Hafiz Saeed Plotting India Attacks Using Bangladesh Launchpad : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने भारतावर हल्ला करण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्याने बांगलादेश येथे दहशतवादी तळ उभारल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सीमेपलीकडून होणार्या संभाव्य घुसखोरीवर करडी नजर ठेवली जात आहे. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीक चांगलीच वाढली आहे. नेमकी काय आहेत यामागची कारणे? त्याविषयीचा हा आढावा….
पाकिस्तानचे नौदलप्रमुख सध्या चार दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. याव्यतिरिक्त १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशाच्या मुख्य बंदरात दाखल झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात जवळचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या राजकीय बदलामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. हाफिज सईद आणि त्याच्या संघटनेने यापूर्वी भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणलेले आहेत. त्यामध्ये २००८ चा मुंबई हल्ला आणि २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ल्याचा समावेश आहे.
भारतावर हल्ला करण्याचा कट?
भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी बांगलादेशचा वापर करीत असल्याचा दावा केला जात आहे. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला सैफ याने केलेल्या एका वक्तव्यामुळे या दाव्यांना अधिकच बळ मिळाले आहे. ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे झालेल्या सभेत ‘हाफिज सईद शांत बसलेला नाही, तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे’ असे विधान सैफने केले होते. त्याच्या या विधानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आधीच ‘पूर्वीय पाकिस्तान’ (आताचा बांगलादेश) मध्ये सक्रिय असून ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी ते सज्ज आहेत, असा दावाही तो या व्हिडीओतून करताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : Cancer Symptoms : ‘या’ साध्या चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगतं? तज्ज्ञांचा दावा काय?
दहशतवाद्यांची चिथावणीखोर भाषणे
हाफिज सईदने बांगलादेशमधील काही तरुणांना जिहादसाठी प्रवृत्त करून दहशतवादी प्रशिक्षणही दिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पाकिस्तानमधील ‘मरकज़ी जमीयत अहले हदीस’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इब्तिसाम इलाही जहीर हा हाफिज सईदचा निकटवर्तीय मानला जातो. तोदेखील २५ ऑक्टोबर रोजी ढाका येथे पोहोचल्याची माहिती आहे. जहीरने नुकताच बांगलादेशच्या भारताला लागून असलेल्या जिल्ह्यांचा दौरा केला आणि कट्टर इस्लामी नेत्यांशी भेट घेत भडकाऊ भाषणे केली आहेत. “इस्लामच्या रक्षणासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तयार राहा… तुमच्या मुलांनाही त्यासाठी तयारीत ठेवा. धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी शक्तीविरोधात आपण एकजुटीने उभे राहिले पाहिजे. पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत सर्व मुस्लीम एकत्र येतील,” असे त्याने आपल्या भाषणात म्हटले आहे.
काश्मीरबद्दल वादग्रस्त विधाने
“पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत सर्व मुस्लीम धर्मनिरपेक्ष शक्तींविरुद्ध एकत्र येतील. भारतातील इस्लामविरोधी कायदे आणि अन्यायकारक कृतींविरुद्ध आवाज उठवणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे. अल्लाहच्या कृपेने तो दिवस दूर नाही, जेव्हा काश्मीर पाकिस्तानचा अविभाज्य भाग होईल,” अशी चिथावणीखोर वक्तव्येही त्याने आपल्या भाषणातून केली आहेत. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०२५ नंतर जहीरने दुसऱ्यांदा बांगलादेशचा दौरा केला आहे. त्याच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा हेदेखील ढाक्यात आले होते. या सर्व घटनांमुळे बांगलादेश-पाकिस्तानमधील वाढती जवळीक भारतासाठी गंभीर सुरक्षा चिंतेचा विषय झाली आहे.
पाकिस्तानमधील नेतेही बांगलादेश दौऱ्यावर
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलाच्या या कारवाईत हाफिज सईदच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. त्याचाच बदला घेण्यासाठी हाफिजने बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती आहे. आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही बांगलादेशचे वारंवार दौरे करीत आहेत. पाकिस्तानचे नौदलप्रमुख नवीद अशरफ रविवारी चार दिवसांच्या दौऱ्यासाठी ढाका येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या एक दिवसआधी १९७१ नंतर प्रथमच पाकिस्तानी युद्धनौका बांगलादेशाच्या मुख्य बंदरात दाखल झाली आहे.
हेही वाचा : Pakistan Constitution : पाकिस्तानची वाटचाल हुकूमशाहीकडे? संविधान बदलण्याचा घाट नेमका कुणासाठी?
पाकिस्तान-बांगलादेशमधील जवळीक वाढली
युनूस सरकार सत्तेवर आल्यापासून बांगलादेश आणि पाकिस्तानचे संबंध झपाट्याने सुधारले आहेत. खुद्द युनूस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची दोनदा भेट घेतली आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील व्यापार पुन्हा सुरू झाला आहे. तसेच व्हिसामुक्त प्रवास, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणि ‘ट्रॅक-2’ यांसारख्या उपक्रमांना गती देण्यात आली आहे. बांगलादेशात वाढणारी पाकिस्तानची घुसखोरी आणि दहशतवादी संघटनांच्या हालचाली भारताच्या सुरक्षेसाठी संभाव्य धोका मानल्या जात आहे. या सर्व घडामोडींवर भारतीय सुरक्षा यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
