New gold mines India सोने हे संपत्ती, स्थिरता व समृद्धीचे सर्वांत विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रतीक असल्याचे मानले जाते. सोन्याला जगातील सर्वांत महागड्या धातूंमध्ये गणले जाते. शतकानुशतके मानवी इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. कारण- जगभरात आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोने देशांसाठी विश्वासार्ह मालमत्ता राहिली आहे. सोन्याच्या दराने आता एक लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.
भारत नेहमीच खनिज संपत्ती आणि विशेषतः सोन्यासाठी जगभर प्रसिद्ध राहिला आहे. त्यातच एक आनंदाची बातमी म्हणजे एका वर्षात भारतात सोन्याच्या तब्बल तीन खाणी सापडल्या आहेत. ‘एसबीआय रिसर्च’च्या ‘Coming Of (a Turbulent) Age : The Great Global Gold Rush’ या शीर्षकाच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये ओडिशा, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशमध्ये सोन्याच्या नवीन खाणींचा शोध लागला आहे. सोन्याच्या खाणींचा शोध लागल्याने देशाला कसा फायदा होणार? या राज्यांमध्ये सोन्याचा साठा किती? जाणून घेऊयात…
कोणकोणत्या राज्यात सोन्याच्या खाणींचा शोध
ज्या देशाकडे सर्वाधिक सोने, तो देश अधिक ताकदवान, असे मानले जाते. कोणत्याही जागतिक संकटावर मात करण्यासाठी सोने महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रत्येक देशाच्या बँका सोन्याचे साठे वाढवत असतात. सोने केवळ अर्थव्यवस्थेतच नाही, तर हिंदू पौराणिक कथांमध्येदेखील महत्त्वपूर्ण आहे. या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारतात सोन्याच्या नवीन खाणी सापडल्यामुळे देशाला आयातीवरील दबाव कमी करण्यास मदत होईल.
ओडिशा : ओडिशातील देवगढ, केओंझर व मयूरभंज या विविध जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या नवीन खाणी सापडल्या आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने (GSI) या ठिकाणी अंदाजे १,६८५ किलो सोने शोधून काढले आहे. ओडिशा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोन्याचे मोठ्या प्रमाणात साठे सापडल्यामुळे ओडिशा सोन्याच्या खाणींसाठी एक नवीन आकर्षण केंद्र ठरत आहे. ओडिशा हे राज्य नैसर्गिक संसाधनांच्या विपुलतेसाठी प्रसिद्ध आहे.
सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार व देवगड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे असल्याचे आढळून आले आहे. मलकानगिरी, संबलपूर यांसारख्या ठिकाणी अजूनही या मौल्यवान धातूचा शोध सुरू आहे. या ठिकाणी अभ्यास आणि अधिक संशोधन केले जात आहे. त्यामध्ये जशीपूर, सुरियागुडा, रुआंसी, इडेलकुचा, मरेदिही, सुलेपत व बदामपहाड यांसारख्या ठिकाणांचाही समावेश आहे. मयूरभंज जिल्ह्यातही सोन्याचे साठे आढळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवगड जिल्ह्यातील आदासा-रामपल्ली येथे पूर्वी साठे सापडले होते. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय) सध्या या क्षेत्रात जी-२ स्तरीय आणि तांब्यासह अनेक खनिज संसाधनांच्या शक्यतेचा शोध घेत आहे.
