सिद्धार्थ खांडेकर
व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आणण्याकामी प्रयत्न केल्याबद्दल शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले पण त्याच वेळी एका मोठ्या वर्गाकडून ‘युद्ध गुन्हेगार’ अशी निर्भत्सना झालेले आंतराष्ट्रीय ख्यातीचे मुत्सद्दी, अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, लेखक, विश्लेषक, विचारवंत डॉ. हेन्री किसिंजर यांच्या निधनाने परराष्ट्र नीती नि भूराजकीय सामरिक धोरण या विषयांवरील एक विशाल ग्रंथच जणू कायमस्वरूपी मिटला. १०० वर्षीय किसिंजर हे अगदी अलीकडेपर्यंत सक्रिय होते. जवळपास ५० वर्षांपूर्वी ते सक्रिय राजकारणातून जवळपास निवृत्त झाले, परंतु त्यानंतरही कित्येक वर्षे त्यांच्या भाषणांना आणि लेखांना प्रचंड मागणी होती. सोव्हिएत महासंघ आणि चीन यांच्याशी अमेरिकेचे संबंध, व्हिएतनाम युद्ध, पश्चिम आशियातील राजकारण, साम्यवादाला वेसण घालण्याविषयी मांडलेले विचार आणि त्यासाठी बिनदिक्कतपणे राबवलेले हस्तक्षेप धोरण, बांगलादेश युद्ध नि भारत अशा विविध प्रतलांमध्ये अमेरिकी नीतीवर किसिंजर यांच्या विचारांचा प्रभाव होता. ‘व्यवहारवादी हितसंबंधां’चे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यासाठी कोणतीही तडजोड करण्यास, वरकरणी आक्षेपार्ह वाटणारी कृती करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. शिवाय आपल्या कृतीचे पांडित्यपूर्ण समर्थन करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्यासाठी आवश्यक अशी उच्चशैक्षणिक आणि वैचारिक बैठक होती. त्यांच्या जीवनगाथेवर धावता दृष्टिक्षेप…
जन्माने जर्मन ज्यू…
हाइन्झ आल्फ्रेड किसिंजर यांचा जन्म २७ मे १९२३ रोजी जर्मनीतील फुर्थ येथे एका ज्यू कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शांततेनंतर आणि विशेषतः अॅडॉल्फ हिटलरकृत नाझीवादाच्या उदयानंतर किसिंजर कुटुंबाला ज्यूविरोधी राजकारणाचे चटके बसू लागले. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. तेथे ‘हाइन्झ’चा ‘हेन्री’ झाला.
हार्वर्ड आणि व्यासंग…
हेन्री किसिंजर अभ्यासात हुशार होते. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवताना इतरही विद्याशाखांमध्ये नैपुण्य दाखवत होते. दुसऱ्या महायुद्धात लष्करात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना मूळ मायभूमी जर्मनीत जाऊन येण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली होती. युद्धभूमीवरून परतल्यानंतर त्यांनी हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला. तेथे इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी अध्यापक वर्गाचा विश्वास संपादन केला. जागतिक राजकारणाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. या विषयावरच त्यांनी तरुण वयात पाक्षिकही सुरू केले. या पाक्षिकाच्या निमित्ताने हार्वर्डमधील अनेक विचारवंतांशी त्यांचा संबंध आला. वयाच्या तिसाव्या वर्षी मर्यादित अण्वस्त्र प्रतिकाराबाबत त्यांनी पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे त्यांचे नाव वॉशिंग्टनमध्ये गाजले. न्यूयॉर्कचे गव्हर्नर नेल्सन रॉकेफेलर यांचे सल्लागार म्हणून किसिंजर काम करू लागले. नेल्सन हे अमेरिकी अध्यक्षपदासाठीही इच्छुक होते. त्यांच्या सल्लागाराची दखल त्यामुळे वॉशिंग्टनमध्येही घेतली गेली. अमेरिकी सत्ताकेंद्राजवळ किसिंजर यांचा प्रवास अशा प्रकारे सुरू झाला.
वॉशिंग्टनमध्ये प्रभाव…
वाक्चातुर्य, आंतरराष्ट्रीय विषयांची सखोल जाण आणि मुख्य म्हणजे अमेरिकी हितसंबंधांचे नेमके भान या गुणत्रयीवर वॉशिंग्टनमधील सत्तावर्तुळात हेन्री किसिंजर यांचा प्रभाव वाढू लागला होता. अमेरिका आणि सोव्हिएत महासंघ यांच्यात शीतयुद्ध ‘तापू’ लागले होते. १९६८मध्ये किसिंजर यांना वॉशिंग्टनबाहेर जागतिक प्रतलावर झळकण्याची पहिली संधी मिळाली. नवनिर्वाचित रिपब्लिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांना अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले.
सोव्हिएत महासंघ आणि चीनशी चर्चा…
१९६०च्या दशकात चीन आणि सोव्हिएत महासंघ यांच्यातील कम्युनिस्ट भ्रातृभाव संपुष्टात आला होता. त्यामुळे एकीकडे सोव्हिएत महासंघाशी अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे घटवण्याविषयी चर्चा करताना, चीनच्या रूपाने त्या देशासमोर अडथळा उभा करता येईल असे किसिंजर आणि निक्सन यांचे मत पडले. यातूनच अमेरिका-चीन संबंधांची मुहूर्तमेढ रोवली गेली.
