– अनिश पाटील 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर झालेल्या आक्रमक आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या प्रथम खबर अहवालात (एफआयआर) एसटी कर्मचारी राजकीय व्यक्ती, आमदार, खासदार, मंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करू शकतात, अशी गोपनीय माहिती येत होती, असे मुंबई पोलिसांनी मान्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूलाभाई देसाई मार्ग येथील पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पण एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते तेथे जातील, याचा अंदाज न बांधता आल्यामुळे सुरक्षा भेदून आंदोलनकर्ते थेट पवार यांच्या घरापर्यंत पोहोचले. अतिरिक्त कुमक व वरिष्ठ कर्मचारी येईपर्यंत आंदोलकांनी धिंगाणा घातला. आंदोलनाबाबत गुप्त माहिती हाती असतानाही हा प्रकार झाला. त्यात आंदोलनाच्या तीव्रतेचे आकलन करण्यात पोलीस यंत्रणा नक्कीच अपयशी ठरली. या घटनेमुळे गुप्तचर यंत्रणेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांसह मुंबई पोलिसांची विशेष शाखा-१ मुंबई पोलिसांसाठी गुप्तचर यंत्रणेचे काम करते. हे काम कसे चालते ते पाहू या.

मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कशी काम करते?

‘इंटेलिजन्स ब्युरो’ (आयबी), ‘रिसर्च अँड अॅनालिसीस विंग’ (रॉ) या यंत्रणांप्रमाणे मुंबई पोलिसांची स्वतःची विशेष शाखा हा गुप्त माहिती पुरवणारा विभाग आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या शाखेचा प्रमुख असतो. या विभागात आय ब्रँच, आंदोलन विभाग असे विविध उपविभाग आहेत. प्रत्येक परिमंडळात त्यांच्या शाखाही आहेत. धार्मिक, जातीय, आंदोलने, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील गुप्त माहिती या विभागात एकत्र केली जाते. केंद्रीय यंत्रणांसोबतही हा विभाग समन्वय साधून असतो.

गिरण्यांसाठी वेगळे पथक

दुसऱ्या पातळीवर मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात मिल्स स्पेशल म्हणून अंमलदारही असतात. मुंबईत मोठ्या प्रमाणात गिरण्या कार्यरत असताना त्यांची आंदोलने व्हायची. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा. त्यामुळे मिल्स स्पेशल पथकाची स्थापना करण्यात आली होती. हे पथक गिरणी कामगार व नेते यांच्या माध्यमातून गुप्त माहिती गोळा करू लागले. मुंबईतील गिरण्या कालांतराने बंद झाल्या. पण मिल्स स्पेशल हे पथक अजूनही अस्तित्वात आहे. स्थानिक पातळीवरून कायदा व सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने या पथकाचे अंमलदार माहिती घेत असतात.

राज्य गुप्तवार्ता विभाग

मुंबई पोलिसांची विशेष शाखा ज्याप्रमाणे स्थानिक पातळीवर काम करते, त्याप्रमाणे राज्य गुप्तवार्ता विभाग हा राज्य पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातील घडामोडींची माहिती संकलित करून स्थानिक पोलिसांना देणे हे या विभागाचे काम आहे. याशिवाय केंद्रीय यंत्रणांकडून येणाऱ्या माहितीचे संकलनही या विभागात केले जाते. राजकीय घडामोडींसह अगदी समाजमाध्यमांवरील हालचालींवरूनही माहिती संकलित करून त्याबाबत अहवाल तयार करण्यात येतात .

तंत्रज्ञानाचा वापर

भारतात ‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम- इंडिया’ (सर्ट-इन), ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलेपमेंट ऑर्गनायझेशन’ (डीआरडीओ), ‘इंटेलिजन्स ब्युरो’ (आयबी), ‘रिसर्च अँड अॅनालिसीस विंग’ (रॉ) या संस्था सायबर विश्वावर नजर ठेवून असतात. ‘नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन’ (एनटीआरओ) या संस्थेकडे ‘विश्वरूप’ ही माहितीच्या महाजालावर बारीक नजर ठेवणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) आहे. पोलिसांची सोशल मीडिया सेलही यांच्याच तोडीचे काम करत आहे. त्यामाध्यमातून समाजमाध्यमांद्वारेही माहिती मिळवली जाते. आंदोलने, हिंसाचाराच्या घटनांमध्ये समाज माध्यमांवरून महत्त्वपूर्ण माहिती मिळवता येते. याशिवाय महाराष्ट्र सायबर विभागही या क्षेत्रात काम करत आहे. माहिती मिळवणे व अपमाहिती हटवणे आदी काम २४ तास सुरू असते.