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे सापडलेल्या सोन्याचा साठा लाखो टन असण्याचा अंदाज आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)ने नुकत्याच पूर्ण केलेल्या सर्वेक्षणामध्ये मेहगावान प्रदेशात अंदाजे १०० हेक्टरवर पसरलेला सोन्याचा साठा आढळून आला आहे. या शोधामुळे स्थानिक लोकसंख्या, तसेच खाण कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्य प्रदेशातील महाकोशल प्रदेश, विशेषतः जबलपूर व कटनी हे जिल्हे हे एक मोठे खाण केंद्र आहे. या ठिकाणी लोह व तांबे ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात,; तर जबलपूरच्या अगदी दक्षिणेस बालाघाट प्रदेशात मँगनीजचे साठे आहेत. प्रमुख खनिजांव्यतिरिक्त कटनीमध्ये संगमरवराचे साठेही आहेत.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातrn भारतातील पहिली मोठी खासगी सोन्याची खाण दरवर्षी ७५० किलो सोन्याचे उत्पादन करील, अशी अपेक्षा आहे. डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड (Deccan Gold Mines Ltd)च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आंध्र प्रदेशातील भारतातील पहिली मोठी खासगी सोन्याची खाण लवकरच पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे.
सध्या भारत दरवर्षी सुमारे १,००० टन सोन्याची आयात करतो. या पार्श्वभूमीवर ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण- देश सोन्याचा सर्वांत मोठा आयातदार आहे. बीएसईवर सूचीबद्ध असलेली पहिली व एकमेव सोन्याची शोध कंपनी डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड ही Geomysore Services India Ltd मध्ये भागीदार आहे. ही कंपनी आंध्र प्रदेशातील जोन्नगिरी येथे पहिली खासगी क्षेत्रातील सोन्याची खाण विकसित करीत आहे. जोन्नगिरी गोल्ड प्रकल्पाला जून व जुलै या महिन्यांत पर्यावरणासंबंधातील मंजुरी मिळाली आहे. पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू झाल्यावर या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ७५० किलोग्रॅम सोन्याचे उत्पादन अपेक्षित आहे आणि दोन ते तीन वर्षांत ते १,००० टनांपर्यंत वाढवले जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारतातील सोन्याची बाजारपेठ
भारत जगातील सर्वांत मोठ्या सोन्याच्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतीय कुटुंबांकडे २५,००० टनांहून अधिक भौतिक सोने आहे, जे मध्यवर्ती बँकेच्या एकूण साठ्यापेक्षा खूप जास्त आहे. भारत हा सोन्याचे उत्पादन करणारा मोठा देश नाही. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये भारताची सोन्याची मागणी ८०० टनांहून अधिक होती आणि ती पूर्ण करण्यासाठी देशाला तेवढ्याच प्रमाणात सोने आयात करावे लागले. वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४ मधील सोन्याच्या आयातीचे आकडे सुधारित करण्यात आले आहेत. पूर्वी ७२४ टन असा आकडा नमूद होता, जो आता ८१२ टन करण्यात आला आहे.
२०२४ मध्ये भारतात सोन्याची एकूण ग्राहक मागणी ८०२.८ टन होती, जी जागतिक सोन्याच्या मागणीच्या २६ टक्के आहे. त्यामुळे भारत चीन (८१५.४ टन ग्राहक मागणी)नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्यवर्ती बँका जगभरात २०२२ पासून सोन्याच्या मोठ्या खरेदीदार आहेत. २०२५ मध्ये आरबीआयचा सोन्याचा साठाही सुमारे ८८० टनांपर्यंत वाढला आहे.
सोन्याचे दर
आज भारतातील सोन्याचा भाव १,२२,७०० रुपये आहे. या उच्च किमतींमुळे २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत दागिन्यांच्या मागणीवर परिणाम होत आहे. सोन्याची ग्राहक मागणी वार्षिक १६ टक्क्यांनी कमी झाली आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील सोन्याच्या नवीन खाणींचा नुकताच झालेला शोध आयातीवरील दबाव कमी करण्यास मदत करू शकतो. भारतात असणाऱ्या सोन्याच्या खाणींवरून आणि अलीकडच्या काळात झालेल्या शोधावरून हे स्पष्ट होते की, येत्या काळात देशातील सोन्याचे साठे आर्थिक बळकटीकरण आणि रोजगार यासाठी देशाचा एक प्रमुख आधार ठरू शकतात.
