ईशान्य भारत हा देशाच्या सर्वात अविकसित भागांपैकी असलेला भूभाग. रस्ते आणि हवाई मार्गाने हा प्रदेश उर्वरित भारताबरोबर जोडला गेला असला तरी इतर भागात सर्वदूर पोहोचलेली रेल्वे ईशान्य भारतात फारशी नाही. पुढील काही वर्षांमध्ये त्यामध्ये बदल करण्याची आणि त्याद्वारे बांगलादेशच्या सहाय्याने ईशान्य भारताला मुख्य भूमीपासून अधिक अलग पाडण्याच्या चीनच्या आक्रमक महत्त्वाकांक्षेला आळा घालण्याची योजना आहे.
ईशान्य भारतात रेल्वेचा विस्तार
ईशान्येकडील सर्व सात राज्ये २०३० पर्यंत रेल्वेने देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या २२ किमी लांबीचा अरुंद सिलिगुडी कॉरिडॉर हा ईशान्य भारताला रस्ते मार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. हा मार्ग जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो असुरक्षित आहे. हा भाग ‘चिकन नेक’ तसेच भू-राजकीय चेकपॉइंट म्हणून ओळखला जातो. रेल्वेची महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात उतरली तर या कॉरिडॉरवरील अवलंबित्व कमी होईल. हा कॉरिडॉर नेपाळ, भूतान आणि बांगलादेश यांच्यामध्ये दाबलेला आहे.
ईशान्य रेल्वेची सद्यःस्थिती
आजघडीला, आसामसह त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आता मिझोरम ही ईशान्येकडील चार राज्ये उर्वरित देशाशी रेल्वेने जोडलेली आहेत. मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्या राज्यातील ५१.३८ किमी लांबीच्या बैराबी-सैरंग मार्गाचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ईशान्य भारतातील रेल्वेच्या जाळ्याचा वेगाने विस्तार होत आहे. या महत्त्वाकांक्षी जोडणी प्रकल्पामध्ये या प्रदेशाचे आर्थिक चित्र लक्षणीयरित्या पालटण्याची क्षमता आहे.
ईशान्य राज्यांना जोडण्याची निकड
चीनसारखा आक्रमक व अवाढव्य, बांगलादेशसारखा स्वतःच असुरक्षित आणि म्यानमारसारखा अस्थिर देश शेजारी म्हणून लाभलेला हा भूप्रदेश आधीपासूनच असुरक्षित राहिला आहे. विशेषतः चीनपासून या भागाला सर्वाधिक धोका आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत चीन आणि बांगलादेशचे दृढ होणारे संबंध आणि म्यानमारमध्ये वाढती गुन्हेगारी यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये जराही तणाव वाढला तरी ईशान्येकडील राज्यांचा भारताशी संपर्क पूर्णपणे तुटण्याचा धोका कायम राहणार आहे. त्यातच बांग्लादेश व चीन यांची वाढती जवळीक यामुळे या ‘चिकन नेक’समोरील आव्हानेही वाढली आहेत.
मणिपूरची स्थिती
हिंसाचाराने पोळणाऱ्या मणिपूरमध्ये, खडतर भूभाग आणि सततची अशांतता असतानाही १११ किमी लांबीचा जिरीबाम-इम्फाळ रेल्वेमार्ग वेगाने प्रगती करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अनेक बोगदे आणि पूल असतील. त्यात रेल्वेच्या खांबावरील जगातील सर्वात उंच पुलाचाही समावेश आहे. हा पूल आता पूर्णत्वाच्या जवळ आहे. रेल्वामार्गावरील ५२ नियोजित बोगद्यांची एकूण लांबी ६१.३२ किमी इतकी असणार आहे. त्यातील ५९ किमी लांबीचे बोगदे पूर्ण झाले आहेत. तर ११पैकी पाच मोठे आणि १३८पैकी ८१ लहान पूल पूर्ण झाले आहेत. या मार्गावर जवळपास १० किमी लांबीचा सांगाईहेल बोगदा हा ईशान्येतील सर्वात लांब रेल्वे बोगदादेखील समाविष्ट असेल.
