Jaish-e-Mohammed Women Terrorist : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने अलीकडेच पाकिस्तानमधील प्रत्येक जिल्ह्यात महिला जिहाद ब्रिगेडची शाखा उघडण्याची घोषणा केली. त्या संदर्भात संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याची २१ मिनिटांची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये मसूद हा महिलांना दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करत असल्याचे दिसून येत आहे. जमात-उल-मोमिनत नावाच्या मोहिमेत सामील होणाऱ्या महिलांना मृत्यूनंतर थेट जन्नतमध्ये जागा मिळेल, असा दावाही तो करीत आहे. यापूर्वी जैश-ए-मोहम्मदने महिलांचा ब्रेनवॉश करण्यासाठी ऑनलाईन ‘जिहादी’ कोर्स सुरू केल्याची बातमी समोर आली होती. पाकिस्तानमध्ये महिला दहशतवादी कशा तयार होत आहे? त्याचाच हा आढावा…
दौरा-ए-तस्किया काय आहे?
पाकिस्तानमधील महिलांना दहशतवादी कारवायांशी जोडण्याचा मसूद अजहर याचा हा प्रयत्न भारतासाठी धोकादायक असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही वर्षांत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत, ज्यात उरी आणि पुलवामा येथील भ्याड हल्ल्यांचा समावेश आहे. यादरम्यान मसूद अजहर याने महिलांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्यासाठी पुरुषांप्रमाणेच एक प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. या दहशतवादी मोहिमेला ‘दौरा-ए-तस्किया’ असे नाव देण्यात आले आहे. त्याअंतर्गत महिलांमध्ये कट्टर विचारधारा रुजवली जाणार असून बहावलपूरमधील मरकज उस्मान-ओ-अली येथे १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिहाद कसा करावा याचे प्रशिक्षण
प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना दौरा-आयत-उल-निसाह अंतर्गत ‘जिहाद कसा करावा’ याचे प्रशिक्षण दिले जाईल. धक्कादायक बाब म्हणजे, मसूदने या नव्या महिला ब्रिगेडला भारताच्या रणरागिणींशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. “इस्लाम धर्माच्या शत्रूंनी हिंदू महिलांना भारतीय सैन्यात भरती करून घेतले आहे. महिला पत्रकारांनादेखील आमच्याविरोधात उभे केले जात आहे. या शत्रूंचा प्रतिकार करण्यासाठी आपण जिहादी महिला ब्रिगेड उभारत आहोत”, असे मसूदने त्याच्या भाषणात म्हटले आहे. दरम्यान, मसूदचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा भारतीय महिला संरक्षण दलांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत.
भारतीय सैन्यदलातील महिलांचे सामर्थ्य
- २०२३ मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतीय सैन्यदलात सध्या सुमारे ७,००० महिला अधिकारी कार्यरत आहेत.
- याशिवाय हवाई दलात १,६०० हून अधिक महिला अधिकारी चोख कर्तव्य बजावत आहेत.
- भारताची पहिली महिला राफेल फायटर पायलट शिवांगी सिंह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अंबाला हवाई दलाच्या तळावर नुकतीच राफेल विमानाची माहिती दिली.
- भारतीय लष्करात महिलांच्या वाढत्या सामर्थ्याला लक्ष्य करून जैश-ए-मोहम्मद दहशतवादासाठी महिलांचा वापर करण्याचा कट रचत आहे.
- मसूद याने महिलांच्या भरतीसाठी उघडलेल्या ‘जमात-उल-मोमिनात’ युनिटचा मुख्य उद्देश मुस्लीम महिलांच्या मनात जिहारी विचारधारा रुजवणे आणि त्यांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करणे असा आहे.
मसूदने पाकिस्तानी महिलांना काय आवाहन केले?
‘जमात-उल-मोमिनत’मध्ये सामील होणाऱ्या महिलांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिलांना अनोळखी पुरुषांशी फोन किंवा मेसेंजरद्वारे बोलण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यांना केवळ पती किंवा जवळचे कुटुंबीय यांच्याशी बोलण्याची परवानगी आहे. मसूदने पाकिस्तानी महिलांना ‘ए मुसलमान बहना’ हे त्याचे पुस्तक वाचण्याचे आवाहनही केले आहे. या मोहिमेचे नेतृत्व त्याने सादिया अझर (मसूदची बहीण) हिच्याकडे सोपवल्याची माहिती आहे. मसूदची दुसरी बहीण समीरा अझर आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार उमर फारूकची पत्नी अफीरा फारूक यांचाही जिहाद ब्रिगेडमध्ये समावेश आहे.
भारताने राबवले होते ऑपरेशन सिंदूर
मसूदने घोषणा केली आहे की, या महिला युनिटच्या शाखा पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उघडल्या जातील आणि त्याचे नेतृत्व एका महिलेकडेच असेल. स्थानिक पातळीवरील महिलांना या मोहिमेत सामील करून घेण्याची जबाबदारीही जिहाद ब्रिगेडच्या प्रमुखाची आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यावेळी भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील मुख्यालयावरही हल्ला केला होता. या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी ठार झाले होते.
महिलांसाठी ‘जिहादी’ कोर्स
- जैश-ए-मोहम्मदने महिलांच्या भरतीसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन ‘जिहादी’ कोर्स आणि सोशल मीडिया जाहिरातींवर भारतीय गुप्तचर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
- जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातील अनेक संशयितांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
- दहशतवादी विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एनडीटीव्हीला सांगितले की, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना धास्तावलेल्या आहेत.
- या संघटनांकडून आता महिलांचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणा त्यांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
- पाकिस्तानने दहशतवादाला कितीही खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला तरी तो हाणून पाडला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मसूद अजहर कोण आहे?
दहशतवादी मसूद अजहर हा २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने २०१६ च्या पठाणकोटमध्येही हल्ला घडवून आणलेला आहे. या प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, मसूदने भारतावर हल्ले करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदच्या कार्यकर्त्यांचा वापर केला. २००५ मध्ये मसूदने अयोध्येतील रामजन्मभूमीवरील हल्ले आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्याचेही नियोजन केले. याशिवाय २०१६ मध्ये उरी हल्ला आणि अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ येथील भारतीय वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यासाठीही मसूद जबाबदार आहे.
