Breast milk selling जगभरात लोक अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी एक नोकरी असतानाही इतर ठिकाणी काम करत आहेत. त्याला ‘साईड हसल’ आणि ‘मूनलायटिंग’ म्हणूनही ओळखले जाते. सध्या याच साईड हसलचा भाग म्हणून काही महिला स्वतःचे दूध विकून पैसे कमवत आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या महिला स्वतःचे दूध साठवून, ते ऑनलाइन विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत. काही प्रकरणांमध्ये महिला बॉडीबिल्डर्सना हे दूध विकून दिवसाला तब्बल १,००० डॉलर्स (सुमारे ८६,६२८ रुपये)पेक्षा जास्त पैसे कमवत आहेत. त्यामागील कारण काय? हा व्यवसाय नक्की काय आहे? या दुधाची मागणी वाढण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.
हा प्रकार नक्की आहे तरी काय?
बहुतांश महिला बॉडीबिल्डर्सना आपले दूध विकत आहेत. बॉडीबिल्डर्सचा असा समज आहे की, स्तनाचे दूध स्नायू मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम आहे. अमेरिकेतील अटलांटा येथील केरा विल्यम्स ही ३१ वर्षीय महिला एनआयसीयूमध्ये नर्स आहे. तिने या मे महिन्यात स्वतःचे दूध विकायला सुरुवात केली आणि तेव्हापासून १०३ लिटरपेक्षा जास्त दूध तिने विकले. या व्यवसायातून तिने किती पैसे कमावले आहेत, असे विचारले असता तिने ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितले, “मी एका दिवसात ८०० डॉलर्स म्हणजेच सुमारे ६९,३०२ रुपये कमावले आहेत.” त्याच अहवालात तिने पुढे नमूद केले की, तिने फेसबुक ग्रुप्सचा वापर करून एक कनेक्शन तयार केले आणि हा व्यवसाय सुरू केला.
परंतु, विल्यम्ससारख्या इतरही अनेक महिला आहेत. मिनेसोटामधील ३३ वर्षीय शिक्षिका एमिली एंगेरदेखील या व्यवसायात आहे. तिने ‘द टाइम्स’ला सांगितले, “मला आतून असे वाटले की, आपण हे करूया.” आजवर एंगेरने या व्यवसायातून १,००० डॉलर्सहून अधिक पैसे कमवले आहेत. एंगेरने ‘द टाइम्स’ला सांगितले, “सुरुवातीला मला वाटले माझ्याकडे हे दूध फ्रिजरमध्ये ठेवले आहे, ते मी देऊन टाकावे. पण, मग मला वाटले, तुम्ही दुकानात जाऊन कोणतीही गोष्ट मोफत घेत नाही. दूध तयार करण्यासाठी वेळ व अक्षरशः ऊर्जा लागते आणि त्याला महत्त्व दिले पाहिजे.”

स्तनाचे दूध विकण्याचा हा एक ट्रेंड झाला आहे. हा ट्रेंड केवळ अमेरिकेपर्यंत मर्यादित नसून, ब्रिटनमध्येही तो वाढताना दिसत आहे. अनेक नवीन माता त्यांचे स्तनाचे दूध प्रीमियम दराने पॅक करून विकत आहेत. ‘डेली मेल’च्या वृत्तात एमिली नावाच्या एका महिलेने तिच्या कामाबद्दल सांगितले, “मी गृहिणी आहे आणि मुलांच्या संगोपनाच्या खर्चामुळे मी या व्यवसायात उतरले आहे.” तिने पुढे सांगितले, “जर पुरुष किंवा स्त्रिया माझे स्तनाचे दूध वापरण्यासाठी मला पैसे देण्यास तयार आहेत. त्यात सर्व वयोगटांसाठी फायदेशीर, असे अद्भुत गुणधर्म आहेत, तर मी जे काही विनामूल्य तयार करते त्यातून निश्चितच काही पैसे कमवेन.”
या दुधाची मागणी वाढण्याचे कारण काय?
अनेक महिला अतिरिक्त पैशांसाठी स्वतःचे दूध विकत आहेत. मात्र रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी सुरू केलेल्या ‘मेक अमेरिका हेल्दी अगेन’ या चळवळीमुळेदेखील स्तनाचे दूध वापरण्याचे प्रमाण वाढले आहे, असे त्यांचे मत आहे. अमेरिकेचे आरोग्य आणि मानवी सेवा सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी अमेरिकेतील बेबी फॉर्म्युलाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परिणामी नवीन मातांच्या दुधाची मागणी वाढली आहे. टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘ब्रेस्ट इज बेस्ट’ यावर बरीच चर्चा सुरू आहे. त्यात माता आणि तज्ज्ञ इतर सर्व गोष्टींपेक्षा स्तनाच्या दुधाचे फायदे सर्वोत्तम असल्याचे सांगत आहेत.
अनेक मातांना पुरेसे दूध तयार करता येत नाही. तसेच अनेक माता अशाही आहेत की, ज्यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्या स्तनपान करू शकत नाहीत. परंतु, या ट्रेंडमुळे या माता आपल्या बाळांसाठी दूध खरेदी करीत आहेत. ‘ब्रेस्ट मिल्क कम्युनिटी फॉर ऑल’ नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये ३३,००० सदस्य आहेत. या ग्रुपमधील मतांचे म्हणणे आहे की, त्या त्यांच्या मुलाला दुकानातून विकत घेतलेल्या फॉर्म्युलाऐवजी अनोळखी व्यक्तीचे दूध देतील.
