Pakistan ISI espionage जैसलमेर येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’साठी हेरगिरी करत असल्याचा आणि संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे. उत्तराखंडमधील अल्मोडा येथील महेंद्र प्रसाद हा जैसलमेरच्या चंदन भागातील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता, त्याला ४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे तो २००८ पासून या गेस्ट हाऊसमध्ये काम करत होता. या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरात हेरगिरीशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आली आहेत आणि महेंद्र प्रसादला अटक करण्यात आली आहे. अटक झालेला डीआरडीओ गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक कोण आहे? तो हेरगिरीमध्ये कसा सामील होता? जाणून घेऊयात…
कोण आहे महेंद्र प्रसाद? तो पाकिस्तानसाठी हेरगिरी कशी करत होता?
आरोपी महेंद्र प्रसाद पोखरण फिल्ड फायरिंग रेंजच्या गेस्ट हाऊसमध्ये कार्यरत होता. हे ठिकाण एक सुरक्षित ठिकाण आहे, जिथे संरक्षण क्षेत्रातील उच्च-पदस्थ तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी नियमितपणे भेट देतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दीर्घकाळ त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या मोबाईल फोनच्या सुरुवातीच्या तपासणीत त्याने पाकिस्तानी गुप्तचर ऑपरेटरबरोबर शेअर केलेल्या माहितीचा तपशीलही मिळाला आहे. सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून प्रसाद गेस्ट हाऊसमध्ये थांबलेल्या पाहुण्यांच्या तपशिलासह पीडीएफ फाइल्स पाठवत होता. पाहुण्यांच्या यादीमुळे पाकिस्तानी गुप्तचर ऑपरेटरना पोखरण रेंजमध्ये सुरू असलेल्या चाचण्या किंवा प्रकल्पांचे स्वरूप समजून घेण्यास मदत झाली.
आयजी (सुरक्षा) विष्णूकांत यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, आरोपी डीआरडीओ वैज्ञानिक आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या जैसलमेरमधील चंदन फिल्ड फायरिंग रेंजमधील भेटींबद्दल माहिती देत होता. “तो क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रास्त्रांच्या चाचणीबद्दलही माहिती देत होता,” असे विष्णूकांत यांनी सांगितले. “त्याच्या मोबाईल आणि चॅटमधून हेरगिरीचे महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती खूप वर्षांपासून पुरवण्यात येत असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. लीक झालेल्या माहितीची आता बारकाईने तपासणी केली जात आहे. जैसलमेर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेले पोखरण रेंज हे भारत सरकारचे शस्त्रास्त्रे आणि संबंधित सुविधांसाठी मुख्य चाचणी केंद्र आहे.
एका सूत्राने ‘द प्रिंट’ला सांगितले की, गुप्तचर संस्था आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संयुक्त चौकशी समितीने (Joint Interrogation Committee) प्रसादला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीत असेही म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान जेव्हा पाकिस्तानी सशस्त्र दलांनी जैसलमेर एअर फोर्स स्टेशनसह भारतीय संरक्षण स्थळांवर हल्ला केला, तेव्हा प्रसाद त्याच डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये कार्यरत होता. राज्य पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानी ऑपरेटर्सना गोपनीय माहिती पाठवणाऱ्या संशयित व्यक्तींवर कम्युनिकेशन ॲप्स किंवा सोशल मीडियाद्वारे लक्ष ठेवून आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हेरगिरीशी संबंधित अटक
ही अटक या भागातील हेरगिरीच्या प्रकरणांवर केलेल्या मोठ्या कारवाईचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वीच, शकोरू खान नावाच्या आणखी एका संशयित पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली. त्याचे संपर्क नेटवर्क खूप प्रभावशाली होते आणि तो सरकारी कर्मचारी होता. त्याच्या मोबाईल फोनमधून हेरगिरीचे महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आल्याचे एजन्सींनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दोन्ही देशांमधील अलीकडील लष्करी तणावानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी संशयित पाकिस्तानी हेरांविरुद्ध देशव्यापी मोहीम सुरू केली. या वर्षी मे महिन्यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधून १५ हून अधिक लोकांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आणि संवेदनशील भारतीय लष्करी माहिती पाकिस्तानी ऑपरेटर्सना दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरचा समावेश आहे. तिला पोलिसांनी हिस्सार येथे ताब्यात घेतले. इतर अटक झालेल्यांमध्ये हरियाणातील कैथल येथील २५ वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थी देवेंद्र सिंह आणि उत्तर प्रदेशातील रामपूर येथील व्यापारी शाहजाद यांचा समावेश होता.
मे महिन्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (CRPF) जवान मोती राम जाट याला अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो २०२३ पासून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेची महत्त्वाची माहिती देत होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, त्यात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या गटांशी संबंधित १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
भारताच्या या दहशतवादी तळांवरील हल्ल्यानंतर, पाकिस्तानने सीमापार गोळीबार केला आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. याच्या प्रत्युत्तरात, भारताच्या प्रतिहल्ल्यामुळे नूर खान हवाई तळासह ११ प्रमुख ठिकाणी पाकिस्तानच्या रडार प्रणाली, कम्युनिकेशन सेंटर्स आणि हवाई तळांना नुकसान झाले. १० मे रोजी दोन्ही देशांनी जमीन, हवा आणि समुद्रातील सर्व गोळीबार आणि लष्करी क्रियाकलाप त्वरित थांबवण्यास सहमती दर्शवली.