Ghaziabad fake embassy scandal उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबादमध्ये चक्क एका बनावट दूतावासाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन जैन नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो गाझियाबादच्या कवी नगरमधील एका दुमजली घरातून कथितपणे हा बनावट दूतावास चालवत होता. मुख्य म्हणजे तो स्वतःला अंटार्क्टिकामधील वेस्टार्टिका या मायक्रोनेशनचा राजदूत म्हणवत होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कार्य दलाच्या (एसटीएफ) नोएडा युनिटनुसार या व्यक्तीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (एमईए) बनावट कागदपत्रांचा आणि आंतरराष्ट्रीय करारांच्या आश्वासनांचा वापर करून लोकांना फसविले. त्याचा दूतावास जरी खरा नसला तरी वेस्टार्टिका हे मायक्रोनेशन अस्तित्वात आहे. या घटनेमुळे पुन्हा मायक्रोनेशन चर्चेत आली आहेत. त्याचा नेमका अर्थ काय? नऊ वर्षांपासून बनावट दूतावास कसे सुरू होते? या घोटाळ्याचा पर्दाफाश कसा झाला? जाणून घेऊयात.

मायक्रोनेशन म्हणजे काय?

  • मायक्रोनेशन म्हणजे ‘बनावट’ देश. जगभरात असे अनेक मायक्रोनेशन्स आहेत जे सार्वभौमत्वाचा दावा करतात, परंतु कोणत्याही देशाने किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याने त्यांना मान्यता दिलेली नाही.
  • या बनावट देशांना कायदेशीर आधाराचा अभाव असूनही त्यांनी स्वतःची नाणी, पोस्ट तिकिटे, राष्ट्रीय गीत, झेंडे आणि अगदी पासपोर्ट तयार केले आहेत.
  • १९६० च्या दशकापासून आजवर अनेक मायक्रोनेशन उदयास आली आहेत.
  • अमेरिकन लेखक लेस्टर हेमिंग्वे यांनी १९६४ मध्ये जमैकाच्या किनार्‍यापासून सहा मैल अंतरावर पोलाद, लोखंडी पाईप आणि खडकांसह बांबूचा तराफा बांधून न्यू अटलांटिसची स्थापना केली. त्यांनी दावा केला की ते पूर्ण सार्वभौमत्वाचे बेट आहे. मात्र, हा तराफा एका चक्रीवादळामुळे नष्ट झाला.

प्रिंसिपॅलिटी ऑफ सीलँडसारखी मायक्रोनेशन अजूनही अस्तित्वात आहेत. हे उत्तर समुद्रातील एक बेट आहे, जे दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याने वापरले होते. माजी सैनिक पॅडी रॉय बेट्स यांनी १९६७ मध्ये त्यांनी या जागेचा ताबा घेऊन त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यांनी त्याचे नाव प्रिंसिपॅलिटी ऑफ सीलँड असे ठेवले. त्यांचा स्वतःचा ध्वज, चलन, राष्ट्रीय गीत, तिकिटे आणि फुटबॉल संघदेखील आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक मायक्रोनेशन आहेत, ज्यापैकी पहिले मायक्रोनेशन १९७० मध्ये स्थापित झाले. त्याचे नाव प्रिंसिपॅलिटी ऑफ हट्ट रिव्हर आहे. रिपब्लिक ऑफ लँब हे स्कॉटलंडच्या किनाऱ्यावरील एक बेट आहे. हे बेट स्पून ब्लेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरी गेलर यांनी विकत घेतले. हे मायक्रोनेशन लोकांना नागरिकत्व देते आणि सर्व उत्पन्न ‘सेव्ह अ चाइल्ड्स हार्ट’ या इस्रायली धर्मादाय संस्थेकडे जाते. ही संस्था जगभरातील हृदयविकार असलेल्या मुलांना उपचार प्रदान करते.

हर्षवर्धन जैन गाझियाबादच्या कवी नगरमधील एका दुमजली घरातून कथितपणे हा बनावट दूतावास चालवत होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

तसेच, रिपब्लिक ऑफ मिनर्व्हा हे फिजी आणि टोंगा या पॅसिफिक बेटांमधील विवादित प्रवाळ खडकांवर बांधलेले एक कृत्रिम बेट आहे. दक्षिण स्वीडनच्या कुल्लाबर्ग येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्गम ठिकाणी बांधलेल्या दोन मोठ्या शिल्पांना बेकायदा ठरवले होते. त्याचा निषेध म्हणून १९८६ मध्ये कलाकार लार्स विल्क्स यांनी लाडोनियाचे रॉयल रिपब्लिक तयार केले. राणी कॅरोलिनद्वारे शासित लॅडोनिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कला आणि सर्जनशीलता यांना प्रोत्साहन देते. स्वयंघोषित स्वामी नित्यानंदने स्थापन केलेला तथाकथित देश कैलासदेखील एक मायक्रोनेशन आहे. नित्यानंदवर भारतात बलात्कार आणि अपहरणचे आरोप आहेत. बीबीसीनुसार, नित्यानंदने इक्वेडोरच्या किनार्‍यावर एक बेट विकत घेतले, त्याचे नाव ‘कैलास’ असल्याचा तो दावा करतो.