“स्तनपान करणे ही माझी कायमची इच्छा होती; पण मी अशी औषधे घेते, ज्यामुळे बाळाला स्तनपान करणे असुरक्षित ठरते,” असे फ्लोरिडामधील फोर्ट लॉडरडेल येथील सदस्य ब्रायना वेस्टलँड म्हणाली. ती दरमहा दूध खरेदी करण्यासाठी सुमारे १,२०० डॉलर्स खर्च करते. तिने ‘द टाइम्स’ला सांगितले, “मानवी दुधाच्या पोषणमूल्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही.”
बॉडीबिल्डर्स या दुधाची मागणी का करत आहेत?
- केवळ माताच स्तनाचे दूध खरेदी करू इच्छित नाहीत. बॉडीबिल्डर्सकडूनदेखील याची मागणी वाढली आहे. ते या दुधाला ‘सुपर फूड’ मानतात आणि त्यांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी योग्य मानतात.
- त्यांनी या दुधाला ‘लिक्विड गोल्ड’, असे नाव दिले आहे. अनेक बॉडीबिल्डर्स सांगतात की, स्तनाच्या दुधात स्नायू वाढवण्यासाठी आणि आकारात येण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात.
- खरं तर, नेटफ्लिक्स मालिका (Un)Well ने या कल्पनेवर अधिक प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये हौशी बॉडीबिल्डर जेम्स रोटेनूर म्हणतो, “जर मला आपले शरीर वाढवायचे असेल, तर मी बाळासारखे खाईन, मी बाळासारखे झोपेन आणि जर स्तनाचे दूध पिणे त्याचा भाग असेल, तर मी निश्चितच त्याचा फायदा घेईन.”
प्रेसिजन न्यूट्रिशनचे स्पोर्ट्स डायटिशियन ब्रायन सेंट पियरे यांनी ‘मेन्स हेल्थ’ला सांगितले, “मला वाटते की, स्नायूंच्या वाढीसाठी स्तनाचे दूध उत्तम आहे. कारण- ते कॅलरी आणि पोषक घटकांनी भरलेले आहे आणि त्यात काही अतिरिक्त आरोग्यदायी पदार्थदेखील आहेत.” परंतु, अनेक फिटनेस तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्तनाचे दूध पिण्याचे कोणतेही फायदे नाहीत. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुझवेल्टमधील स्त्रीरोग विभागाचे संचालक डॉ. जॅक मॉर्टिझ यांनी ‘एबीसी न्यूज’ला सांगितले, स्तनाच्या दुधात तसे काहीही विशिष्ट नाही, जे प्रौढांच्या स्नायूंची वाढ करण्यास मदत करील.”
स्त्रियांना आरोग्याचा धोका
स्वतःचे दूध विकल्यामुळे स्त्रियांना कायदेशीर आणि आरोग्यविषयक परिणाम भोगावे लागू शकतात. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी या व्यवसायाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. ते म्हणतात की, दूध दूषित असू शकते आणि अतिरिक्त दूध पम्प करणे स्त्रियांसाठी हानिकारक ठरू शकते. स्तनपान सल्लागार रॅशेल वॉटसन यांनी इशारा दिला की, विक्रीसाठी अतिरिक्त दूध पम्प करणे आई आणि बाळासाठीदेखील हानिकारक असू शकते. त्यांनी सांगितले, “स्त्रियांना जास्त दूध पम्प केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यात मास्टायटिस (स्तनदाह), निप्पल ब्लेब्स (स्तनाच्या टोकावर होणारे फोड), निप्पल ट्रॉमा (स्तनाच्या टोकाला होणारी इजा) व स्तनातील मायक्रोबायोम (स्तनातील सूक्ष्मजीवांचे संतुलन) बिघडू शकते.”
रॅशेल वॉटसन यांनी ‘डेली मेल’ला सांगितले, “तुमचे शरीर तुमच्या बाळाच्या आवश्यकतेपेक्षा एक थेंबही जास्त उत्पादन करण्यासाठी डिझाइन केलेले नाही. तसेच दूध गोठवल्याने दुधातील चरबी, कॅलरीज आणि सूक्ष्म पोषक घटकांचे प्रमाणदेखील कमी होते.” वैद्यकीय तज्ज्ञांनी असेही नमूद केले आहे की, ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या स्तनाच्या दुधामध्ये अनेकदा रोग निर्माण करणारे जीवाणू आढळले आहेत. काही प्रकरणांमध्ये स्तनाच्या दुधात संसर्गजन्य रोगजंतू होते, तर इतरांमध्ये पर्यावरणीय दूषित पदार्थ होते.
नॅशनवाइड चिल्ड्रन्स हॉस्पिटलने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, ऑनलाइन खरेदी केलेल्या स्तनीय दुधाच्या १०१ नमुन्यांपैकी १० टक्के नमुन्यांमध्ये गाईचे दूध किंवा बेबी फॉर्म्युलाची भेसळ होती. त्याशिवाय ७५ टक्के नमुन्यांमध्ये रोगजनक किंवा रोग निर्माण करणारे जीवाणू / विषाणू होते.