पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले. या काळात देशात १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले. यावेळी महत्त्वाच्या संकेतस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानी संकेतस्थळे हॅक केली. भारत व पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवणाऱ्या पाच हजारांहून अधिक पोस्ट महाराष्ट्र सायबर विभागानेही समाज माध्यमांवरून हटवल्या. इंटरनेच्या या युगात सायबर विश्वामध्येही युद्ध लढले जाते. त्याला सायवॉर म्हणतात. बेमालूम अशी बनावट छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती तयार करणे, फेकन्यूज तयार करणे हा त्याचा भाग. फेसबुक आणि ट्विटर हे त्याचे माध्यम होते. युद्धजन्य परिस्थितीत याच सायबर हत्याराचा वापर करून प्रतिस्पर्धी देशांमध्ये दंगल घडवणे, आर्थिक व समाजिक हानी पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातात. याबाबत जाणून घेऊया
भारतावर सायबर हल्ले का वाढले?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात आता सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत सायबर विभागाकडून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला. ‘इकोज ऑफ पहलगाम’ या सविस्तर अहवालानुसार, २३ एप्रिलपासून जवळपास १० लाख सायबर हल्ले नोंदवले गेले आहेत. एखाद्या हॅकरकडून हे हल्ले झालेले नसून या मागे एक गट असल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांनी राबवलेल्या मोहिमेचा हा भाग असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे फक्त हल्ले नसून संघटित सायबर युद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती.
हल्ल्यांमागे कोण?
भारतावर झालेले सायबर हल्ले पाकिस्तान, पश्चिम आशियातील काही देश, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांतून होत होते. या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक हॅकर गटांनी स्वतःला विशेष नाव दिले होते. त्यातील ‘टीम इन्सेन पीके’ हा पाकिस्तानस्थित गट सर्वाधिक सक्रिय आहे. त्याच्याकडून सर्वाधिक हल्ले होत असल्याचा संशय आहे. या गटाने भारतीय सैनिकी शिक्षण संस्थांवर, सैनिक कल्याण संकेतस्थळ आणि अनेक सैनिकी शाळांच्या संकेस्थळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सायबर हल्ल्यांना २३ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर २६ एप्रिलपासून या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. काही हल्ले यशस्वीही झाले आहेत, असे ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालात नमूद आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने अनेक हल्ले अडवले असले तरी भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी संकेतस्थळ यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना आता अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारताकडून प्रतिहल्ले!
भारतावर झालेल्या सायबर हल्ल्यांनंतर पाकिस्तानवरही भारतीय हॅकर्सनी हल्ले करून १५०० हून अधिक संकेतस्थळे हॅक केली होती. सायबर कमांडर या सायबर हॅकर्सच्या गटाने या हॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी पाकिस्थानी संकेतस्थळांवर हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणांसह पाकिस्तानी यंत्रणांना थेट इशारा देण्यात आला आहे. “हिंदुस्तान जिंदाबाद. शाळा आणि माजी सैनिकांच्या संकेतस्थळांवर हल्ले करता आणि खोटा प्रचार करता, हे तुम्ही किती दुर्बळ आहात, याचे प्रतीक आहे. तुम्ही बाइट्सनी लढण्याबद्दल बोलता? छान, कारण आम्ही तुमचे प्रत्येक बाइट पाहतो. हा सर्व अपप्रचार वेळीच थांबवा नाही, तर तुम्हाला मोठ्या सायबर शक्तीला तोंड द्यावे लागले, ती शक्ती तुमच्या कल्पनेपलीकडची आहे, असे संदेशही देण्यात आला होता.
किती पोस्ट हटवण्यात आल्या?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षासंदर्भात खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या समाज माध्यमांवरील सुमारे पाच हजार पोस्ट्स महाराष्ट्र सायबर विभागाने हटवल्या आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर महाराष्ट्र सायबर विभाग समाज माध्यमांवर प्रक्षोभक, अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती पसरवणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवून आहे. त्यात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात खोटी माहिती पसरवली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर समाजमाध्यमांवरून सुमारे पाच हजार पोस्ट हटवण्यात आल्या.
यापूर्वी ‘सायवॉर’ कधी झाले?
जुलै २०१२ मध्ये आसाममध्ये बोडो आदिवासी आणि मुस्लिम स्थलांतरित यांच्यात संघर्ष पेटला होता. त्यानंतर दहा-बारा दिवसांतच त्याचा वणवा दक्षिणेकडील राज्यांतही पसरला. त्यावरून ११ ऑगस्टला मुंबईत दंगल झाली. त्यानंतर भारतीय इतिहासातील फाळणीनंतरच्या सर्वांत मोठ्या स्थलांतरास सुरुवात झाली. त्या काळात इंडियन मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांसाठी ज्ञात असलेल्या भागांतच प्रामुख्याने ईशान्य भारतीयांना लक्ष्य करण्यात आले होते. हा योगायोग नव्हता. पाकिस्तानात उगम असलेल्या संकेतस्थळांवरून, समाज माध्यमस्थळांवरून, मोबाइल संदेशांतून ईशान्य भारतीयांविरोधात तेव्हा गरळ ओकली जात होती. त्यांच्या मनात भय निर्माण होईल असा मजकूर प्रसारित करण्यात येत होता. हे सरकारच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यानंतर तशी सुमारे अडीचशे संकेतस्थळे बंद करण्यात आली. एका दिवशी पाचहून अधिक एसएमएस पाठविण्यावर पंधरा दिवसांसाठी बंदी घालण्यात आली होती.
युद्धसदृश परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी?
तणावाच्या काळात सुजाण नागरिक म्हणून आपण समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर करायला हवा. विद्वेष निर्माण करणारे संदेश पसरविणे थांबवू शकतो. आलेले संदेश पुढे पाठवण्यासाठी स्वतंत्र किंमत मोजावी लागत नाही म्हणून आपल्या मोबाइलवर येणारे सगळे संदेश पुढे पाठविण्याचा वसाच अनेकांनी घेतलेला असतो. ते थांबवणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही मजकूर, कोणतेही छायाचित्र, कोणतीही चित्रफित… ती कोणीही पाठविलेली असो… तिच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची शहानिशा करणे आवश्यक आहे. ती करता येत नसेल, तर त्यावर विश्वास ठेवू नये. हे पाळले तरी दहशतवाद्यांच्या, अतिरेकी गटांच्या, शत्रूराष्ट्रांच्या सायवॉरचे बळी ठरण्यापासून आपण वाचू शकतो. याच प्रमाणे दहशतवादी हल्ल्यांचे एक अत्यंत परिणामकारक अस्त्र म्हणून इंटरनेट आणि महामाहितीसंच अर्थात बिगडेटा याकडे पाहावे लागेल. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याची ताकद त्यात आहे. अत्यंत अहिंसकपणे हिंसाचार घडवून आणता येऊ शकतो त्यातून. दहशतवादी संघटनांकडून त्याचा वापर होणारच नाही या भ्रमात कोणीही राहता कामा नये. समाज माध्यमांवर जागरूक राहणे आवश्यक आहे.