Heart attack jaw pain symptoms: मुंबईतील कालिना भागातील ३० वर्ष कार्यरत असलेल्या एका प्रसिद्ध दंतचिकित्सकांच्या दवाखान्यातील ही घटना. अलीकडॆच एक सत्तरी पार केलेले गृहस्थ धापा टाकत दवाखान्यात येऊन पोहोचले. ते केवळ १० मिनिटांचंच अंतर चालून आले होते. परंतु, त्यांची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना काहीही अधिकचं न विचारता आधी बसायला सांगितलं. त्यांना शांत होवू दिलं. दवाखान्यात येण्याचं कारण दाढ प्रचंड दुखतेय, हे होतं. परंतु, ते ज्या अवस्थेत दवाखान्यात पोहोचले होते त्यावरून डॉक्टरांच्या मनात आधीच पाल चुकचुकली होती. परंतु, त्यांनी पेशंटची हिस्ट्री, इतर चाचण्या करण्याचा शिकस्ता पूर्ण केला. त्या पेशंटला इतर कुठलाही आजार नव्हता. गेले तीन चार दिवस दाढ दुखत होती. काल रात्री दुखणं वाढलं म्हणून त्यांनी दवाखाना गाठला.
डॉक्टरांनी केलेल्या नियमित तपासणीत त्यांचे दात ठणठणीत होते. X-Ray मध्ये काहीही आढळून आले नाही. त्यामुळे डॉक्टरांची शंका अधिकच गडद झाली. कारण, काही वेळा हार्ट अटॅक/ अँजिनल पेन दाढदुखीच्या रूपातही प्रत्यक्षात येऊ शकतो. म्हणूनच त्यांनी त्या पेशंटला शेजारी असलेल्या physician कडे पाठवले. काही वेळाने ज्या डॉक्टरांकडे त्यांना पाठवले होते, त्यांनी कॉल करून त्या पेशंटचा ECG काढल्यावर myocardial infraction डिटेक्ट झाले आणि त्याला थेट एशियन हार्टला अॅडमिट करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एकुणात तीन डॉक्टरांच्या सजकतेमुळे एका पेशंटच्या गंभीर स्वरूपाच्या आजाराचे अचूक निदान झाले आणि वेळीच त्याचे प्राण वाचले. यात महत्त्वाची बाब म्हणजे दाताच्या दवाखान्यात हृदयरोगाचे निदान झाले होते.
म्हणूनच,लोकसत्ता डॉट कॉमने त्या दंतचिकित्सकांशी संपर्क साधून हृदय आणि दातदुखी यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अशा प्रकारची लक्षणं हल्लीच दिसतात की, आधीपासून यावर संशोधन झाले आहे. सामान्य लोकांनी अशा परिस्थिती काय करावे; हेही समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
डॉक्टर (डॉक्टरांनी केलेल्या विनंतीवरून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) म्हणाले, पूर्वीपासून या गोष्टीवर संशोधन झाले आहे. त्यांच्या विद्यार्थी दशेतच त्यांना याची कल्पना होती. सगळ्या प्रकारची दातदुखी ही काही याच दिशेने जाणारी नसते. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. या गृहस्थांच्या बाबतीत हे घडलं ते रेअर सिम्टम्स आहे. हा प्रकार सामान्य नाही. हे Referred pain आहे. असं असलं तरी लोकांनी एखादं दुखण्याकडे सामान्य लक्षण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये.
डॉक्टरांनीही पेशंटवर वेळ खर्च करावा
योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हार्ट अटॅक आणि अॅसिडिटी यांची लक्षण सारखीच असतात. त्यामुळे बऱ्याचदा लोकं अॅसिडिटी झाली आहे, असं म्हणून दुर्लक्ष करतात. परंतु, काही वेदना या Referred pain स्वरूपाच्या असू शकतात. त्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांनीही पेशंटवर वेळ खर्च केला पाहिजे. कारण, पेशंटशी बोलल्यावर मूळ दुखणं काहीतरी वेगळं असून शकत असंही निदर्शनात येऊ शकतं. फक्त वरवरच्या दुखीवर उपाय करू नये, खोलात जाणं महत्त्वाचं आहे.

साध्या गोष्टींचीही काळजी घ्या
अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला तोंड येतं, ती सामान्य गोष्ट आहे. परंतु, ते फार काळासाठी होत असेल, नॉन हीलिंग आहे किंवा नेहमी प्रमाणे दुर्गंधी किंवा वेदना होत नाहीत, गालाच्या किंवा जिभेच्या बाजूने होतं असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका. बायोप्सी, सॅम्पल टेस्टमुळे इतर काही कारण तर यामागे नाहीना हे समजायला मदत होते. अशा साध्या गोष्टींची काळजी घेतली तर मोठ्या व्याधींवर वेळीच आळा घालता येऊ शकतो.
संशोधन काय सांगते?
दंतचिकित्सकांच्या दवाखान्यात दातदुखी, दंतमूल (pulpal) किंवा दंतरोग (periodontal) यांसारख्या दाताशी संबंधित तक्रारी येतात. परंतु काही दातदुखी दाताशी संबंधित नसतात. अशा वेदनांना गैर-दंतजन्य (nonodontogenic) म्हणतात. म्हणजेच रुग्णाला वेदना दातात जाणवत असली तरी प्रत्यक्ष स्त्रोत दात नसतो, तर इतर कुठल्या भागातून तो उत्पन्न होतो.
