गाझा पट्टीत हमास, उत्तरेकडे लेबनॉन-स्थित हेझबोला, दूरवर इराण आणि येमेन-स्थित हुथी अशा चार शत्रूंशी एकाच वेळी लढण्याची हिंमत इस्रायलने दाखवली आहे. यातील हमास आणि हेझबोला यांच्याविरुद्ध इस्रायलची सरशी होताना दिसत आहे. पण दीर्घ काळ अशा प्रकारे चार आघाड्यांवर लढत राहण्याची इस्रायलची क्षमता आहे का, अमेरिकेची मदत किती काळ घ्यावी लागणार आणि मुख्य म्हणजे या बहुस्तरीय संघर्षाचा अंत काय होणार? इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यास ७ ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होईल, यानिमित्ताने विविध मुद्द्यांचा वेध… 

हेझबोलाच्या मागावर…

लेबनॉन-स्थित आणि इराण-समर्थित हेझबोलाचा निःपात करण्याची खास योजना इस्रायलने आखलेली आहे. याअंतर्गतच गेल्या महिन्यात प्रथम ‘पेजर-बॉम्ब’ हल्ले आणि नंतर थेट हल्ल्यामध्ये हेझबोलाचा प्रमुख हसन नसरल्लाचा काटा काढण्यात आला. परंतु हेझबोलाच्या डझनभर नेत्यांना संपवूनही इस्रायलला सुरक्षित वाटत नाही. लेबनॉन आणि इस्रायलदरम्यान एखादे बफर क्षेत्र कायमस्वरूपी निर्माण करावे, अशी इस्रायलची योजना आहे. यासाठीच लेबनॉनमध्ये मर्यादित स्वरूपात लष्कर आणि चिलखती वाहने धाडण्यात आली आहेत. पण पूर्ण ताकदीनिशी लेबनॉनवर हल्ले करण्याचे उद्योग यापूर्वी १९८२ आणि २००६मध्ये अंगाशी आले आहेत. त्यामुळे सुरुवातीस हेझबोलाच्या म्होरक्यांना संपवण्याचे धोरण अवलंबले गेले. याअंतर्गतच प्रथम फुआद शुक्र आणि नंतर नसरल्लाची हत्या झाली. हेझबोला हा लेबनॉनमध्ये प्रबळ राजकीय पक्षही आहे. त्यामुळे केवळ लष्करी नेतृत्व संपवूनही या संघटनेचे समर्थक संपवणे इस्रायलला शक्य नाही. यापूर्वी नसरल्लाचा पूर्वसुरी अब्बास अल मुसावी (१९९२) आणि आणखी एक कमांडर इमाद मुघनिये (२००८) यांना संपवूनही हेझबोलाकडून प्रतिकार होत राहिला. किंबहुना, गेल्या वर्षभरात तो अधिक तीव्र झाला. यावेळी मात्र हेझबोलाला पुन्हा डोके वर काढू न देण्याचा चंग इस्रायलने बांधला आहे. त्यामुळेच एकीकडे हमास खिळखिळी झाल्यानंतर हेझबोलाचा समाचार घेण्याचे इस्रायलने ठरवले आहे.  

pappu yadav death threat
Salman Khan gets Threat: “जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
Lashkar e Taiba  Pakistani commander Usman killed in an encounter in an anti terror operation
दहशतवादविरोधी मोहिमेत बिस्किटांचा वापर
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना

हेही वाचा >>>भारतात वॉन्टेड झाकीर नाईक पाकिस्तानात; मुस्लीम धर्मोपदेशकाचा पाकिस्तानला जाण्यामागे हेतू काय?

