राजस्थानमध्ये गेली काही वर्षे काँग्रेस आणि भाजपच्या पारड्यात आलटूनपालटून सत्ता येते. यंदा त्यामुळेच सत्ता राखणे काँग्रेससाठी आव्हानात्मक होते. तशात काँग्रेस पक्ष अंतर्गत विरोधांनी पोखरला होता. शिवाय गेहलोत सरकार हिंदूविरोधी असल्याचा प्रचार भाजपने केला, त्यानेही मतदारांवर प्रभाव पडला. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जादू का ओसरली?

महिला व दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे गेहलोत यांच्या सरकारला बदनामी सहन करावी लागली. महिला-दलितांविरोधातील गुन्ह्यांची तातडीने दखल घेऊन पोलिसांमध्ये नोंद केल्याचा गेहलोतांचा दावा फारसा प्रभावी ठरला नाही. गेहलोत यांचे समर्थक आमदार शांती धारिवाल यांनी महिला अत्याचाराच्या संदर्भात, राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. महिला मतदार काँग्रेसपासून दूर जाण्यास अशा घटना कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. गेहलोत यांच्याविरोधात वैयक्तिक नाराजी नसली तरी, त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना मोकळे रान दिले होते. जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये आमदारच ‘मुख्यमंत्री’ बनल्याची तक्रार मतदार करताना दिसले. काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या नाराजीमुळे गेहलोत यांचे नेतृत्वही प्रभावहीन ठरत गेले. याशिवाय, राजेंद्र गुढा या तत्कालीन मंत्र्याने गेहलोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गुढांनी विधानसभेत दाखवलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या ‘लाल डायरी’चा उल्लेख करत मोदींनी गेहलोतांवर शाब्दिक हल्लाबोल केला होता.  

East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Rahul Gandhi do a miracle
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

हेही वाचा – विश्लेषण : मोदींचा करिष्मा, आदिवासींचा रोष छत्तीसगडमध्ये काँग्रेसला भोवला?

‘पेपरलीक’ प्रकरणांसह अन्य प्रकरणांमध्ये ‘ईडी’च्या चौकशीचा परिणाम झाला का?

शिक्षणमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा यांच्या कथित पेपरलीक प्रकरणाचा राजस्थानमध्ये गाजावाजा झाला होता. डोटासरा यांच्या कुटुंबियांविरोधात ‘ईडी’ने कारवाई सुरू केली होती. ऐन निवडणुकीच्या काळात डोटासरांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते. याशिवाय गेहलोत यांचे पुत्र वैभव यांच्या कथित भ्रष्टाचाराचीही चौकशी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेहलोत सरकारचा भ्रष्टाचार हाच प्रचारातील प्रमुख मुद्दा बनवला होता. गेहलोत सरकारविरोधी जनमत निर्माण करण्यात ‘ईडी’च्या चौकशीने मोठी भर घातल्याचे मानले जात आहे.

तुष्टीकरणाविरोधात ध्रुवीकरण यशस्वी?

काँग्रेसच्या कथित तुष्टीकरणाविरोधात ध्रुवीकरणाचा भाजपचा डाव अधिक यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. उदयपूरमधील कन्हैयालाल याच्या हत्येनंतर भाजपने काँग्रेसवर मुस्लिम अनुनयाचा आरोप केला होता. जयपूरमध्ये रस्ते अपघातात मुस्लिम तरुणाच्या मृत्यूनंतर गेहलोत सरकारने मृताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई, कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली होती. या प्रकरणावरून हवामहल भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता. अशा घटनांमुळे भाजपच्या ध्रुवीकरणाला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

‘पाकिस्तानची नजर’चा मुस्लिमविरोधी प्रचार भाजपसाठी किती उपयुक्त?

भाजपने हिंदू एकीकरणाच्या रणनीतीचा प्रभावी वापर केल्याचे दिसले. काही मतदारसंघांमध्ये महंतांना उमेदवारी देऊन हिंदुत्वाचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाले. पोखरणमध्ये प्रतापपुरी महाराज, तिजारामध्ये बाबा बालकनाथ, हवामहलमध्ये बालमुकुंदाचार्य आदी योगी-बाबांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्यात आले होते. त्यांचे मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. दिल्लीचे वादग्रस्त व कडवे हिंदुत्ववादी खासदार रमेश बिधुडी यांनी, राजस्थानवर पाकिस्तानची नजर असल्याचे विधान करून हिंदू मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा यांनी मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार केला होता.

हेही वाचा – विश्लेषण : मध्य प्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश कसे मिळाले?

गेहलोत-पायलट मतभेदाचा काँग्रेसला फटका?

काँग्रेससाठी गेहलोत हेच प्रमुख प्रचारक होते. यावेळी सचिन पायलट प्रचारात फारसे सक्रिय नव्हते. आपल्या टोंक मतदारसंघामध्येच ते अधिक प्रचार करताना दिसले. गेहलोत व पायलट यांच्यातील मतभेद मिटल्याचे चित्र काँग्रेसने उभे करण्याचा प्रयत्न प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये केला असला तरी, मतदारांना दोन नेत्यांमधील कृत्रिम ऐक्य भावले नसल्याचे दिसते. सचिन पायलट गुर्जर समाजातील नेते असून गेल्या वेळी पायलट मुख्यमंत्री बनू शकतील या आशेने गुर्जर मतदारांनी काँग्रेसला मते दिली होती. यावेळी मात्र पायलट यांचे काँग्रेसमधील स्थान डळमळीत असल्याने गुर्जरांनी भाजपला मते देणे अधिक पसंत केल्याचे मानले जात आहे. गेहलोत व पायलट यांच्यामध्ये दिलजमाई करण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न अपयशी ठरला.

भाजपसाठी जातींची समीकरणे कितपत लाभदायी ठरली?

पारंपरिक राजपूत, ब्राह्मण, बनिया मतदार भाजपकडे कायम राहिले. राहुल गांधींच्या ओबीसी जनगणनेच्या प्रचाराचा फारसा प्रभाव पडला नाही. ओबीसींमधील माळी वगळता अन्य ओबीसींनी भाजपला मतदान केल्याचे सांगितले जाते. याशिवाय यादव, गुर्जर, जाट तसेच, दलितांमधील मेघवाल आदी जातसमूहही भाजपकडे वळाल्याचे मानले जात आहे. मुस्लिम, दलितांमधील काही जाती, ओबीसींमधील माळी, आदिवासींमधील प्रमुख समूह मीणा मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे मानले जाते.

मोदींचा प्रभाव किती निर्णायक?

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना रंगल्याचे दिसत होते. काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आदी केंद्रीय नेत्यांनी प्रचार केला असला तरी, मोदींनी गेहलोत यांना लक्ष्य केले होते. भाजपने राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला नसल्याने मोदींचे नेतृत्व निर्णायक ठरले. भाजपमध्ये वसुंधरा राजे यांच्याशी असलेल्या मतभेदाचा परिणाम निवडणूक निकालांवर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राजा मानसिंह यांच्या राजघराण्यातील दियाकुमारी यांना उमेदवारी देऊन वसुंधरा राजेंना शह दिला गेला.