scorecardresearch

Premium

विश्लेषण: चिनी ‘जेएफ-१७’ फायटरपेक्षा भारतीय ‘तेजस’ सरस… काय आहे या विमानाचे वेगळेपण?

हवाई दलाची ताकद वाढविणारे तेजस हे सुखोई ३० एमकेआय आणि चीनच्या जेएफ -१७ या विमानापेक्षा वेगळे आहे. प्रारंभी त्याची किंमत अधिक वाटत असली तरी जसजसे उत्पादन वाढेल, तशी ती कमी होऊ शकते. तेजसच्या वेगळेपणाचा हा वेध…

Indian Tejas is better than Chinese JF-17 fighter
कामगिरीत तेजस जेएफ १७ लढाऊ विमानावर सहज मात करेल.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

हेमंतकुमार एस. कुलकर्णी, ग्रुप कॅप्टन (निवृत्त)

भारतीय हवाई दलाची भिस्त आगामी काळात ज्या तेजसवर आहे, त्या लढाऊ विमानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच हवाई सफर केली. तेजसची क्षमता पाहून त्यांनी या विमानाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या संस्थांचे अभिनंदन केले. हवाई दलाची ताकद वाढविणारे तेजस हे सुखोई ३० एमकेआय आणि चीनच्या जेएफ -१७ या विमानापेक्षा वेगळे आहे. प्रारंभी त्याची किंमत अधिक वाटत असली तरी जसजसे उत्पादन वाढेल, तशी ती कमी होऊ शकते. तेजसच्या वेगळेपणाचा हा वेध…

Safest cars in India
सेफ्टीच्या बाबतीत ‘या’ ५ कारला तोड नाय! एका कारची किंमत तर ८ लाखापेक्षाही कमी अन् मिळतात ६ एअरबॅग्ज
India will be the third largest economy in the world by 2027 says Jefferies
ह्युंदाईच काय, ॲमेझॉन, सॅमसंगला भारतीय बाजारात सूचिबद्धतेचे आकर्षण… बाजार भांडवलात २०३० पर्यंत दुपटीहून अधिक वाढीचा आशावाद व्यक्त करणारा अहवाल 
increase in temperature Prediction negative impact wheat production farmer
गहूउत्पादक शेतकरी अडचणीत? संभाव्य तापमानवाढीचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता
Why was aid to Gaza Strip stopped is UN staff involved in the massacre of Israelis
विश्लेषण : गाझा पट्टीचा मदतपुरवठा का थांबवण्यात आला? ‘यूएन’चे कर्मचारी इस्रायलींच्या हत्याकांडात सहभागी?

तेजस भारतात निर्मिलेले पहिले लढाऊ विमान आहे का?

एलसीए तेजस हे देशात बनविलेले पहिले आणि सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे असे अनेकांना वाटत असले तरी प्रत्यक्षात ते विमान होते ‘मारुत’, ज्याला पहिले देशांतर्गत निर्मित लढाऊ विमान म्हणून श्रेय दिले जाऊ शकते. ते जवळजवळ २५ वर्षे सक्रिय सेवेत होते. एचएफ – २४ मारुत १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी होते. विशेषत: लोंगेवालाच्या लढाईत ते सहभागी झाले होते. ध्वनीहून अधिक वेगात अर्थात सुपरसॉनिक-सक्षम लढाऊ विमान म्हणून कल्पना केली गेली असली तरी मारुत कधीही माक १ वेग (१२३४ किलोमीटर प्रतितास) वेग ओलांडू शकले नाही. तेजस १.८ माक (२२२२ किलोमीटर प्रतितास ) गतीने मार्गक्रमण करू शकते. वैमानिकी विकास प्रतिष्ठानला (एडीए) एलसीएची रचना आणि विकास सोपवण्यात आला होता, तर एचएएलची सरकारच्या स्वावलंबनाच्या उद्दिष्टांच्या अनुरूप प्रमुख कंत्राटदार म्हणून निवड करण्यात आली होती. एलसीए कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओळखल्या गेलेल्या पाच प्रमुख तंत्रज्ञानांपैकी तीन विकसित करण्यात एडीएला यश मिळाले. सहा तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांचे नियोजन होते. दुसऱ्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाच्या पहिल्या उड्डाणानंतर २००३ मध्ये प्रारूप विमानाची (प्रोटोटाईप) चाचणी सुरू झाली. पहिले प्रारूप विमान पीव्ही-१ ने २००३ मध्ये पहिले उड्डाण केले. पहिले प्रशिक्षक प्रारूप विमान पीव्ही-५ हे २००९ मध्ये आणले गेले आणि २६ नोव्हेंबर २००९ रोजी पहिले उड्डाण केले. तेजसचा समावेश असलेली पहिली तुकडी २०१६ मध्ये कार्यान्वित झाली. कोईम्बतूरच्या सुलूर हवाई दल केंद्रस्थित ४५ क्रमांकाची पहिली तुकडी होती, ज्यांची मिग-२१ विमाने तेजसमध्ये परिवर्तित करण्यात आली.