इराणशी थेट संघर्षाची चिन्हे…

हेझबोलाला नामोहरम केल्यामुळे या संघटनेचा कर्ता-धर्ता असलेल्या इराणची फजिती झाली. हेझबोलाला इराणनेच पोसले आणि वाढवले. या संघटनेची लक्तरे निघत असताना बघ्याची भूमिका घेणे इराणला परवडणारे नव्हते. तसेही इस्रायलने तेहरानच्या भूमीवर हमास नेता इस्मायल हानियेचा काटा काढल्यामुळे (इस्रायलने अर्थातच याची थेट कबुली दिलेली नाही) आणि नसरल्लावर झालेल्या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचा एक जनरल ठार झाल्यामुळे जरब बसवण्यासाठी इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर १८० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. यातून ईप्सित परिणाम साधता आला नाही. कारण जवळपास सर्वच्या सर्व क्षेपणास्त्रे इस्रायलने नष्ट केली. हमास, हेझबोला, हुथी असा बंडखोर/दहशतवादी/राजकीय संघटनांचा प्रतिरोध अक्ष उभारून इस्रायल आणि अरब जगताला जरब बसवण्याचे इराणचे धोरण होते. यांतील हमास आणि हेझबोला खिळखिळे झाले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्गास लक्ष्य केल्यामुळे हुथींनी सहानुभूती गमावली आहे. यामुळे इराणचाच प्रभाव कमी झालेला दिसतो. आता परिस्थिती अशी आहे, की इराणच्या अण्वस्त्र आणि शस्त्रास्त्रनिर्मिती प्रकल्पांना इस्रायलने लक्ष्य केल्यास इराणचीच पंचाईत होऊ शकते. तेथे मसूद पेझेश्कियान हे नेमस्त नेते अध्यक्षपदावर आहेत. पण कट्टरपंथियांच्या युद्धखोरीस त्यांना लगाम घालता आलेला नाही. ही युद्धखोरी इराणच्या अंगाशी आली आहे. इराणवर ‘प्रत्युत्तरादाखल’ क्षेपणास्त्र हल्ले करण्याची इस्रायलची योजना असू शकते. एप्रिल आणि ऑक्टोबर अशा दोन्ही वेळी हल्ला इराणकडून ‘विनाचिथावणी पहिल्यांदा’ हल्ले झाल्याचा दावा इस्रायल करू शकतो. फक्त प्रत्युत्तर कोणत्या स्वरूपाचे असावे, याविषयी इस्रायलमध्ये मतभेद आहेत.  

हेही वाचा >>>भारत आणि पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातीमुळे जागतिक बाजारातील तांदळाच्या दरात घसरण; कारण काय?

हमासचा निःपात…

इस्रायलच्या भूमीत ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्याची योजना हमास नेता याह्या सिनवार आणि मोहम्मद डेफ यांनी आखली. दोन्ही नेते सध्या गाझामध्ये भूमिगत असून, इस्रायल त्यांच्या मागावर आहे. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलने जमीन, आकाश आणि समुद्रमार्गे गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४१ हजारांहून अधिक नागरिक मरण पावल्याचा अंदाज आहे. हमासचे बहुतेक राजकीय आणि लष्करी नेते इस्रायलने संपवले आहेत. यात इस्मायल हानियेचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. पण इस्रायलच्या दृष्टीने याह्या सिनवार हा प्रमुख लक्ष्य आहे. तो गाझातील भूमिगत भुयारी जाळ्यात दडून बसला असल्याचा इस्रायलचा संशय आहे. यासाठीच अनेकदा निव्वळ या संशयावरून इस्रायलने काही संकुलांवर बॉम्बहल्ले केले, ज्यात अनेकदा निरपराध नागरिक शेकड्यांनी मरण पावले. हमासची पूर्ण शरणागती किंवा सिनवार, डेफ यांचा मृत्यू हे उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय शस्त्रबंदी जाहीर करायची नाही, अशी इस्रायलची छुपी योजना आहे. मोहम्मद डेफ ठार झाला, असे मध्यंतरी इस्रायलने जाहीर केले होते. परंतु तो जिवंत असल्याचा हमासचा दावा आहे. हमासचे १७ हजार बंडखोर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हमास राजकीयदृष्ट्या संपलेली नाही, पण लष्करी दृष्ट्या पूर्णतः खिळखिळी झाल्याचे हमासचे नेतेही खासगीत मान्य करतात.

हुथींवर मर्यादित हल्ले…

७ ऑक्टोबरच्या घटनेनंतर पॅलेस्टिनी आणि हमासच्या पाठिंब्यासाठी हेझबोलाप्रमाणेच येमेनमधील हुथींनीही इस्रायलवर अधून-मधून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. मात्र त्यांचे स्वरूप आणि तीव्रता मर्यादित आहे. इराणप्रमाणेच हुथींचा तळही इस्रायलपासून खूप दूर असल्यामुळे इस्रायलबरोबर थेट संघर्षाचे प्रसंग फारसे येत नाहीत. मात्र मध्यंतरी एडनच्या बंदरावर हवाई हल्ले करून इस्रायलने आपण हुथींपर्यंत पोहोचू शकतो असे दाखवून दिले आहे. हमास आणि हेझबोलाच्या तुलनेत हुथींचे फार नुकसान इस्रायलकडून झालेले नाही. लाल समुद्र आणि एडनच्या आखातात सागरी व्यापारी मार्गावर जहाजांवर हल्ले करण्याची क्षमता बाळगून असल्यामुळे हुथींचे उपद्रवमूल्य अधिक व्यापक आहे. पण तूर्त त्यांचा बंदोबस्त करण्यास इस्रायलने प्राधान्य दिलेले नाही.