भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाविरोधात चार गडी राखून विजय मिळवला. अगदीच रोमहर्षक सामन्यामधील शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना फिरला आणि विजयाचं पारडं भारताच्या बाजूने झुकलं. भारताने १६० धावांचं लक्ष्य अगदी २० षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवर गाठलं. रविचंद्रन अश्वीनने भारतासाठी विजयी धावा केल्या. मात्र सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणण्यात विराट कोहलीने मोठा वाटा उचलला. विराट ५२ चेंडूंमध्ये ८२ धावा करत नाबाद राहिला. विराटने सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने सुंदर खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतर डेड बॉलची सोशल मीडियावर चर्चा होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही डेड बॉलच्या मागणीसाठी थेट पंचांसोबत वाद घातल्याचं दिसून आलं. ‘डेड बॉल’ हा शब्द क्रिकेट खेळणाऱ्यांनी आणि या खेळाची जाण असणाऱ्यांनी कधी ना कधी नक्कीच ऐकला असणार. गल्ली क्रिकेटमध्ये तर हा शब्द हमखास वापरला जातो. याच ‘डेड बॉल’वरुन भारत पाकिस्तान सामन्यामध्ये मोठा वाद झाला. नेमकं मैदानात घडलं काय अन् तो चेंडू डेड बॉल का घोषित करण्यात आला नाही पाहूयात…

नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वादग्रस्त निर्णय…
भारत विरुद्द पाकिस्तान सामन्यातील आणि खास करुन शेवटच्या काही षटकांमधील निर्णय हे वादग्रस्त ठरले. अक्षर पटेलला धावबाद देण्याच्या निर्णयावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानी संघाचा विकेटकीपर मोहम्मद रिझवानने ग्लोव्हजने स्टम्प उडवल्याचं अनेकांनी म्हटलं. शेवटच्या षटकामध्ये तर स्क्रीप्टेड ड्रामा वाटावा अशा घटना घडल्या. मेलबर्नच्या मैदानावर शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने मोहम्मद नवाझला उत्तुंग षटकार लगावला. तीन चेंडूमध्ये १३ धावांची गरज असताना विराटने हा षटकार लगावला. फटका मारल्या मारल्या विराटने चेंडूच्या उंचीवर आक्षेप घेतला. पंचांनीही चेंडू नो बॉल असल्याचं घोषित केला.

नेमकं काय सुरु होतं हे रोहितलाही कळलं नाही
पुढील चेंडू नवाजने वाइड टाकला. भारताला तीन चेंडूंत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा करता आल्या. स्टम्पला बॉल लागला बेल्स पडल्या आणि पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास सोडण्याच्या तयारीत असताना विराट क्रिजमध्ये पळत धावा काढू लागला. एका बाजूने विराट आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक अशा दोन्ही वेगाने धावत धावा करणारे खेळाडू क्रिजवर असताना स्लिपमधून सीमारेषेकडे जाणारा चेंडू अडवून पुन्हा विकेटकिपरकडे येईपर्यंत दोघांनी तीन धावा घेतल्या होत्या. डगआऊटमध्ये रोहितलाही नेमकं काय चाललंय कळत नव्हतं. तो सुद्धा ‘क्या हुवा’ असं विचारत असल्याचं स्क्रीनवर पहायला मिळालं.

नक्की वाचा >> Ind vs Pak: थरार विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”

