फ्लोरिडापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर कम्युनिस्ट शासित क्यूबा हा देश आहे. क्यूबामध्ये भिकारी नसल्याचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी क्युबाच्या कामगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्र्यांना थेट राजीनामा द्यावा लागला आहे. एका मंत्र्यांना देशातील भिकाऱ्यांमुळे राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ असावी. पण नेमकं असं काय घडलं? भिकाऱ्यांबाबत कामगारमंत्र्यांनी असं विधान का केलं आणि त्यांच्या विधानामुळे इतकी तीव्र प्रतिक्रिया का आली याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
नेमकं काय झालं?
क्यूबाच्या कामगारमंत्री मार्टा एलेना फेटो कॅब्रेरा यांनी असे विधान केले की, क्यूबात भिकारी असे काही नाहीत. सहज पैसे कमवण्यासाठी लोक भीक मागतात आणि कचऱ्याजवळ राहतात. सोमवारी राष्ट्रीय सभेच्या सत्रादरम्यान कॅब्रेरा यांनी म्हटले, “आम्ही भिकारी लोक पाहिले आहेत. मात्र, जर तुम्ही त्यांचे हात किंवा त्यांचे कपडे पाहिले, तर ते भिकारी असल्याचे दिसून येत नाही. ते खरोखर भिकारी नाहीत. क्यूबामध्ये भिकारी नाहीत. लोक भिक्षा मागून दारू पितात.”
फेटो कॅब्रेरा यांचे हे विधान काही वेळातच व्हायरल झाले आणि लोकांनी त्यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. क्यूबातील आणि परदेशातील क्यूबन नागरिकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अनेकांनी त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणीही केली. निदर्शनांदरम्यान लोकांनी कॅब्रेरा यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई करण्याचीही मागणी केली. प्रचंड निषेध आणि दबावादरम्यान फेटो यांनी कामगार मंत्रिपदाचा राजीनामा दिला. क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाझ कॅनेल यांनीही कॅब्रेरा यांच्यावर निशाणा साधत त्यांचे हे विधान असंवेदनशील असल्याचे म्हटले.
खरं तर क्यूबातील आर्थिक परिस्थिती सातत्यानं खालावत चालली आहे. काही वर्षांपर्यंत क्यूबामध्ये भिकारी दिसत नव्हते आणि लोकांना निवाराही मिळत होता. मात्र, आता परिस्थिती अशी आहे की, बरेच लोक प्रामुख्याने वृद्ध लोक कचरा गोळा करताना किंवा कचरा साफ करताना दिसतात. त्याशिवाय सामाजिक सुरक्षाही ढासळली आहे. इथल्या लोकांना निवृत्तीनंतर लोकांना दरमहा २००० क्यूबन पेसो पेन्शन मिळत आहे. त्याची किंमत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत फक्त पाच डॉलर्सइतकी आहे. या पैशातून तिथे काही अंडी विकत घेणंही शक्य नाही. ज्यांचे नातेवाईक परदेशात काम करीत नाहीत, त्यांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही कठीण आहे. इतकी बिकट परिस्थिती असताना क्यूबाच्या कामगारमंत्र्यांच्या या विधानामुळे इथल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसत आहे.
लोकांचा आरोप आहे की, सरकार सत्य परिस्थिती बघतच नाही आणि अजूनही ते अशी आशा बाळगतायत की, सरकार आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरच ठोस पावलं उचलेल. पेन्शनच्या पैशाने घर चालवणे कठीण आहे आणि हेच क्यूबाचे सध्याचे वास्तव आहे, असे लोकांनी म्हटले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये क्युबाचा जीडीपी १.१ टक्क्यानं घसरला. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांत तो ११ टक्क्यांनी घसरला आहे.
मंत्री फेटो यांनी कधीच कल्पना केली नसेल की, त्यांच्या विधानामुळे त्यांची खुर्ची जाईल आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे इतका मोठा संताप निर्माण होईल. क्यूबामध्ये गरिबी वाढत आहे आणि लोक अन्नटंचाईचा सामना करीत आहेत. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक क्यूबन लोक स्वतःसाठी अन्नाची व्यवस्था करू शकत नाहीत आणि त्यांना भीक मागण्यास भाग पाडले जात आहे.
राष्ट्राध्यक्ष कॅनेल यांनी म्हटले, “असुरक्षिततेला तोंड देण्यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव अत्यंत संतापजनक आहे. क्रांती कोणालाही मागे सोडत नाही, तेच आमचे ब्रीदवाक्य आहे.”
मंगळवारी कॅब्रेरा यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा क्युबन कम्युनिस्ट पक्ष आणि सरकारने स्वीकारला. क्युबाच्या प्रेसिडेन्सीने एक्सवर लिहिले की, राजकीय आणि सरकारी व्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुद्द्यांसाठी वस्तुनिष्ठता आणि संवेदनशीलतेचा अभाव असल्यामुळे कामगारमंत्र्यांनी चूक मान्य करत राजीनामा सादर केला.
महत्त्वाचे मुद्दे:
- क्युबामध्ये अलीकडच्या काळात अन्नधान्य, औषधं, इंधन यांचा तुटवडा निर्माण झाला होता
- त्यामुळे बेरोजगारी वाढली आणि अनेक लोकांना भीक मागावी लागली
- गरीब आणि भिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरही टीका झाली
- रोजगार निर्मिती व गरिबांसाठी योजना राबवण्यात कामगार मंत्रालय अपयशी ठरलं
- सार्वजनिक दबाव आणि असंतोष यामुळे मंत्री अडचणीत आले
- जनतेच्या दबावामुळे आणि स्वतःच्या मंत्रालयाच्या अपयशाची जबाबदारी घेत कामगार मंत्र्यांनी राजीनामा दिला
एवढ्या प्रमाणात विरोध का झाला?
या विरोधाला पार्श्वभूमी आहे. अनेक दशकांपासून अमेरिकेच्या निर्बंधाखाली असलेल्या कम्युनिस्ट क्यूबातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. १९६० मध्ये फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीनंतर अमेरिकेने क्यूबावर निर्बंध लादले. १९६१ मध्ये अमेरिकेने क्यूबावर बे ऑफ पिग्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयशस्वी आक्रमणाला सुरुवात केली. जॉन एफ. केनेडी प्रशासनाने अधिकृत केलेल्या या कारवाईला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या परराष्ट्र धोरणातील चुकांपैकी एक मानले जाते. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने कॅस्ट्रो यांना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले. बराक ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात क्यूबाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी उलट धोरण अवलंबले. क्यूबावरील निर्बंधांना जगभरातून मोठ्या प्रमाणात नापसंती आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील १९३ पैकी १८५ देशांनी अमेरिकेच्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी मतदान केले गेले असले तरी क्यूबा अजूनही निर्बंधाखाली आहे.
प्रवास आणि पर्यटन हे क्युबाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरवर्षी लाखो पर्यटक इथे भेट देतात. गेल्या काही वर्षांत अनेकांनी क्यूबाच्या नागरिकांना सार्वत्रिक आरोग्य सेवा आणि पेन्शनसह अनेक फायदे दिल्याबाबत कौतुक केले. मात्र, सरकारने त्यानंतर अनेक अत्यावश्यक सेवांमध्ये कपातही केली आहे.