पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. हा हल्ला होऊन एक आठवडा ओलांडला आहे. हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २२ एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात किमान दोन पाकिस्तानी नागरिक आणि दक्षिण काश्मीरच्या एका राहिवाश्याचा सहभाग आहे. या हल्ल्यात तब्बल २६ लोकांचा मृत्यू झाला होता.

दहशतवाद्यांना शोधण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्यात आली आहे. भारतीय यंत्रणांचा असा अंदाज आहे की, दहशतवादी अजूनही त्याच भागात आहेत. पहलगाम हल्ल्यातील सुरू असलेल्या तपासातून नक्की काय माहिती समोर आली? दहशतवाद्यांना पकडणे आव्हानात्मक का ठरत आहे? हल्ल्यात सहभागी असणारे दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच आहेत का? त्याविषयी जाणून घेऊयात.

पहलगाममधील हल्लेखोर २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी पहलगामपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य बैसरन व्हॅलीमध्ये होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पहलगाम हल्ल्याच्या तपासातून काय समोर आले?

पहलगाममधील हल्लेखोर २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी पहलगामपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य बैसरन व्हॅलीमध्ये होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर ओव्हर ग्राउंड वर्कर्स यांनी चौकशी सुरू केली. या तपासातून असे दिसून आले की, दहशतवाद्यांनी अरु व्हॅली, बेताब व्हॅली आणि एका पार्कसह तीन इतर पर्यटनस्थळांची रेकी केली होती.

परंतु, या ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने त्यांनी या ठिकाणांना लक्ष्य केले नाही, असे वृत्त सूत्रांच्या माहितीने ‘एनडीटीव्ही’ने दिले. त्याऐवजी दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीची निवड केली. या ठिकाणी केवळ पोनी राईड किंवा पायी जाता येते. ‘इंडिया टुडे’च्या सूत्रांनुसार, दोन दहशतवादी मुख्य प्रवेशद्वारातून व्हॅलीमध्ये आले. एक दहशतवादी बाहेर पडण्याच्या मार्गावर होता आणि चौथा बचाव करण्यासाठी आसपासच्या पाइन जंगलात लपला असल्याचे सांगण्यात आले.

यापैकी तीन दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅली फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. गोळीबार सर्वात आधी बाहेर पडण्याच्या एका गेटजवळ करण्यात आला, त्यामुळे पर्यटक घाबरले आणि नंतर प्रवेशद्वाराच्या दिशेने धावले. तिथे असणाऱ्या इतर दोन दहशतवाद्यांनीही पर्यटकांवर गोळीबार केला. तपास अहवालात म्हटले आहे की, हल्लेखोरांकडे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी प्रगत संप्रेषण उपकरणे होती. या उपकरणांना सिम कार्डची आवश्यकता नसते आणि कमी अंतरावरून एकमेकांशी संपर्क साधता येतो. भारतीय सुरक्षा दलांच्या रडारपासून वाचण्यासाठी त्यांनी हल्ल्यापूर्वी तीन सॅटेलाइट फोन वापरले असावेत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

तीन दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅली फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी?

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्ये आहेत. या दहशतवाद्यांकडे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी साहित्य आहे, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) सूत्रांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले आहे. दहशतवाद्यांकडे सर्व साहित्य म्हणजेच अन्न आणि इतर आवश्यक वस्तू असल्याने ते घनदाट जंगलात लपून राहू शकतात. त्यांना बाहेरील मदतीची आवश्यकता नाही आणि त्यामुळेच ते घनदाट जंगलात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक का ठरत आहे?

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी असणे हे सुरक्षा दलांसाठी मोठे आव्हान आहे, कारण दहशतवाद्यांना या प्रदेशाची माहिती आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे, जे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. गेल्या चार वर्षांत, जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतलेले, प्रगत रायफल्स आणि दळणवळण उपकरणांनी सज्ज असलेले हे पाकिस्तानी नागरिक जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशत पसरवत आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “आम्ही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दहशतवादाविरुद्ध लढत आहोत. गेल्या दोन वर्षांत आमच्या लक्षात आले आहे की, या दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडे अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या रायफल्स आहेत आणि त्यांच्याकडे बुलेटप्रूफ जॅकेट आहेत.”

ते पुढे म्हणाले, “त्यांच्या प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रांवरून ते पाकिस्तानी लष्कराचे सैनिक किंवा निवृत्त अधिकारी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.” हे दहशतवादी तीन ते चार जणांच्या गटात फिरतात, त्यामध्ये किमान एका सदस्याकडे अमेरिकन बनावटीचा M4 कार्बाइन असतो. हलक्या वजनाची ही रायफल एका मिनिटात सुमारे ९०० राउंड फायर करू शकते. दहशतवादी त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत आहेत.

जम्मूतील कठुआपासून खोऱ्यातील दक्षिण काश्मीरपर्यंत दाट जंगल पसरलेले आहे. ही जंगले इतकी दाट आहेत की, काही ठिकाणी १० मीटरपेक्षाही कमी दृश्यमानता आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक असणारा हाशिम मुसा ऊर्फ सुलेमान हा प्रशिक्षित आहे आणि जंगलात राहण्यात पारंगत आहे, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.

लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, दहशतवादी त्यांच्या हल्ल्याची एक सविस्तर योजना तयार करतात. “ते अनेक महिने योजना आखतात, हल्ल्यापूर्वी गुप्तचर परिस्थितीचा आढावा घेतात. मुख्य म्हणजे त्यांच्या सुटकेचा मार्ग ते आधीच ठरवतात. बैसरन हल्ल्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास असे दिसते की, त्यांना सैन्य किती वेळात प्रतिक्रिया देऊ शकेल याचा अंदाज होता.

त्यांना माहीत होते की त्यांना पायी प्रवास करावा लागेल आणि त्यासाठी त्यांना एक तास लागेल,” असेही वृत्तात सांगण्यात आले आहे. पहलगाममधील हल्लेखोर अनंतनागच्या वरच्या भागात लपले असल्याचा संशय आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी ते तांत्रिक पुराव्यांची आणि स्थानिकांची मदत घेत आहेत, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.