भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) एप्रिल ते जूनदरम्यान देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच काळात देशभरात निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे यंदा निवडणुकांना तापमानवाढीचा फटका बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी (१ एप्रिल) एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. “एप्रिल २०२४ मध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे,” अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या तापमानवाढीचा परिणाम मतदानावर होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश व सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काय सांगितले? तीव्र तापमानाचा मतदानावर परिणाम होईल का? मतदारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? याबद्दल जाणून घेऊ या.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेची लाट १० ते २० दिवस राहण्याची शक्यता आहे. सामान्यतः उष्णतेची लाट ही चार ते आठ दिवस राहते. राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र-कच्छ, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. “या वर्षीच्या उन्हाळी हंगामात देशातील बहुतांश प्रदेशांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक असेल. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील काही भागांत तापमान सामान्य असेल,” अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसला दिली.

गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाला उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक सामना करावा लागणार आहे. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, ओडिशा व आंध्र प्रदेशलाही या लाटेचा फटका बसणार आहे, असे वृत्त डेक्कन हेराल्ड (डीएच)ने दिले आहे. हवामान विभागाने असा इशारा दिला आहे की, उष्णतेची लाट तीन महिन्यांत सामान्यपेक्षा जास्त असेल. आंध्र प्रदेश, सौराष्ट्र-कच्छ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात एप्रिल महिन्यात सामान्यतः एक ते तीन दिवस राहणारी उष्णतेची लाट यंदा दोन ते आठ दिवस राहण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांना मात्र तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळेल.

उष्णतेच्या लाटेचा मतदानावर परिणाम होईल का?

आगामी निवडणुकांमध्ये तीव्र तापमानाचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये तापमान अतितीव्र असणार आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी सावधगिरीचे उपाय करण्याचे आवाहन केले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आपल्या सर्वांसाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. भारत जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.” रिजिजू म्हणाले, “भारतात १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. तर, ४ जूनला मतमोजणी होणार आहे. “भारतातील निवडणुकीदरम्यान लोक निवडणूक रॅली, सभांसाठी बाहेर पडतील. संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रम असतील.”

आगामी निवडणुकांमध्ये तीव्र तापमानाचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांत १०.५ लाख मतदान केंद्रांवर ९७ कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात ४९.७ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला आहेत. ‘डेली पायोनियर’च्या वृत्तानुसार, अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या उन्हाळ्यात निवडणूक प्रक्रियेदरम्यान तापमानात वाढ होणार असून, त्याबाबतचे आजवरचे सर्व विक्रम तोडले जाण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षकांनी सांगितले की, उष्णतेची लाट जास्त काळ राहिल्यास मतदानावर याचा परिणाम दिसू शकतो. उष्णतेच्या लाटेमुळे मतदारांना बूथवर आणणे राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरणार आहे, असे वृत्त ‘डेक्कन हेराल्ड’ने दिले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागते. तापमान उष्ण असल्यास, वृद्ध, गरोदर स्त्रिया आणि अपंग लोकांच्या आरोग्यासाठी ते धोक्याचे ठरू शकते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ८८.३५ लाख विशेष-अपंग मतदार मतदानास पात्र आहेत.

“मतदानाचा हक्क बजावण्यास इच्छुक असलेले अपंग लोक, वृद्ध, गरोदर स्त्रिया व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींवर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होणार आहे,” असे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले. तेव्हा हा आकडा ६७.४७ टक्के होता. परंतु, २०१९ मध्ये गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व दिल्ली यांसारख्या उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या अनेक राज्यांमध्ये मतदान ७० टक्क्यांपेक्षा कमी झाले होते.

मतदारांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आत आहेत?

भारतीय निवडणूक आयोगाकडून कडक उन्हाळ्यात मतदारांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मतदारांवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव होऊ नये यासाठी गेल्या महिन्यात मतदान मंडळाकडून निवडणूक अधिकाऱ्यांसाठी सूचनापत्र जारी करण्यात आले.

मतदारांवर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव होऊ नये यासाठी मतदान मंडळाकडून सूचनापत्र जारी करण्यात आले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी इमारतीच्या तळमजल्यावर मतदान केंद्रे उभारली जावीत, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, बूथमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी वेगवेगळी दारे असावीत. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, वैद्यकीय किट यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर पुरुष आणि महिला मतदारांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत आणि त्यांची स्वच्छता राखली जावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

“उष्माघात झाल्यास ‘काय करावे आणि काय करू नये’ यासंबंधीची सूचना असलेली एक प्रत प्रत्येक मतदाराला द्यावी. उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मतदारांना ओला टॉवेल जवळ ठेवण्याचे आवाहन करावे आणि गरम हवामानात मुलांना मतदान केंद्रांवर आणू नये, असा सल्ला महिला मतदारांना द्या,” असेही सूचनापत्रात नमूद करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक मंडळाने अपंग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य टेबल, खुर्च्या वा बेंच प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक मतदान केंद्राला त्यांच्या वापरासाठी आणि मतदारांसाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन्स (ओआरएस) मिळतील.

हेही वाचा: अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?

मतदार मतदानासाठी तीव्र उन्हात रांगेत उभे असताना स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने स्वतःही काही उपाय करू शकतात. मत देण्यासाठी आपला क्रमांक येईपर्यंत ते स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी निंबू पाण्यासारखे पेय घेऊ शकतात. तसेच घट्ट बसणारे कपडे घालणे टाळू शकतात आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर करू शकतात. उष्णतेची लाट असताना मतदारांनी शक्यतो सकाळच्या वेळेत मतदान करण्याचा प्रयत्न करावा आणि दुपारची वेळ टाळावी.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heatwave in loksabha election affects voting imd rac
First published on: 03-04-2024 at 11:27 IST