– अभय नरहर जोशी

३ एप्रिल १९७३. याच दिवशी न्यूयॉर्कच्या सहाव्या ‘ॲव्हेन्यू’ या अलिशान मार्गावर उभ्या असलेल्या मार्टिन कूपर यांनी साधारण एका विटेच्या आकाराच्या उपकरणाद्वारे सर्वप्रथम दूरध्वनी संपर्क केला. ज्यांच्याशी कूपर यांची त्या उपकरण निर्मितीसाठीची स्पर्धा होती, त्यांच्याशीच त्यांनी या उपकरणाद्वारे संपर्क साधला. हा जगातला पहिला भ्रमणध्वनी संपर्क (मोबाइल कॉल) ठरला! ते उपकरण म्हणजे सध्याचा भ्रमणध्वनी संच (मोबाइल फोन)! या घटनेला या ३ एप्रिल रोजी तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या संपर्क क्रांतीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त…

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त

कसा झाला पहिला संपर्क?

‘मोटोरोला’चे तत्कालीन अभियंता मार्टिन कूपर यांनी या पहिल्या भ्रमणध्वनी संचाद्वारे ‘एटी अँड टी’च्या मालकीच्या ‘बेल लॅब’चे प्रमुख जोएल एंजेल यांच्याशी केलेल्या संपर्कात सांगितले, की मी तुम्हाला भ्रमणध्वनी संचाद्वारे संपर्क साधत आहे. वास्तवातील भ्रमणध्वनी संच. हातात घेऊन भ्रमण करताना वापरता येण्याजोगा असा हा भ्रमणध्वनी संच आहे. त्यावेळी या रस्त्यावरून कूपर यांच्या शेजारून गेलेल्यांनी हा ऐतिहासिक क्षण पाहिला असेल. पण त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची त्यांना कल्पनाही आली नसेल. मात्र, असा हा संपर्क झाला तरी पुढील तब्बल दशकभर हा भ्रमणध्वनी संच सामान्य ग्राहकांना उपलब्ध झालाच नव्हता.

कूपर यांचे भाकीत कसे खरे ठरले?

या पहिल्या भ्रमणध्वनी संच संपर्कानंतरच्या ५० वर्षांत कूपर यांनी वापरलेला हा अवजड संच प्रचंड प्रमाणात विकसित झाला. आता हाताळण्यास अत्यंत सुलभ, अत्यंत कमी रुंदीच्या पातळ भ्रमणध्वनी संचांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यात दिवसेंदिवस नववनीन विकास होतच आहे. त्यामुळे उद्योग, संस्कृतीला नवा आयाम मिळाला आहे. आपले परस्परांशी असलेले संबंध व आत्मभानावरही भ्रमणध्वनी संच संस्कृती प्रभाव टाकत आहे. या उपकरणाची अफाट पोहोच व उपयुक्ततेमुळे त्याने सर्वांनाचा आवाक केले आहे. हा संच प्राथमिक अवस्थेत असताना कूपर यांनी भाकित वर्तवले होते, की मानवी समाजासाठी भ्रमणध्वनी संच एक दिवशी अत्यावश्यक बाब ठरेल. या संचांच्या प्रारंभापासूनच या उपकरणातील क्षमता दडलेली होतीच. सध्या ९४ वर्षीय असलेले कूपर यांनी ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले, की आता सर्वांकडेच भ्रमणध्वनी संच असतात, याबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. मी त्यावेळी सांगत होतो, की एक दिवस असा येणार आहे, की जन्माबरोबरच व्यक्तीला त्याचा भ्रमणध्वनी संच प्रदान करण्यात येईल.

भ्रमणध्वनी संचाचा उदय कसा?

त्या पहिल्या भ्रमणध्वनी संपर्काआधी काही महिने ‘मोटोरोला’ने भ्रमणध्वनी संच निर्मितीत ‘एटी अँड टी’ कंपनीच्या ‘बेल लॅब’ला मागे टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. ‘एटी अँड टी’ने याआधी ‘ट्रान्झिस्टर’ आणि इतर नवकल्पना बाजारात आणल्या होत्या. ‘मोटोरोला’ची त्यांच्याशी भ्रमणध्वनी संचनिर्मितीसंदर्भात स्पर्धा सुरू होती. कूपर त्यावेळच्या स्मृतींना उजाळा देताना सांगतात, की ती त्या काळातील या क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी होती. आम्ही शिकागोमधील एक छोटी कंपनी होतो. आम्ही त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो. मी जेव्हा प्रतिस्पर्धी कंपनीतील एकाशी भ्रमणध्वनी संचावरून संपर्क साधला, तेव्हा माझा हा प्रतिस्पर्धी त्याला प्रतिसाद देण्यास फार उत्सुक नव्हता.

