ज्या वयात जास्त काम करून, त्या कामाचा सन्मान मिळवला जातो, त्या काळात झोपेशी तडजोड करणे आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी मानसिक व शारीरिक आरोग्याशी तडजोड करणे हे सध्या खूप सामान्यापणे होताना दिसते. सातत्याने जर तुमची झोप अपुरी राहत असेल, तर ती फक्त गैरसोयच म्हणून नाही तर त्यानंतर पुढे मोठे आरोग्य संकट आहे. एकंदरच अपुऱ्या झोपेचे प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी उत्पादकतेवर परिणाम होतात. निर्णय घेण्याच्या क्षमतेत बिघाड होण्यापासून ते दीर्घकालीन आजाराच्या वाढत्या जोखमीपर्यंत अपुऱ्या झोपेचे गंभीर परिणाम होतात.
वसंत कुंज इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी, क्रिटिकल केअर व स्लीप मेडिसिनचे वरिष्ठ संचालक व प्रमुख डॉ. प्रशांत सक्सेना यांनी फर्स्टपोस्टशी बोलताना दीर्घकालीन झोपेच्या कमतरतेचे आरोग्य, कॉग्निटिव्ह म्हणजेच संज्ञानात्मक परिणाम व जास्त कामाचा दबाव असलेल्या वातावरणात झोपेला प्राधान्य देण्याची तत्काळ गरज याबाबत माहिती दिली.
झोपेच्या दीर्घकालीन कमतरतेचे परिणाम
झोपेच्या अभावामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग व कमकुवत प्रतिकारशक्ती यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. मानसिक आरोग्यावरही त्याचा तितकाच परिणाम होतो. त्यामुळे नैराश्य आणि अगदी कॉग्निटिव्ह अर्थात संज्ञानात्मक नुकसानदेखील होते. तज्ज्ञांच्या मते, प्रौढांना दररोज रात्री सात ते नऊ तासांची झोप आवश्यक असते. मात्र, यामध्ये नियमितपणे एवढी झोप पूर्ण झाली नाही, तर हार्मोनल संतुलन आणि शारीरिक कार्ये बिघडतात. परिणामी इतर आजारही उद्भवण्याची शक्यता असते.
उत्तम उत्पादकतेत काम करणाऱ्या व्यावसायिकांनी फक्त चार ते पाच तासांच्या झोपेचा दावा करणे खरे तर सामान्य आहे. असे असतानाही वैद्यकीय पुरावे या दाव्याला मोठ्या प्रमाणात विरोध करतात. तात्पुरती ही सवय हानिकारक नाही. पण सातत्याने झोप कमी होत असेल, तर लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती कमी होणे, चुका, अपघात यांचा धोका वाढतो.
थकवा विरुद्ध झोपेचा अभाव
तणावाशी संबंधित थकवा आणि झोपेचा अभाव हे अनेकदा सारखेच परिणाम करतात. दीर्घकाळापर्यंत मानसिक किंवा भावनिक तणावामुळे बर्नआउट होऊ शकते. झोपेचा अभाव हा काही वेळा अपुऱ्या विश्रांतीमुळे होतो. एका समस्येकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या समस्येवर उपचार केल्याने आरोग्यावर त्याचे भलतेच परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अचूक निदान आणि त्यावरील ठोस उपाय करणे परिणामकारक ठरू शकते.
झोपेअभावी कामगिरीवर परिणाम
कॉग्निटिव्ह (संज्ञानात्मक) आणि कार्यात्मक परिणाम
झोप कायम अपुरी होत असेल, तर समस्या सोडवणे, एकाग्रता व निर्णयक्षमता यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर परिणाम होतो. संशोधनातून असे समोर आले आहे की, एखाद्या व्यक्तीचा थकलेला मेंदू हा दारूच्या सौम्य नशेत असलेल्या व्यक्तीच्या मेंदूप्रमाणेच कार्य करतो. प्रतिक्रिया देण्यास विलंब होणे, निर्णय घेण्यात अडचणी, उत्पादकतेवर परिणाम यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याचे परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर ती व्यक्ती ज्या संस्थेसाठी काम करते त्यांच्यावरदेखील होतात.
कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण संबंध
झोपेचा अभाव भावनिक बुद्धिमत्तेवरही परिणाम करतो. त्याचा संवाद क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे सामाजिक किंवा परस्पर संघर्ष निर्माण होऊ शकतात. मग त्यातून कामाच्या ठिकाणी गैरसमज आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. उत्तम विश्रांती घेतलेला कर्मचारी रचनात्मकपणे काम करण्याची आणि उत्तम व्यावसायिक संबंध राखण्याची शक्यता जास्त असते.
आरोग्य सेवा, आपत्कालीन सेवा, विमान वाहतूक व वित्त यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेकदा बदलत्या शिफ्ट, कामाचे अनियमित तास आणि सतत सतर्कतेची आवश्यकता यांमुळे मेंदू आणि शरीराला आराम मिळत नाही. त्यामध्ये झोपेच्या कमतरतेमुळे या समस्या आणखी गंभीर रूप घेतात. या संदर्भात झोपेच्या महत्त्वाबाबत, तसेच मानसिक आरोग्याबाबत काही व्यावसायिक संस्थांनी पुढाकार घेत, संबंधित कार्यक्रम राबवून या समस्यांचे निराकरण करता येऊ शकते.