पाकिस्तानी खेळाडूंनी पंचांशी घातला वाद
विराट आणि कार्तिकने पळून तीन धावा काढल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमबरोबरच इतर पाकिस्तानी खेळाडूनही पंचांच्या निर्णयावरुन त्यांच्याशी वाद घालू लागले. पंचांनी या तीन धावा बाईज म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी पंचांंभोवती घोळका करुन या तीन धावा कशा ग्राह्य धरण्यात आल्या याबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र पंचांनी आपला निर्णय काम ठेवला. सोशल मीडियावरही उंचीसंदर्भातील नो बॉल आणि या फ्री हीटवर बोल्ड झाल्यानंतरही विराटने काढलेल्या तीन धावांवरुन पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांकडून भारताने रडीचा डाव खेळल्याचे आरोप केले जात आहेत. समालोचकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार बाबर आझमने हा चेंडू डेड बॉल घोषित करावा अशी मागणी पंचांकडे केली होती. हा चेंडू स्टम्पला लागल्याने तो डेड बॉल घोषित करण्यात यावा अशी पाकिस्तानी खेळाडूंची मागणी होती. या सामन्यानंतर डेड बॉल हा शब्द ट्वीटरवरही ट्रेण्डींग होता.

डेड बॉल केव्हा घोषित करतात? नियम का सांगतात?
एमसीसीच्या क्रिकेटच्या नियमांनुसार एखादा चेंडू तेव्हाच डेड बॉल घोषित केला जातो जेव्हा तो चेंडू विकेटकीपर किंवा गोलंदाजाच्या हातात स्थिरावतो किंवा तो सीमेपार जातो. तसेच फलंदाज बाद झाल्यानंतरही काही ठराविक परिस्थितीमध्ये चेंडू डेड होतो. मात्र फलंदाज बाद झाल्या झाल्या चेंडू डेड असल्याचं पंचांनी घोषित करणं आवश्यक असतं.

नियम २०.१.१ मध्ये डेड बॉलसंदर्भातील तरतूदी नमूद केलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या चेंडूंना डेड बॉल घोषित केलं जातं. यासंदर्भातील निर्णय घेण्याचे संपूर्ण हक्क हे मैदानावरील पंचांकडे असतात. बॉल स्टम्पला लागण्यासंदर्भातील डेड बॉलच्या नियमांनुसार पंच एखादा चेंडू डेड घोषित करु शकतात जेव्हा तो चेंडू खेळण्याआधीच बेल्स खाली पडतात. “स्ट्राइकर एण्डच्या फलंदाजाला चेंडू खेळण्याची संधी मिळण्याच्या आधीच यष्ट्यांवरील एक किंवा दोन्ही बेल्स पडल्या तर चेंडू डेड घोषित केला जातो,” असा उल्लेख नियमांमध्ये आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: अनुष्का शर्माच्या ‘त्या’ पोस्टला ४७ लाखांहून अधिक Likes; विराट कोहली ही कमेंट करत म्हणाला, “प्रत्येक क्षणी माझ्या…”

फ्री हीटला या चारच पद्धतीने फलंदाज होतो बाद
फ्री हीटच्या चेंडूवर फलंदाज केवळ चार पद्धतीने बाद होऊ शकतो. पहिला म्हणजे त्याने चेंडूला हात लावला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने एकच चेंडू दोनदा बॅटने मारला, तिसरी गोष्ट क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणला तर फलंदाजाला बाद घोषित केलं जातं. याशिवाय फ्री हीटवर फलंदाज बाद होण्याची चौथी पद्धत आहे धावबाद होणं. फलंदाज धावबाद झाला तर तो फ्री हीटवरही बाद ठरतो. त्यामुळे विराट बोल्ड झाल्यानंतर सीमारेषेकडे जाणारा चेंडू अडवून तो क्षेत्ररक्षण करणाऱ्याने पुन्हा विकेटकीपरकडे फेकल्याने तांत्रिक दृष्ट्या चेंडू हा मैदानावरच म्हणजेच फिल्डवरच असल्याने तो डेड घोषित करण्यात आला नाही. या तीन धावा मिळाल्याने तीन चेंडूंमध्ये पाच धावावंरुन समीकरण दोन चेंडूंमध्ये दोन धावा असं झालं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak t20 world cup dead ball controversy explained why india were given 3 byes after virat kohli was bowled off free hit vs pakistan scsg
First published on: 24-10-2022 at 10:11 IST