व्हिएतनाम युद्ध…
राजकीय तोडगा निघत नाही तोवर लष्करी विजयाला काहीही अर्थ नाही या विचारांचे किसिंजर होते. व्हिएतनाम मोहिमेत या वास्तवाची जाणीव निक्सन-किसिंजर यांना झाली होती. उत्तर व्हिएतनामचे नेते ले दुक आणि किसिंजर यांना व्हिएतनाम युद्ध थांबवल्याबद्दल शांततेचे नोबेल परितोषिक जाहीर झाले. यावर प्रचंड टीका झाली. कारण व्हिएतनाम युद्धसमाप्तीच्या काळातच कंबोडियामध्ये हस्तक्षेप करण्याच्या अमेरिकी धोरणामुळे तेथे ख्मेर रूज या निर्दयी राजवटीचा उदय झाला.
हस्तक्षेपाचे धोरण…
कम्युनिस्टांना रोखण्याचे अमेरिकेचे धोरण गतशतकात कोणत्याही थराला जायचे. या धोरणाचे शिल्पकार किसिंजरच होते. चिली, अर्जेंटिना, कंबोडिया, इराण या देशांमध्ये अमेरिका धार्जिणी सरकारे प्रस्थापित व्हावीत यासाठी किसिंजर यांनी प्रयत्न केले. मात्र अरब-इस्रायल युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने त्यांनी निर्णायक आणि सकारात्मक भूमिका निभावली. १९७२मध्ये ते अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही बनले. एकाच वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे ते आजवरचे अमेरिकेतील एकमेवाद्वितीय. वॉटरगेट प्रकरणात निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला, तरी किसिंजर यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आला नव्हता. निक्सन यांच्यानंतर गेराल्ड फोर्ड अध्यक्ष बनले, त्यांनी किसिंजर यांना परराष्ट्रमंत्रिपदी कायम ठेवले.
पाकिस्तानमैत्री नि भारतद्वेष…
चीनशी हातमिळवणी करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत घ्यावी लागली. कारण त्या काळी पाकिस्तान हा चीन आणि अमेरिकेचा समान मित्र होता. त्यामुळे पाकिस्तानच्या सत्ताधीशांकडून त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात आणि आताच्या बांगलादेशात वांशिक अत्याचार सुरू होते, त्याकडे किसिंजर-निक्सन यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या अत्याचारांतून निर्वासितांचा प्रश्न उभा राहिला आणि त्यातून बांगलादेश युद्धाला सुरुवात झाली, त्यावेळी या दुकलीने भारताचा प्रचंड दुःस्वास केला होता. भारत आणि इंदिरा गांधी यांच्याविषयी अत्यंत घृणास्पद टिप्पणी किसिंजर यांनी केली. कालांतराने त्यांचे भारताविषयीचे मत बदलले. पण त्यांची आद्य ओळख भारतद्वेषी अशीच होती.
अमेरिकी हितसंबंध… नेहमीच!
जगभर अनेक देशांमध्ये कम्युनिस्टांचा विरोध करताना, कम्युनिस्ट सरकारांच्या विरोधात उठाव घडवून आणताना हेन्री किसिंजर यांनी अमेरिकेच्या हितसंबंधांना प्राधान्य दिले. यासाठी मनुष्यहानी होणे किंवा मनुष्यहानीकडे दुर्लक्ष करणे या दोन्ही नीती त्यांना मान्य होत्या. लोकशाहीरक्षण ही अमेरिकेची जागतिक जबाबदारी आहे. त्यासाठी कोणतीही किंमत – संपत्ती वा जीवितांच्या स्वरूपात – मोजण्याची त्यांची तयारी होती. या धोरणांमुळेच त्यांना काही विश्लेषक युद्ध गुन्हेगारही ठरवतात. मात्र इतिहासात निःसंदिग्ध असे काहीच असू शकत नाही, असा बचाव किसिंजर कायम करत आले. १९७७मध्ये सक्रिय परराष्ट्रकारण आणि राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या मतांकडे जगाचे लक्ष असायचे. जर्मन उच्चारणातील विशिष्ट लयीतले बोलणे आणि जाड भिंगाच्या चष्म्यामुळे आलेले चेहऱ्यावरील विद्वत्तेचे भाव किसिंजर यांच्या व्यक्तिमत्त्वात भर घालायचे. वेगवेगळ्या काळातील अमेरिकी सत्तावर्तुळे, हॉलिवुड, मनोरंजन विश्व, माध्यमे यांच्यात किसिंजर यांचा वावर असायचा. त्यांची लोकप्रियता अनेक अमेरिकी अध्यक्षांपेक्षाही अधिक होती. किसिंजर आवडो वा न आवडो, पण त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यात आपलेच नुकसान आहे ही भावना परराष्ट्रनीती वर्तुळात किसिंजर यांच्या शेवटापर्यंत टिकून राहिली. तेच किसिंजर यांचे चिरंतन यश!