे धोरण २०१९ मध्ये राबविले आहे. मध्यंतरी कॅलिफोर्नियाच्या विधानसभेत देखील अशाप्रकारच्या धोरणांवर चर्चा झाली.

कोहनाच्या सरचिटणीस शोभा स्वामी यांच्या वक्तव्यावरून जॉर्जिया विधानसभेत समंत झालेला ठराव हा सिएटल नगरपरिषदेने केलेल्या ठरावाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते.

आणखी वाचा >> अमेरिकेतील भेदभावविरोधी कायद्याला विरोध, रा.स्व. संघाच्या ‘पांचजन्य’मध्ये ‘हिंदूफोबियाचा’ आरोप

हिंदूफोबियात तथ्य आहे का?

युनायटेड स्टेट्समध्ये हिंदू अमेरिकन विषमतेचे शिकार होत आहेत, यात दुमत नाही. याबाबत अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मात्र हे भेदभाव ‘हिंदू विरोधी’ आहेत का? हे ठामपणे समोर आलेले नाही. यूसच्या न्यायिक विभागाने २०२१ साली द्वेषावर आधारीत गुन्ह्यांचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात ७,०७४ घटनांची नोंद केली असून यामध्ये एकूण ८,७५३ पीडित आहेत. आकडेवारीचे विश्लेषण केले असता “वर्ण, वांशिकता किंवा पूर्वजांचा अभिमान” अशा प्रकारच्या भेदभावांमध्ये ६४.८ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले. १००५ किंवा १३.३ टक्के घटनांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याचे गुन्हे नोंदविले गेले आहेत. धार्मिक गटांना लक्ष्य करण्याचीही आकडेवारी मिळाली आहे. यामध्ये ज्यू धर्मियांच्या विरोधात ३१.९ टक्के धार्मिक द्वेषपूर्ण घटना घडल्या आहेत. तर शीख (२१.३ टक्के), मुस्लीम (९.५ टक्के) आणि कॅथलिक (६.१ टक्के). हिंदू विरोधी गुन्ह्यांची संख्या एक टक्का असल्याचे दिसले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या