Indian Railways Luggage Policy : लांब पल्ल्याचा प्रवास असला की, अनेक जण रेल्वेला पसंती देतात. प्रवास सुखकर व्हावा म्हणून रेल्वेकडूनही प्रवाशांना अनेक सोई-सुविधा दिल्या जातात. मात्र, प्रवासादरम्यान काही प्रवाशांकडे सामानाच्या मोठमोठ्या बॅग असल्यामुळे त्याचा इतरांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेतील प्रत्येक सीटखाली, तसेच कोपऱ्यात बॅगांचा मोठा खच दिसून येतो. गेल्या अनेक दशकांपासून रेल्वेने प्रवाशांच्या सामानाबाबत फारसे नियम कडक केलेले नाही. याउलट विमान कंपन्या प्रत्येक प्रवाशाच्या सामानाचं वजन नीट तोलून, त्यावर शुल्क आकारतात. हीच बाब लक्षात घेता, आता भारतीय रेल्वेने विमान प्रवासाप्रमाणेच सामानाचे नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे नवे नियम नेमके काय असतील? प्रवाशांना किती वजनापर्यंत सामान नेण्याची परवानगी असेल? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…
रेल्वे प्रवासादरम्यान आपण अनेक वेळा लोकांना मोठमोठे सामान वाहून नेताना बघितलं असेल. मात्र, आता लवकरच या संदर्भात नियम तयार होणार आहेत. भारतीय रेल्वे आता विमानतळांसारखीच एक ‘लगेज पॉलिसी’ (सामान धोरण) आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार प्रवाशांना सामानाचे निश्चित नियम पाळावे लागणार आहेत. रेल्वे मंत्रालयातील माहिती व प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी ‘न्यूज १८’ला सांगितलं की, प्रवाशांना यापुढे त्यांच्या सामानाचे वजन करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक रेल्वेस्थानकावर विजेवर चालणारी वजन यंत्रे बसवण्यात येतील. त्यानुसार जे प्रवासी ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त किलो वजनाचे सामान घेऊन प्रवास करतील, त्यांना दंड आकारला जाईल.
‘बिझनेस टुडे’च्या अहवालानुसार, या योजनेची पहिली अंमलबजावणी प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर b अलीगढ जंक्शन यांसारख्या स्थानकांवर केली जाईल. ही प्रणाली यशस्वी ठरल्यास ती हळूहळू इतर शहरांमध्येही लागू केली जाईल. भारतीय रेल्वेकडे आधीपासूनच सामानासंबंधीचे नियम आहेत; पण प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी फारशी होताना दिसून येत नाही. आता मात्र विमानतळांप्रमाणेच हे नियम कडकपणे लागू करण्याची तयारी सुरू आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या मोफत सामानाच्या मर्यादा प्रवासाच्या वर्गानुसार ठरविल्या जाणार आहेत.
आणखी वाचा : मुंबईत मुसळधार पाऊस कधीपर्यंत सुरू राहणार? पावसाच्या रौद्र रूपाची कारणं कोणती?
प्रत्येक श्रेणीनुसार सामानावर मर्यादा
- एसी फर्स्ट क्लास या श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी ७० किलो वजनापर्यंतचे सामान मोफत घेऊन जाऊ शकतात.
- त्याशिवाय या श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १५ किलो वजनाच्या सामानाची अतिरिक्त सूट दिली जाईल.
- प्रवाशांकडे आणखी सामान असल्यास ६५ किलोपर्यंत अतिरिक्त सामान पार्सल व्हॅनमधून पाठविण्याच्या दृष्टीने बुकिंग करता येईल.
- जर अधिक सामानाची गरज असल्यास, पार्सल व्हॅनमधून अतिरिक्त ६५ किलो सामान पाठविण्यासाठी बुकिंग करता येईल.
- सेकंड एसी- या श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी ५० किलो वजनापर्यंतचे सामान मोफत घेऊन जाऊ शकतात.
- प्रवाशांकडे त्यापेक्षा जास्त सामान असल्यास त्यांना ३० किलोपर्यंतचे सामान पार्सल व्हॅनमधून पाठविण्याबाबत बुकिंग करता येईल.