हेटेरोटोपिक वेदना
अशा प्रकारच्या वेदनांना हेटेरोटोपिक (heterotopic) वेदना असे संबोधले जाते. हेच वैद्यकांसाठी सर्वात मोठे आव्हान असते. अनेकदा चुकीच्या निदानामुळे परिणामकारक उपचाराऐवजी निष्फळ आणि अनावश्यक उपचार होतात.
हेटेरोटोपिक वेदनांची योग्य ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक असते, कारण उपचाराचा यशस्वी परिणाम हा वेदना जिथे जाणवते त्या जागेवर नव्हे, तर तिच्या मूळ स्त्रोतावर अवलंबून असतो.
अशाच हेटेरोटोपिक दातदुखींपैकी एक शक्य कारण म्हणजे हृदयाशी संबंधित वेदना (cardiac pain). अशा प्रकारच्या वेदनांची त्वरित ओळख पटवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे रुग्णाला योग्य आरोग्यतज्ज्ञांकडे वेळेत पाठवून आवश्यक तो उपचार मिळवून देता येतो.
Referred pain म्हणजे काय?
अलीकडील काळात संशोधकांनी हृदयविकाराशी संबंधित वेदना (उदा. अँजायना पेक्टोरिस) यांचा उगम आणि त्यामागील यंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये वेदना इतर भागांत जाणवण्याची (referred pain) सामान्य तक्रार देखील समाविष्ट आहे. हृदयातील नॉसिसेप्टर्स (वेदनासंवेदक रिसेप्टर्स), रासायनिक मध्यस्थे (chemical mediators), अफेरेंट मार्ग (afferent pathways) आणि मेंदूतील केंद्रीय न्यूरल यंत्रणा हे महत्त्वाचे घटक म्हणून अभ्यासले गेले आहेत.
आणि मेंदूपर्यंत वेदनेचा संदेश पोहोचतो
या प्रक्रियांची अचूक यंत्रणा अद्याप पूर्णपणे समजलेली नाही. तरी बहुतांश संशोधन असे दर्शवते की, हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाला तर त्याला इस्किमिया म्हणतात. अशा वेळी हृदयात काही रासायनिक द्रव्ये (जसे की ब्रॅडीकिनिन, सेरोटोनिन, अॅडेनोसिन) जास्त प्रमाणात तयार होतात. ही द्रव्ये आपल्या मज्जातंतूंना (नसा) उत्तेजित करतात आणि मेंदूपर्यंत ‘वेदनेचा’ संदेश पोहोचवतात.
म्हणून जबडा, दात किंवा मानेत जाणवते हृदयविकाराची वेदना
आपल्या छातीतील आणि जबडा-दातातील नसांचा मार्ग जवळजवळ एकाच ठिकाणी जाऊन मेंदूत मिळतो. त्यामुळे हृदयातील वेदना मेंदूला कधी कधी जबडा, दात किंवा मान याठिकाणची वेदना असल्यासारखी वाटते. यालाच Referred pain म्हणजेच ‘परावर्तित वेदना’ म्हणतात. म्हणूनच, हृदयजन्य वेदना कधी कधी अँजायना पेक्टोरिसची पारंपरिक लक्षणे न दाखवता थेट Trigeminal क्षेत्रात (चेहरा, जबडा, दात) जाणवू शकते. दुर्मीळ प्रसंगी जबड्याची किंवा दातांची वेदना हीच एकमेव तक्रार असते.
जबड्यातील वेदना आणि हृदयविकार
Toothache of Cardiac Origin या शोध निबंधात स्पेनमधील संशोधक पेणारोचा दियागो आणि सहकाऱ्यांनी दोन रुग्णांची नोंद केली आहे. त्या रुग्णाच्या डाव्या खालच्या जबड्यात सतत वेदना जाणवत होती. तपासणीनंतर लक्षात आलं की, ही वेदना दातांमुळे नव्हती, तर हृदयविकारामुळे चेहऱ्यात जाणवणारी परावर्तित वेदना (referred pain) होती (Penarrocha Diago M, Silvestre Donat FJ, Rodríguez Gil R. Facial pain of Cardiac Origin. Rev Stomatol Chir Maxillofacial. 1990; 91(6):477-479). मुंबईतील दाताच्या दवाखान्यात घडलेली घटना अशाच स्वरूपाची होती. त्या रुग्णाची डावी दाढ दुखत होती.
referred pain ओळखणं हे डॉक्टरांसाठी महत्त्वाचं
या घटनेतून हे स्पष्ट होतं की, referred pain ओळखणं हे डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही महत्त्वाचं आहे. कारण, ज्या ठिकाणी वेदना जाणवते ती खरी समस्या नसून, तिचा स्रोत शरीराच्या दुसऱ्या अवयवात दडलेला असून असतो. जागरूकता, तपासण्या आणि वेळेवर घेतलेला तज्ज्ञांचा सल्ला यामुळे अनेक जीव वाचू शकतात.