दत्ता जाधव
संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) यंदा भारतासह जगभरात गहू उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यविषयी…
गहू उत्पादनाचा एफएओचा अंदाज काय?
भारतासह जगभरात यंदा गहू उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज एफएओने व्यक्त केला आहे. २०२४ या वर्षात जगातील एकूण गहू उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक टक्क्याने वाढ होऊन जागतिक गहू उत्पादन ७९.७ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापैकी चीनमध्ये १३.७, युरोपियन युनियनमध्ये १३.४, भारतात ११.३, रशियात ८.५, अमेरिका ४.९, कॅनडा ३.१, पाकिस्तानात २.८, ऑस्ट्रेलियात २.४, युक्रेनमध्ये २.२, तुर्कीत १.९, अर्जेंटिनात १.६, ब्रिटनमध्ये १.४ आणि इराणमध्ये १.४ कोटी टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे.
युरोप, अमेरिकेतील स्थिती काय?
एफएओच्या अंदाजानुसार यंदा उत्तर अमेरिकेत थंडीच्या काळात गहू लागवडीत सहा टक्क्यांनी घट झाली होती. तरीही उत्पादनात वाढ झाल्यामुळे सरासरी इतके उत्पादन होण्याचा अंदाज आहे. युरोपात थंडीच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे गव्हाच्या लागवडीला उशीर झाला होता. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी या प्रमुख गहू उत्पादक देशात लागवड घटली होती. युरोपियन युनियनमधील देशांत गहू लागवडीत घट झाली होतीच, शिवाय एल-निनो, जागतिक हवामान बदलामुळे यंदा युरोपात थंडी कमी पडली होती. बर्फवृष्टीही कमी झाली होती. पर्जन्यवृष्टीतही घट झाली होती. त्यामुळे युरोपियन युनियनमधील देशांत सरासरीच्या तुलनेत गहू उत्पादनात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात युरोपियन युनियनमध्ये १३.३ कोटी टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे.
हेही वाचा >>> आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
आफ्रिका, ब्रिटनसह उर्वरित जगात स्थिती काय?
ब्रिटन, आयर्लंडमध्ये यंदा पोषक स्थिती नसल्यामुळे गव्हाच्या लागवडीत घट झाली होती. त्यामुळे उत्पादनातही घट होण्याचा अंदाज आहे. तुर्कीये, इराणमध्ये सरासरी उत्पादनाचा अंदाज आहे. हे दोन्ही मध्य आशियातील प्रमुख गहू उत्पादक देश आहेत. उत्तर आफ्रिकेत यंदा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अल्जेरिया, ट्युनिशिया, मोरोक्कोत गहू लागवड कमी झाल्यामुळे उत्पादनातही घट होण्याचा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेत कमी पाऊस पडल्यामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. उत्पादनातही घट होण्याचा अंदाज आहे. आफ्रिकेतील कमी पावसाचा शेजारील देशांवरही परिणाम होताना दिसत आहे. ब्राझीलमध्ये यंदा गहू लागवडीला फाटा देऊन मका लागवडीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा ब्राझीलमध्ये मका उत्पादन वाढण्याचा, तर गहू उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. अर्जेंटिनामध्ये २०२३मध्ये दुष्काळ पडला होता. यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे लागवडीत वाढ झाली आहे. उत्पादनातही चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे.
गहू निर्यातदार रशिया-युक्रेनची स्थिती काय?
रशिया-युक्रेन हे युरोप आणि अरबी देशांना गव्हाचा पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. पण, उभय देशात संघर्ष सुरू आहे. संघर्षामुळे यंदा युक्रेनमध्ये गव्हाच्या लागवडीत घट झाल्यामुळे उत्पादनातही घटीचा अंदाज आहे. संघर्षाच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाता येत नव्हते. युद्धग्रस्त स्थितीमुळे आर्थिक संकटांचाही सामना करावा लागला आहे. त्यामुळे युक्रेनमधील गहू उत्पादनाला फटका बसणार आहे. युक्रेनमध्ये २.२ कोटी टन उत्पादनाचा अंदाज आहे. रशियात गव्हाच्या लागवडीला पोषक स्थिती होती. थंडीही चांगली होती, त्यामुळे लागवड वाढली असून, उत्पादनातही वाढीचा अंदाज असून, ८.५ कोटी टनांवर उत्पादन जाण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?
आशियात गहू उत्पादनाची स्थिती काय?
आशिया खंडात यंदा गहू उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. भारत, चीन, पाकिस्तानमध्येही गहू उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. पाकिस्तानातही गहू उत्पादनात वाढ होऊन २.८३ कोटी टन उत्पादनाचा अंदाज आहे. चीनमध्ये उत्पादन वाढीचा अंदाज आहे. पण, चीनची देशांतर्गत मागणीही मोठी असल्यामुळे चीनमध्ये गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ झाली आहे. चीनमध्ये यंदा १३.७ कोटी टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. यंदा भारतात गहू उत्पादन ११.३ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे.
भारतातील उत्पादन वाढीचे कारण काय?
गेली दोन वर्षे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच गहू उत्पादक पट्ट्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. त्यामुळे केंद्र सरकारच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष गहू उत्पादनात घट होत होती. यंदा अद्यापपर्यंत हिमालयीन रांगामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे झंझावात सक्रिय आहेत. त्यामुळे उत्तर भारताला उष्णतेच्या झळांचा फटका बसला नाही. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांमुळेही फारसे नुकसान झाले नाही. गव्हाचे पीक पक्व होण्याच्या काळात थंडी राहिल्यामुळे फायदा झाला आहे. उत्पादनही चांगले मिळत आहे. काढणीच्या काळात तापमानवाढ झाल्यामुळे काढणीही सुरळीत होत आहे. त्यामुळे गहू उत्पादन आजवरचे उच्चांकी म्हणजे ११२० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे.
एकूण अन्नधान्य उत्पादनाची स्थिती काय राहील?
जगात एकूण अन्नधान्य उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. एफएओने आपल्या या पूर्वीच्या अंदाजात वाढ करून अन्नधान्य उत्पादन २८४ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्पादन वाढीसोबत अन्नधान्याच्या वापरातही वाढ होणार आहे. यंदाच्या वर्षांत अन्नधान्यांचा वापर २८२.३ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत १.१ टक्क्यांनी म्हणजे ३.०४ कोटी टनांनी वाढेल. प्रामुख्याने अल्जीरिया आणि भारतात पशूंसाठी चारा म्हणून गहू आणि मक्याचा वापर वाढल्यामुळे अन्नधान्याच्या वापरात वाढ होण्याचा अंदाज आहे. जागतिक गव्हाचा वापर १.८ टक्क्यांनी वाढून ७९.३ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे. तांदळाचा वापर २०२३-२४मध्ये ५२.४ कोटी टनांवर जाण्याचा अंदाज आहे. ही वाढ गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ लाख टनांनी जास्त आहे. प्रामुख्याने भारतात २०२२ पासून अन्नधान्य, पशूखाद्य म्हणून तांदळाचा वापर वाढला आहे. एफएओने मक्याच्या उत्पादनातही ५.३ टक्क्यांनी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. जगात तृणधान्यांचे उत्पादन, वापरही वाढला आहे. युक्रेनमधून मक्याची वाढती निर्यात आणि चीनमधून वाढलेल्या मागणीमुळे अन्नधान्याचा जागतिक व्यापारही १.३ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
dattatray.jadhav2009@gmail.com