मेघालयातील आव्हाने
विशेष म्हणजे मणिपूरमध्ये रेल्वेची प्रगती समाधानकारक असली तरी मेघालयातील परिस्थिती मात्र आव्हानात्मक आहे. स्थानिक समुदायांच्या विरोधामुळे रेल्वे विस्ताराच्या योजना रखडल्या आहेत. वाढत्या रेल्वे सुविधांमुळे बाहेरील लोकांचा ओघ वाढण्याची भीती स्थानिकांना वाटत आहे. राज्याचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी अलीकडेच सांगितले की या प्रकल्पांसाठी पर्यायी डागा शोधली जात आहे. सार्वजनिक सहमती आणि लोकांच्या व्यापक पाठिंब्यानेच पुढे जाईल असे सध्या तरी त्यांनी सांगितले आहे.
मिझोरमचाही राष्ट्रीय रेल्वेच्या नकाशात प्रवेश
ऐझवालजवळील ५१.३८ किमी लांबीच्या बैराबी-सैरंग रेल्वेमार्गावर १२.८५३ किमी अंतराचे ४८ बोगदे, ५५ मोठे आणि ८७ छोटे पूल, पाच रस्त्यांवरील पूल आणि नऊ रस्त्याखालून जाणारे मार्ग आहेत. यापैकी १९६ क्रमांकाचा एक पूल १०४ मीटर, म्हणजे कुतुबमिनारपेक्षा ४२ मीटर उंच आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार रुपये खर्च आला आहे. हा रेल्वे मार्ग चार टप्प्यांत कार्यान्वित करण्यात आला. बैराबी-होर्तोकी (१६.७२ किमी) जुलै २०२४मध्ये कार्यान्वित झाला. त्यानंतर होर्तोकी-कावनपुई (९.७१ किमी), कावनपुई-मुआलखांग (१२.११ किमी) आणि मुआलखांग-सैरांग (१२.८४ किमी), हे तीन टप्पे गेल्या महिन्यात सुरू करण्यात आले. बैराबी-सैरंग मार्गाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ नोव्हेंबर २०१४ रोजी केली.
नागालँडमधील रेल्वेची प्रगती
नागालँडमध्ये, ८२.५० किमी लांबीचा दिमापूर-कोहिमा रेल्वेमार्ग प्रगतीपथावर आहे. या मार्गाची सुरुवात आसाममधील धनसिरी स्थानकापासून होते आणि तो पुढे कोहिमाजवळील झुब्झा इथपर्यंत आहे. या मार्गावर धनसिरी, धनसिरीपार, शोखुवी, मोलवोम, फेरिमा, पिफेमा, मेंगुझुमा आणि झुब्झा अशी आठ स्थानके आहेत. या मार्गावर २७ मोठे पूल, १४९ छोटे पूल, पाच रस्त्यावरून जाणारे पूल, १५ रस्त्याखालून जाणारे मार्ग आणि २० बोगदे असतील. या सर्वांची एकूण लांबी ३१ किमी इतकी असेल. धनसिरी आणि शोखुवी दरम्यानचा १६.५ किमीचा मार्ग ऑक्टोबर २०२१मध्ये सुरू करण्यात आला. त्यात शोखुवी ते अरुणाचल प्रदेशातील नाहरलागुन आणि मेघालयातील मेंडीपथार यांच्यादरम्यान प्रवासी सेवा आधीच सुरू झाल्या आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर, १४.६४-केटी शोखुवी-मोल्वोम विभागामुळे नागालँड ईशान्येमधील इतर शेजारी राज्ये आणि उर्वरित भारताशी अधिक जोडला जाईल.
सिक्कीम-बंगाल जोडणी
‘नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे’चे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिन्जल किशोर शर्मा यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील शिवोक आणि सिक्कीमचे रंगपोला यांना जोडणारा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०२७पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा शिवोक-रंगपो प्रकल्प ४४.९६ किमी लांबीचा असून तो पूर्ण झाल्यावर सिक्कीमची राजधानी गंगटोक पश्चिम बंगालमार्गे देशाच्या उर्वरित भागाशी जोडली जाईल. nima.patil@expressindia.com