संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक तापमानवाढीवर तत्परतेने नियंत्रण आणता आले नाही तर विनाशकारी परिणाम भोगावे लागतील, असा धोक्याचा इशारा अनेकदा देण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने नव्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नुकताच एका धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला असून येत्या पाच वर्षांत जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. त्याशिवाय भारतासह भारतीय उपखंडातील अनेक देशांना यंदाच्या उन्हाळ्यात उकाड्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत असून हा हवामान बदलाचाच परिणाम असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या अहवालाविषयी…

जागतिक हवामान संघटनेचा अहवाल काय सांगतो?

जागतिक हवामान संघटना ही संयुक्त राष्ट्रांची हवामानविषयक काम करणारी संघटना आहे. या संघटनेने नुकताच हवामान बदलाविषयी आणि जागतिक तापमानवाढीविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला. जागतिक तापमानवाढीमुळे जगावर होणाऱ्या विनाशकारी परिणामांवर या अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांत जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णताही वाढणार आहे. गेल्या ३० वर्षांच्या सरासरी जागतिक तापमानाच्या आधारे हा खुलासा करण्यात आला आहे. याची ६६ टक्के शक्यता असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे. गेल्या वर्षी आलेल्या अहवालात ही शक्यता ५०-५० अशी होती. मात्र पुन्हा केलेल्या अभ्यासात ही शक्यता वाढली आहे. ‘पॅरिस हवामान करारा’मध्ये जे जागतिक तापमान निश्चित करण्यात आले होते, त्यापेक्षा किती तरी अधिक तापमानाचा सामना जगाला करावा लागण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते?

पुढील पाच वर्षांत म्हणजे २०२३ ते २०२८ यांपैकी एक वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदले जाणार आहे, याची ९८ टक्के शक्यता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१६ हे वर्ष आतापर्यंत सर्वाधिक उष्ण वर्ष आहे. त्या वर्षाचे वार्षिक सरासरी तापमान औद्योगिकीकरणपूर्व काळापेक्षा (१८५० ते १९०० कालावधी) सरासरी १.२८ अंश सेल्सिअस जास्त होते. २०२२ हे वर्ष औद्योगिकीकरणपूर्व काळापेक्षा सरासरी १.१५ अंश सेल्सिअस अधिक उष्ण होते. मात्र पुढील पाच वर्षांतील एक वर्षात विक्रमी तापमान असणार असून त्याचे मोठे दुष्परिणाम जगातील अनेक देशांना भोगावे लागणार आहेत.

विश्लेषण : सर्वसामान्यांकडूनही सायबर खंडणीची वसुली, सायबर हल्लेखोरांपासून संरक्षणासाठी काय करावे?

जागतिक तापमानवाढीचा भारतावर काय परिणाम?

सध्याच्या उन्हाळ्यात भारतासह शेजारील राष्ट्रांत उकाड्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारतात सध्याच्या उन्हाळ्यात सरासरी तापमान ३५ अंशापर्यंत असून त्याचा असह्य त्रास सहन करावा लागत आहे. भारतात आणि काही शेजारील देशांमध्ये अनुभवलेल्या उष्णतेच्या लाटेचे श्रेय बहुधा हवामान बदलाला दिले जाऊ शकते, असे जागतिक हवामान संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. हवामान बदलामुळे भारत, बांगलादेश, लाओस आणि थायलंडमध्ये एप्रिलच्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता किमान ३० पट अधिक आहे. अशा घटना शंभर वर्षांतून एकदाच घडण्याची अपेक्षा होती, परंतु हवामान बदलाच्या परिस्थितीनुसार आता दर पाच वर्षांनी एकदा अशा घटना घडण्याची शक्यता आहे, असे हा अहवाल सांगतो.

जागतिक तापमानवाढीची कारणे काय?

जागतिक तापमानवाढीची अनेक कारणे असली तरी हरितगृह वायू आणि एल निनो यामुळे जगाचे तापमान वाढत असल्याचे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे. जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्यास अंशत: एल निनो जबाबदार असल्याचे हा अहवाल सांगतो. एन निनो ही नैसर्गिक स्थिती असली तरी त्यामुळे जागतिक उष्णतेत वाढ होत असून दुष्काळी स्थिती निर्माण होते. विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील एल निनो विकसित झाल्यानंतर वर्षभरात जागतिक तापमानात वाढ होते. म्हणजे २०२४ मध्ये एल निनोमुळे अतिरिक्त तापमानवाढ होऊ शकते. वातावरणात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनचे प्रमाण अधिक वाढल्याने तापमानवाढीचे हे एक कारण सांगितले जाते.

रशियाकडून कच्चे तेल घेऊन भारत पाश्चिमात्य देशांना कशी मदत करतोय?

पाच वर्षांत काय परिणाम होण्याची शक्यता?

तापमानवाढीमुळे पूर, दुष्काळ, अतिरिक्त पाऊस, बर्फ वितळणे, वणवे, उष्णतेच्या लाटा आदी परिणाम होतात आणि पुढील पाच वर्षांत यात वाढ होण्याची शक्यता आहे. युरोप व चीनमध्ये अलीकडे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटा, ‘हॉर्न ऑफ आफ्रिके’त (सोमालिया, इथिओपिया, जिबूती आदी देश) निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि गेल्या वर्षी पाकिस्तानात आलेला पूर हे तापमानवाढीचेच परिणाम आहेत. एल निनोमुळे उत्तर ॲमेझॉन वनक्षेत्रात कमी पाऊस झाला आणि या जंगलात आगी लागण्याच्या घटनाही वाढल्या. जागतिक तापमानवाढीमुळे आर्क्टिक प्रदेशात बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पुढील पाच वर्षांत असे परिणाम अनेक देशांना भोगावे लागण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global temperature increased impact on india print exp pmw
First published on: 19-05-2023 at 10:51 IST