Human brains preserve for 12000 years मानवी शरीराचे अवशेषरुपी भाग सापडणाऱ्या पुरातत्त्व अभ्यासकाला भाग्यवान मानले जाते. शेकडो किंवा हजारो वर्षांपासून संरक्षित मानवी हाडे किंवा दात शास्त्रीय सर्वेक्षणात सापडण्याची शक्यता असते. परंतु अभ्यासकांना टेंडन (tendons), स्नायू आणि त्वचा फार क्वचितच आढळते, कारण मऊ ऊतक कालांतराने विघटित होतात. परंतु सध्या मेंदूच्या बाबतीत हा नियम अपवाद ठरत आहे.
प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी या जर्नलमध्ये (Human brains preserve in diverse environments for at least 12000 years. Alexandra L. Morton-Hayward, Ross P. Anderson, Erin E. Saupe, Greger Larson and Julie G. Cosmidis) बुधवारी प्रकाशित झालेल्या एका नवीन शोध निबंधातील संशोधनासाठी ४,४०० हून अधिक जतन केलेल्या मानवी मेंदूंचा जगाच्या वेगवेगळ्या भागातून शोध घेण्यात आला. त्यातील काही मेंदू तब्बल १२ हजार वर्षे जुने आहेत. तर १,३०० पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये, शरीरातील मेंदू हा एकमेव मऊ ऊतक टिकून आहे. फक्त मेंदूच का टिकून राहिला यासाठी कोणतेही स्पष्टीकरण नाही.
या संशोधनाला कधी सुरुवात झाली?
या शोध निबंधाच्या सह-लेखिका अलेक्झांड्रा मॉर्टन-हेवर्ड सध्या इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात पॅलिओबायोलॉजिस्ट आहेत. सुरुवातीच्या कालखंडात एक अंडरटेकर म्हणून काम करत असताना त्यांना मेंदूविषयी कुतूहल निर्माण झाले. त्यांच्या लक्षात आले की, मेंदू सामान्यत: इतर अवयवांपेक्षा वेगाने विघटित होतो, द्रव होतो आणि फक्त एक रिकामी कवटी मागे ठेवतो. परंतु काही प्रकारांमध्ये मेंदू आजही जेलीसारख्या अवस्थेत आहे असे त्यांनी सायन्सच्या अँड्र्यू करीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांच्या पीएचडी अभ्यासादरम्यान त्यांनी ८००० वर्षे जुन्या मानवी सांगाड्याच्या कवटीत सापडलेल्या अखंड मेंदूबद्दल वाचले. त्यानंतर उत्सुकतेपोटी त्यांनी मानवी मेंदूचा संदर्भ देणारी आणखी कागदपत्रे शोधण्याचे ठरवले.
संरक्षित मेंदू शोधणे ही एक दुर्मिळ आणि असामान्य घटना आहे असे संदर्भ त्यांच्या वाचनात आले. त्यांनी त्या विषयी अधिक खोलवर शोध घेत संबंधित वाचन केले. त्यावेळी त्यांना जाणवले की पूर्वी पासून जो विचार करण्यात येत आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. नवीन शोधनिबंधासाठी, मॉर्टन-हेवर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरातत्व रेकॉर्डमध्ये वर्णन केलेल्या ज्ञात संरक्षित मानवी मेंदूंची सूची तयार केली. हा सर्वसमावेशक डेटाबेस तयार केल्याने त्यांना अधिक नमुने शोधण्याची परवानगी मिळाली.
अधिक वाचा: मध्यप्रदेशातील वाग्देवी मंदिर आणि कमल मौला मशीद यांच्यातील नेमका वाद काय आहे?
जतन केलेले मेंदू “सामान्य, परिपूर्ण, ताजे” मानवी मेंदूसारखे दिसतात. त्यांचे आकारमान नेहमीच्या मेंदूच्या आकाराच्या पाचव्या भागाइतके असते असे मॉर्टन-हेवर्ड यांनी सायन्सला सांगितले. त्यांच्यात सामान्यत: “टोफू सारखी सुसंगतता असते,” असेही त्यांनी नमूद केले. हे वेगवेगळे मेंदू दक्षिण अमेरिकन ज्वालामुखीच्यावर असलेल्या बोग बॉडी तसेच मध्ययुगीन स्मशानभूमींमध्ये, इजिप्शियन नेक्रोपोलिसमध्ये आणि स्पॅनिश गृहयुद्धातील सामूहिक कबरींमध्ये सापडले आहेत.
