– ऋषिकेश बामणे

वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेली युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात शनिवारी होणाऱ्या जेतेपदासाठीच्या लढतीत कोण विजेता ठरणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. परंतु भारतीय खेळाडूंचे युवा विश्वचषकातील वर्चस्व सातत्याने अधोरेखित होत आहे. सलग चार वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाच्या या वाटचालीचा घेतलेला हा वेगवान आढावा.

भारताचे सध्याचे लक्षवेधी खेळाडू कोण?
यंदाच्या विश्वचषकात सहभागी झालेल्या भारतीय संघाचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा. मुंबईकर अंक्रिश रघुवंशी, निशांत सिंधू, कौशल तांबे हे पहिल्या पाच क्रमांकात फलंदाजी करण्यासह उपयुक्त फिरकी गोलंदाजी करतात. तर राज बावा, राजवर्धन हंगर्गेकर वेगवान गोलंदाजीसह फटकेबाजी करण्यात पटाईत आङेत. कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार शेख रशीद यांची जोडी भारतीय फलंदाजीचा कणा आहे. भारतीय संघ कोणत्याही एका-दुसऱ्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून नाही, हे या स्पर्धेत दिसून आले. पहिल्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. मग सहा जणांना करोना झाल्यानंतरही भारताने उपलब्ध असलेल्या मोजक्या ११ खेळाडूंसह आयर्लंड, युगांडा यांचा धुव्वा उडवला. त्यानंतर मग उपांत्यपूर्व लढतीत गतविजेते बांगलादेश आणि उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करून भारताने सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.

भारताचे विश्वविजेते कर्णधार कोण?
१९८८पासून सुरुवात झालेल्या युवा विश्वचषकाचे यंदा १४वे पर्व सुरू आहे. भारताने आतापर्यंत २०००, २००८, २०१२ आणि २०१८मध्ये युवा विश्वचषकावर नाव कोरले. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला नमवून २०००मध्ये प्रथमच ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर २००८मध्ये विराट कोहलीच्या आक्रमक भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर प्रभुत्व मिळवले. चार वर्षांनी म्हणजेच २०१२मध्ये कर्णधार उन्मुक्त चंदच्या शतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाला नामोहरम करत तिसरे जेतेपद साकारले. मुंबईकर पृथ्वी शाॅने २०१८मध्ये भारताच्या नावावर चौथ्या जेतेपदाची नोंद केली. याव्यतिरिक्त २००६, २०१६ आणि २०२०मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.

भारताच्या वाटचालीचे श्रेय कुणाला?
गेल्या अनेक वर्षांपासून राहुल द्रविड भारत-अ आणि युवा संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत होता. आता त्याने भारताच्या मुख्य संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यामुळे भारताचाच माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) प्रमुखाची सूत्रे स्वीकारली. सध्या हृषिकेश कानिटकर भारतीय युवा संघाचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. किशोरवयीन गटातच उत्तम दर्जाचे मार्गदर्शन लाभल्याने त्याचा परिणाम भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत दिसून येत आहे. सर्वाधिक चार वेळा युवा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघानेच सर्वाधिक आठ वेळा आशिया चषकही उंचावला आहे, हे विशेष. गेल्या काही वर्षांपासून अधिकाधिक खेळाडूंना पैलू पाडण्याच्या उद्देशाने एका खेळाडूला फक्त एकदाच युवा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे संधी देण्यात येते. त्याचेच फलित म्हणून भारतीय क्रिकेटला असंख्य तारे गवसले आहेत.