Narendra Modi Reply to Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादले. रशियाकडून खजिन तेल खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी भारतावरही तब्बल ५० टक्के कराचे (टॅरिफ) ओझे टाकले. इतक्यावरच न थांबता, ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला डिवचण्याचाही प्रयत्न केला. पण, पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या दबावाला न जुमानता, थेट चीनचा दौरा केला. या दौऱ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलला. बुधवारी त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करीत भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध लवकरच सुधारणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचाच हा आढावा…

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी पहाटे त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी भारताशी पुन्हा एकदा व्यापाराची चर्चा आणि वाटाघाटी करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी मी उत्सुक असून, पुढील आठवड्यात आमची चर्चा होईल. मला खात्री आहे की, या दोन्ही महान देशांना निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही”, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. विशेष बाब म्हणजे- गेल्या आठवड्यातही व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांचं कौतुक केलं होतं. “नरेंद्र मोदी हे महान पंतप्रधान असून, ते आपले नेहमीच चांगले मित्र राहतील. सध्या त्यांची भूमिका मला आवडत नसली तरी भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहतील”, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं.

आणखी वाचा : France Prime Minister : गेल्या २० महिन्यांत फ्रान्समधील सरकार चौथ्यांदा कोसळलं; कारण काय? 

पंतप्रधान मोदींनी कसा दिला प्रतिसाद?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात नरमाईची भूमिका घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला. “भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र असून, नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्यातील व्यापार वाटाघाटीच्या चर्चेतून भारत-अमेरिकेमधील भागीदारीची अमर्याद क्षमता निर्माण होईल, असा मला विश्वास आहे. आमचे पथक लवकरच ही चर्चा पूर्ण करण्यासाठी काम करीत आहे. मीदेखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. आम्ही आमच्या दोन्ही देशांतील लोकांचे उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करू. मला खात्री आहे की, या चर्चेतून दोन्ही महान देशांसाठी चांगला आणि यशस्वी तोडगा निघेल,” असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

भारत-अमेरिका संबंध पुन्हा रुळावर येणार?

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात लवकरच फोनवरून चर्चा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या ‘क्वाड’ बैठकीच्या, तसेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होऊ शकते. या चर्चेतून दोन्ही नेते व्यापार करार आणि रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धावरही तोडगा काढू शकतात. सध्या तरी मोदी सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीसाठी न्यूयॉर्कला जाणार नाहीत. त्याऐवजी दोन्ही नेत्यांची पुढील भेट मलेशियातील क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या ‘आसियान’ शिखर परिषदेत होण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराशी संबंधित अनेक मुद्दे अजूनही सुटलेले नाहीत.

भारताने किंचितही घेतली नाही माघार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांच्या दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमेरिकेतील कृषी उत्पादने आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी भारताने आपली बाजारपेठ खुली करण्यास नकार दिल्यानंतर हा करार लांबणीवर पडला. भारताच्या या भूमिकेमुळे ट्रम्प आणि त्यांचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्यासह काही वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. यादरम्यान, भारतावर ५० टक्के कर आकारल्यानंतर ट्रम्प यांनी ऑगस्टच्या शेवटी भारताला भेट देण्याचा नियोजित दौराही रद्द केला. “जोपर्यंत भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवत नाही, तोपर्यंत पुढील वाटाघाटी होणार नाहीत”, असा सज्जड दमच ट्रम्प यांनी दिला होता. भारताने मात्र आपली भूमिका कायम ठेवत राष्ट्रीय हित जोपासण्यासाठी किंचितही माघार घेतली नाही.

हेही वाचा : Who is Balen Shah : कोण आहेत बालेन शाह? ते नेपाळचे पंतप्रधान होणार? भारताला काय दिला होता इशारा?

ट्रम्प यांचे ‘आक्रमक डावपेच’ अयशस्वी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. त्यातच भारताने अमेरिकेचे दोन प्रतिस्पर्धी रशिया आणि चीनशी हातमिळवणी केल्याने ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढला आहे. भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लादणे ही मोठी चूक होती हे त्यांना कळून चुकले आहे, असे अमेरिकेतील एका माजी प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर देण्यासाठी जे काही केलं ते योग्यच होतं; पण यावरून अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार, असा निष्कर्ष काढता येणार नाही.”

कायदेशीर आव्हानामुळेच ट्रम्प नरमले?

एकीकडे भारताकडे मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला मात्र भारतीय वस्तूंवर १०० टक्के आयात शुल्क लादण्याचं आवाहन केल्याचे वृत्त आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांमधील अलीकडील चर्चेदरम्यान ट्रम्प त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांवर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मुद्द्यावर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे. याआधीही अनेक कनिष्ठ न्यायालयांनी ट्रम्प यांचे अनेक निर्णय बेकायदा ठरवले आहेत. जर न्यायालयाने आयात शुल्काचा निर्णय अवैध ठरवला, तर ट्रम्प यांची नाचक्की होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ते भारतासमोर मैत्रीचा हात पुढे करत नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.