या प्राचीन मेंदूचे जतन नेमके कसे झाले?
बऱ्याच प्रकरणांमध्ये, निर्जलीकरण किंवा फ्रीझ-ड्रायिंग यांसारख्या प्रक्रियांद्वारे मेंदूचे संरक्षण सहजपणे झाले. जवळपास ३८ टक्के मेंदू निर्जलीकरणामुळे संरक्षित राहिले आणि ३० टक्के सॅपोनिफाइड होते, ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शरीरातील चरबीपासून ग्रेव्ह वॅक्स म्हणून ओळखला जाणारा संरक्षक पदार्थ तयार होतो. तर २ टक्क्यांपेक्षा कमी मेंदू फ्रोझन अवस्थेत होते आणि १ टक्क्यांपेक्षा कमी टॅन झाले. परंतु उरलेले ३० टक्क्यांहून अधिक मेंदू अद्याप उघडकीस न आलेल्या प्रक्रियेमुळे संरक्षित केले गेले. ही प्रक्रिया पूर्णपणे भिन्न आहे. या प्रक्रियेमुळे केवळ मेंदू आणि हाडे शिल्लक आहेत. त्वचा, स्नायू, आतडे यापैकी काहीही शिल्लक नाही. या मेंदूंबाबतीत नेमके काय झाले याविषयी अभ्यासकांना ठोस काही सांगता येत नाही. परंतु हे मेंदू वेगवेगळ्या हवामान परिस्थितीत अपघाती ठिकाणांपासून ते दफनांमध्ये सापडले हे मात्र नक्की. हवामानातील भिन्नता हे मेंदूतील एका विशिष्ट घटकाकडे बोट दर्शवते. जे मेंदूला संरक्षित करण्यास करण्यास अनुमती देते, असे मॉर्टन-हेवर्ड यांनी एल पेसच्या मिगुएल एंजेल क्रियाडो याना सांगितले.
डिमेंशिया सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांबद्दल नवीन दृष्टिकोन
एक शक्यता अशी आहे की, पुरातत्त्वीय स्थळांवर लोहासारख्या विशिष्ट पदार्थांचे असणे मेंदूच्या ऊतींना अधिक स्थिर बनवणारी रासायनिक अभिक्रिया सुरू करतअसावे. संशोधकांना अजूनही त्या सिद्धांताची चाचणी करणे आवश्यक वाटते आहे, परंतु ते खरे असेल तर, न्यू सायंटिस्टने म्हटल्याप्रमाणे डिमेंशिया सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांबद्दल नवीन दृष्टिकोन मिळू शकतो.
अधिक वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा दिली?
पुरातत्त्वीय अभ्यासकांनी कोणती काळजी घ्यावी?
एकूणच हे नवीन संशोधन पुरातत्त्वीय अभ्यासकांना उत्खनन किंवा साईट सर्वे करताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देते. पुरातत्त्वीय सर्वेक्षणात अधिक मेंदूचे नमुने मिळण्याची शक्यता आहे. परंतु मेंदूच्या आणि सभोवतालच्या एक समान रंगामुळे या पुराव्याकडे सहज दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेंदूशी संबंधित अवशेष दुर्लक्षित होऊन कचरा म्हणून टाकले जाण्याचीही शक्यता आहे. असे मत ऑस्ट्रेलियातील जेम्स कुक विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ ब्रिटनी मोलर यांनी न्यू सायंटिस्टकडे व्यक्त केले. याशिवाय हे संशोधन असेही दर्शवते की, पूर्वी विचार केल्याप्रमाणे मेंदूचे जतन होणे हे असामान्य नाही. किंबहुना हे संशोधन अभ्यासकांना प्राचीन मेंदूच्या अभ्यासासाठी प्रवृत्त करू शकते. सध्या १ टक्क्यांहून कमी संरक्षित मेंदूंचा अभ्यास जगभरात झाला आहे. त्यामुळे या संशोधनातून अभ्यासकांना नवी दिशा मिळू शकते.