मायक्रोनेशनचा वापर कशासाठी?

या बनावट राष्ट्रांचे निर्माते किंवा संस्थापक यांना माहीत असते की, त्यांची राष्ट्रे वास्तविक नाहीत. मात्र, तरीही ते गैर कामांसाठी, मजेसाठी आणि कधीकधी निषेध करण्यासाठी या राष्ट्रांचा वापर करतात. ‘हाऊ टू रूल युवर ओन कंट्री: द विअर्ड अँड वंडरफुल वर्ल्ड ऑफ मायक्रोनेशन्स’ या पुस्तकाचे सहलेखक हॅरी हॉब्स यांनी फोर्ब्सला सांगितले, “सर्वसाधारणपणे लोक हे मजेसाठी करतात आणि बरेच जण समुदाय तयार करण्याचा एक मार्ग म्हणूनही हे करतात. त्यांनी पुढे म्हटले, “गे अँड लेस्बियन किंगडम ऑफ द कोरल सी आयलँड्स प्रसिद्ध आहे. समलिंगी विवाहांवर बंदी घालणाऱ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियापासून वेगळे होऊन एक समलिंगी आणि लेस्बियन राज्य स्थापन केले. ते ग्रेट बॅरियर रीफमधील एका बेटावर गेले, स्वतःचा ध्वज लावला आणि एक देश स्थापन केला.” २००२ मध्ये, लार्स विल्क्स यांना जगभरातील स्थलांतरित आणि निर्वासितांकडून नागरिकत्वासाठी अर्ज प्राप्त झाले, कारण त्यांचे असे मानणे होते की, लाडोनिया एक वास्तविक देश आहे. मुख्य म्हणजे, गे अँड लेस्बियन किंगडम ऑफ द कोरल सी आयलँड्सला इतर देशांतील समलैंगिक लोकांकडूनदेखील आश्रयासाठी विनंत्या येत असल्याची माहिती आहे.

हर्षवर्धन जैनने लोकांना कसे फसवले?

उत्तर प्रदेश एसटीएफने गाझियाबादमध्ये बनावट दूतावासावर छापा टाकून हर्षवर्धन जैनला अटक केली आहे. या व्यक्तीने कवी नगरमधील एका घरात बनावट दूतावास तयार केले. त्याबाहेर अनेक महागड्या गाड्या ठेवल्या होत्या आणि हे ठिकाण वेस्टार्टिकाचा अधिकृत दूतावास असल्याचा दावा केला होता. अमेरिकन नौदलातील अधिकारी ट्रॅव्हिस मॅकहेन्री यांनी २००१ मध्ये ‘वेस्ट आर्क्टिका’ची स्थापना केली आणि नंतर स्वतःला त्याचे ग्रँड ड्यूक म्हणून नियुक्त केले. अंटार्क्टिकामध्ये स्थित, वेस्ट आर्क्टिकाचे क्षेत्रफळ ६,२०,००० चौरस मैल आहे आणि मॅकहेन्री यांनी अंटार्क्टिका करार प्रणालीतील एका पळवाटेचा वापर करून स्वतःला शासक म्हणून घोषित केले. वेस्ट आर्क्टिका असा दावा करते की, तिचे २,३५६ नागरिक आहेत, परंतु त्यापैकी कोणीही प्रत्यक्षात तिथे राहत नाही.

“जैन वेस्टार्टिका, साबोर्गा, पौल्व्हिया आणि लॅडोनियाचा राजदूत असल्याचा दावा करत होता. यापैकी कोणतीही ठिकाणे सार्वभौम राष्ट्रे म्हणून ओळखली जात नाहीत,” असे एसटीएफ छाप्याचे नेतृत्व करणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी (एसएसपी) सुशील घुले यांनी माध्यमांना सांगितले. जैनने फसवणुकीसाठी स्वतःचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह जागतिक नेत्यांबरोबरचे फोटो मॉर्फ केले होते आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे बनावट शिक्के असलेली प्रमाणपत्रे वापरली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या चार आलिशान गाड्या, १२ मायक्रोनेशन्सचे ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’, परराष्ट्र मंत्रालयाचे स्टॅम्प असलेली कागदपत्रे, ३४ देशांचे स्टॅम्प, ४४ लाख रुपये रोख, परकीय चलन आणि १८ डिप्लोमॅटिक नंबर प्लेट जप्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनुसार, या बनावट दूतावासाद्वारे त्याने परदेशी गुंतवणूक किंवा कामाच्या शोधात असणाऱ्या लोकांची फसवणूक केली. जैनने आंतरराष्ट्रीय परवान्यांचे आश्वासन देऊन खासगी व्यक्ती आणि कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. उत्तर प्रदेश एसटीएफनुसार हर्षवर्धनवर लोकांना परदेशात काम मिळवून देण्यासाठी नोकरी रॅकेट चालवण्याचा आणि मनी लाँडरिंग नेटवर्कचा भाग असल्याचादेखील आरोप आहे. त्याच्याकडून बनावट राजनयिक पासपोर्ट आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे शिक्केही जप्त करण्यात आले.