उपलब्धतेत कोणते अडथळे आले?

कूपर यांनी केलेल्या या पहिल्या भ्रमणध्वनी संपर्कानंतर उत्पादन प्रक्रियेतील समस्या, सरकारी नियंत्रण-नियमनामुळे भ्रमणध्वनी संच सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याबाबत प्रगतीचा वेग मंदावलेला होता. त्याचे उदाहरण देताना कूपर यांनी सांगितले, की ते आता ज्या ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन’चे सल्लागार आहेत, त्या कमिशनला हे भ्रमणध्वनी संचांच्या स्पर्धेशी तोंड देण्यासाठी रेडिओ वाहिन्यांना स्वतंत्र अस्तित्व कसे द्यावे, हे ठरवणे कठीण गेले. त्यामुळे ‘डायनॅमिक ॲडाप्टिव्ह टोटल एरिया कव्हरेज’ (डायनाटॅक) दूरध्वनी संचांची आवृत्ती बाजारात उपलब्ध होण्यासाठी एक दशक जावे लागले. त्यानंतर आलेल्या भ्रमणध्वनी संचांची किंमत तब्बल ३९०० डॉलर एवढी होती. त्याचे वजन अडीच पौंड आणि लांबी तब्बल एक फूट होती. त्याची तुलना सध्याच्या ‘आयफोन-१४’ शी केल्यास हा फरक अधोरेखित होतो. या आधुनिक संचाचे वजन अवघे १७० ग्रॅम असून, तो सहा इंचांचा आहे. किंवा २०० ते ३०० डॉलरला (१६ ते २५ हजार रुपये) उपलब्ध असलेल्या ‘अँड्रॉईड स्मार्ट फोन’शी तुलना केल्यावर हा फरक लक्षात येतो.

हेही वाचा : विश्लेषण : ‘इस्रो’च्या यशस्वी ‘आरएलव्ही’ चाचणीचे महत्त्व काय? भविष्यात याचे कोणते फायदे?

मानवी जीवनावर प्रभाव कसा?

१९९० च्या दशकापर्यंत आधुनिक भ्रमणध्वनी संचांत फारसा भरीव विकास झाला नाही. त्यानंतर त्यात झपाट्याने विकास होऊन, तो आकाराने छोटा होऊन वापरण्यास अधिक सुलभ झाला. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने २०२१ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, आज ९७ टक्के अमेरिकन नागरिकांकडे भ्रमणध्वनी संच आहे. भ्रमणध्वनीवरून पहिला संपर्क केल्यानंतर काही वर्षांत कूपर यांनी या भ्रमणध्वनी संचांच्या क्रांतिकारक क्षमतेवर पुस्तक लिहिले. यावर प्रसारमाध्यमांत आणि ठिकठिकाणी व्याख्यानांसाठी दौरे केले. परंतु भ्रमणध्वनी संचांतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रत्येक पैलू कूपर यांना मान्य आहे असे नाही. त्यांच्या मते बरेच अभियंते तंत्रज्ञान, ‘गॅजेट’, ‘हार्डवेअर’मध्येच गुरफटतात. या तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश मानवी जीवनशैली अधिक सुखदायक व समृद्ध व्हावी हा या तंत्रज्ञानाचा मूळ हेतू असल्याचे ते विसरतात. गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीत भ्रमणध्वनी संच व तंत्रज्ञानाचे आपल्या प्रगतीतील योगदान कूपर मान्य करतात. कूपर या वयातही आज त्याचा वापर प्रभावीरीत्या करतात. मात्र, या संचाच्या आधीन होऊन काही जणांना त्याचे व्यसन लागल्याचेही ते मान्य करतात. या संचाचा सजगतेने व तारतम्याने वापर केल्यास त्याचे अधिक सकारात्मक उपयोग आहेत. मानवी समाजात त्याने क्रांती घडवली आहे. भविष्यातही ही वाटचाल आणि विकास सुरूच राहील, यावर कूपर यांना विश्वास वाटतो.

abhay.joshi@expressindia.com