- थर्ड एसी किंवा एसी चेअर कार – या श्रेणीतील प्रवाशांना ४० किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी असेल.
- तसेच त्यांना यावर १० किलो वजनाचे सामान नेण्याची अतिरिक्त सवलत दिली जाईल.
- त्यापेक्षा जास्त सामान असल्यास, पार्सल व्हॅनमधून आणखी ३० किलो सामानाचे बुकिंग करता येईल.
- स्लीपर क्लास – या श्रेणीतील प्रवाशांना ४० किलो वजनापर्यंतचे सामान मोफत नेता येईल.
- त्याशिवाय प्रवाशांना सामानावर १० किलो अतिरिक्त वजनाची सूट मिळेल.
- त्याव्यतिरिक्त पार्सल व्हॅनमधून ७० किलोपर्यंत अतिरिक्त सामान बुकिंग करण्याची सुविधा असेल.
- सेकंड क्लास, तसेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ३५ किलोपर्यंत सामान नेण्याची मर्यादा आहे.
- त्यावर १० किलो वजनाची अतिरिक्त सूट दिली जाईल आणि गरज पडल्यास, पार्सल व्हॅनमधून अतिरिक्त ६० किलो सामान पाठविण्यासाठी बुकिंग करता येईल.

आता बॅगेच्या आकारावरही मर्यादा
भारतीय रेल्वे केवळ प्रवाशांच्या सामनाच्या वजनावरच नव्हे, तर बॅगेच्या आकारावरही मर्यादा आणणार आहे. नवीन नियमांनुसार- प्रवाशांच्या बॅगेची लांबी, रुंदी व उंची- अनुक्रमे १०० सेंमी x ६० सेंमी x २५ सेंमी पक्षा जास्त नसावी. थर्ड एसी किंवा एसी चेअर कारमधील प्रवाशांसाठी ही मर्यादा आणखी कमी आहे. त्यांची बॅग ५५ सेंमी x ४५ सेंमी x २२.५ सेंमीपेक्षा मोठी नसावी. जर प्रवाशांची बॅग या मर्यादेपेक्षा मोठी असेल, तर त्यांना ती सामान कक्षात पाठवावी लागेल आणि त्यासाठी किमान ३० रुपये इतकं अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल.
आणखी वाचा : अमेरिकेच्या आयात शुल्काला चीनने खरंच चकवलंय का? अर्थव्यवस्थेची स्थिती काय सांगते?
पाच ते १२ या वयोगटातील रेल्वेने प्रवास करीत असलेल्या लहान मुलांसाठी सामानाची मर्यादा निम्मी मर्यादा असेल; पण ती ५० किलोपेक्षा जास्त नसावी. रेल्वेमध्ये चढताना किंवा उतरताना अडथळा निर्माण करणाऱ्या मोठ्या आणि अवजड बॅगांवर दंड आकारला जाऊ शकतो. या संदर्भात रेल्वेनं एका निवेदनात स्पष्ट केलंय की, सामान नेण्याबाबतचे नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आता अधिकाऱ्यांना त्यांची योग्य अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना सामानाचे वजन व आकार या दोन्ही नियमांचं पालन करावं लागणार आहे.
मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास होणार दंड
रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा प्रवाशांकडे मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे.
मोफत सामानाची मर्यादा संपल्यानंतर अतिरिक्त सामानासाठी सामान्य बुकिंग दराच्या १.५ पट शुल्क आकारलं जाईल. त्यासाठी किमान ३० रुपये शुल्क असेल. किमान १० किलो वजनासाठी आणि किमान ५० किमी अंतरासाठी हे शुल्क लागू होईल. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमांमुळे रेल्वेच्या डब्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच, प्रवाशांना होणारी गैरसोय टाळून प्रवासादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. दरम्यान, रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी त्यांच्या सामानाचं वजन करून घ्यावं आणि अतिरिक्त सामान असल्यास वेळेपूर्वी त्याचं बुकिंग करावं, जेणेकरून त्यांना आर्थिक दंडाला सामोरं जावं लागणार नाही, असं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केलं आहे.