अपमाहिती हे आता दहशतवादाचेही एक हत्यार बनले आहे.  पण आता – माहिती-तंत्रज्ञानाच्या, समाजमाध्यमांच्या, जल्पक म्हणजेच ट्रोल्स आणि बॉट्सच्या काळात – हे हत्यार अधिक धारदार झाले आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरील हालचालीही गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाच्या आहेत. समाजमाध्यमांवर खोटे संदेश पसवण्याचे प्रमाण अधिक आहेत. सामान्य नागरिक त्यालाच खरे मानून ते संदेश पुढे पाठवतात. काही संदेश तर खूपच प्रक्षोभक असतात. अशा प्रकरणांबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच सर्व पोलिसांना देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा तसेच सुरक्षेचा प्रश्‍न उद्भवू नये, यासाठी इंटरनेटवरील संशयित संदेशांवर विशेष लक्ष ठेवले जाते. त्यासाठी ३० पोलिसांचे पथक विविध पाळ्यांमध्ये २४ तास तैनात करण्यात आले आहे. समाजमाध्यमांवरील या संदेशांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी २४ तास समाजमाध्यमांवर जागता पहारा देतात.

गुप्तचर यंत्रणा जेव्हा अपयशी ठरते…

२०१२, जुलैचा दुसरा पंधरवडा. आसाममध्ये बोडो आदिवासी आणि मुस्लिम स्थलांतरित यांच्यात संघर्ष पेटला होता. त्यानंतर दहा-बारा दिवसांतच त्याचा वणवा दक्षिणेकडील राज्यांतही पसरला. ११ ऑगस्टला त्यावरून मुंबईत मोठा दंगा झाला. त्यानंतर भारतीय इतिहासातील फाळणीनंतरच्या सर्वांत मोठ्या स्थलांतरास सुरुवात झाली. त्या काळात इंडियन मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांसाठी ज्ञात असलेल्या भागांतच प्रामुख्याने ईशान्य भारतीयांना लक्ष्य करण्यात आले होते. हा योगायोग नव्हता. पाकिस्तानात उगम असलेल्या संकेतस्थळांवरून, समाजमाध्यमस्थळांवरून, मोबाईल संदेशांतून ईशान्य भारतीयांविरोधात तेव्हा गरळ ओकली जात होती. त्यांच्या मनात भय निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करण्यात येत होता. हे सरकारच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. परंतू मुंबईत दंगल सदृश परिस्थिती निर्माण होईपर्यंत परिणामांच्या तीव्रतेचा अंदाज यंत्रणांना आला नाही.

काय घडले होते?

म्यानमार आणि आसाममधील मुस्लिमांवर झालेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्ह हजारो आंदोलक ११ ऑगस्ट,२०१२ च्या दुपारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात एकत्र आले होते. सुमारे ३ वाजून १७ मिनिटांनी, परिसरात दंगल झाली. हिंसक जमावाने पोलिसांवर हल्ला केला, पोलिसांच्या वाहनांना आग लावली, बंदोबस्तावरील पोलिसांवर जमावाने दगडफेक केली, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मध्यवर्ती आगारात सार्वजनिक वाहतुकीच्या बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्यावेळी दंगलखोरांनी महिला पोलिसांचा विनयभंग केला. दोन रायफल्स (एसएलआर) आणि एक सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, १६० जिवंत काडतुसे हिसकावून घेतली. सीएसटीतील अमर जवान स्मारकाची मोडतोड केली. पोलिसांच्या, प्रसिद्धी माध्यमांच्या गाड्यांची तोडफोड केली. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. त्यावेळी तेथे गोळीबारही झाला. दंगलखोरांनी एका पोलिसाचे अपहरण केले होते. त्यानंतर घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर तो पोलिस जखमी अवस्थेत आढळला होता. या घटनेत सभेत सहभागी झालेल्या दोन तरुणांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर तशी सुमारे अडीचशे संकेतस्थळे बंद करण्यात आली. एका दिवशी पाचहून अधिक एसएमएस पाठविण्यावर पंधरा दिवसांसाठी बंदी घालण्यात आली. परंतु तोवर दंगलखोरांनी एक लढाई जिंकली होती. ही घटना म्हणजे मुंबई पोलिसांचे व त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश मानले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How does state level police intelligence bureau works print exp scsg
First published on: 12-04-2022 at 08:37 IST