आणखी वाचा-इराणच्या नौदलात आधुनिक डेलमन युद्धनौका, इस्रायलची चिंता वाढणार?

विकासात आवश्यकतेनुसार घडामोडी होत्या का?

एअरोडायनॅमिक रचनेत उणिवा होत्या आणि अधिक वजनाच्या समस्येचे निराकरण करणे आवश्यक होते. विमानाच्या क्रियेची त्रिज्याही दीर्घ असणे आवश्यक होते. एडीएला विश्वास होता की, तेजस १ ए या मर्यादांवर मात करेल आणि इतर सुधारणांसह एईएसए रडार, एक स्व-संरक्षण जॅमर, अद्ययावत एव्हीऑनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतादेखील असेल. तेजस सध्या तीन प्रकारात उत्पादित होते. तेजस एमके १, एमके १ ए आणि प्रशिक्षण (दोन आसनी). भारतीय हवाई दलाने १८ एमके १ प्रशिक्षक विमानांसह ४० तेजस एमके १ आणि ८३ तेजस एमके १ ए ची मागणी नोंदविलेली आहे. अलीकडेच हवाई दलप्रमुख व्हीआर चौधरी यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने आणखी ९७ तेजस १ ए विमानांची मागणी नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रकारातील तेजस शत्रूच्या रडार रेंजबाहेर राहून (स्टँड-ऑफ) अधिक शस्त्रे डागण्यास सक्षम असेल. यातील अनेक शस्त्रे स्वदेशी बनावटीची असतील. एलसीए एमके – १ ए मुळे विमानातील एकूण स्वदेशी सामग्रीमध्ये लक्षणीय वाढ होईल. या संदर्भातील करारानुसार तेजसचे वितरण फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ज्या उणिवा म्हणून ओळखल्या गेल्या आहेत, त्यासाठी पुनर्रचना आणि संरचनात्मक बदल आवश्यक आहेत; जसे की अंतर्गत इंधन क्षमता वाढवण्यासाठी तेजस २ मध्ये दुरुस्तीची योजना आहे. हवाई दल एकूण ३२४ विमाने खरेदी करण्याची तरतूद करत आहे, ज्यामधे तेजस २ चा समावेश असलेले सर्व प्रकार असतील. तेजस २ सध्या विकासाच्या टप्प्यात आहे आणि अंदाजे २०२६-२०२७ पर्यंत प्रारूप विमान समोर येण्याची अपेक्षा आहे.

एलसीए कार्यक्रमाचा नौदलास कितपत उपयोग आहे?

एरो इंडिया २०२१ मध्ये, तेजस विमानाचा नवीन प्रकार, अर्थात टीईडीबीएफ दोन इंजिनावर आधारित नौदलासाठीच्या नव्या आवृत्तीच्या लढाऊ विमानाच्या रचनेचे अनावरण करण्यात आले. फेब्रुवारी २०२३ मध्ये, नौदल प्रारूप विमानाने स्वदेशी आयएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेवर पहिले अवतरण आणि उड्डाण केले. म्हणजे नौदलाची गरज या कार्यक्रमातून काहीअंशी पूर्ण होईल.

आणखी वाचा-विश्लेषण: मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीबाबत विलंब का झाला?

तेजसमध्ये कोणते देश स्वारस्य दाखवताय?

हवाई दलाने २७ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत यूएईमध्ये आयोजित अभ्यासात पाच तेजस आणि दोन सी – १७ ग्लोबमास्टरसह भाग घेतला. तेजसने प्रथमच भारताबाहेर आंतरराष्ट्रीय उड्डाण सरावात सहभाग घेतला. बोत्सवाना, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, यूएई, फिलिपिन्स, श्रीलंका या देशांनी तेजसमध्ये स्वारस्य दाखवले आहे. एलसीए तेजस खरेदी करण्यास ते उत्सुक आहेत. अर्जेटिना तंत्रज्ञान हस्तांतरणाचा विचार करत आहे.

तेजस लढाऊ विमानाची किंमत किती आहे?

एचएएलने निर्मिलेल्या एका तेजस लढाऊ विमानाची किंमत प्रकार आणि रचना, समाविष्ट साधनसामग्रीवर अवलंबून आहे. एईएसए रडार आणि हवेत इंधन भरण्याची क्षमता यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह अद्ययावत प्रकार असलेल्या तेजस – १ एची किंमत प्रति विमान सुमारे ३०९ कोटी इतकी आहे. प्रशिक्षणार्थी विमानाची किंमत २८० कोटी आहे. प्रारंभीच्या विमान निर्मिती काळात ती ४६२ कोटी इतकी होती. परंतु जितके अधिक उत्पादन केले जाते, तितका खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. चिनी जेएफ १७ ची किंमत सुमारे २९८ कोटी आहे आणि आजपर्यंत सुमारे १५० विमानांची निर्मिती झाली आहे. तेजस – १ए हे सुखोई-३० एमकेआय विमानापेक्षाही महाग आहे. कारण त्यात अनेक नवीनतम उपकरणे जोडली गेली आहेत.

आणखी वाचा-विश्लेषण: संत्री आयात शुल्काच्या प्रतिपूर्तीने काय साध्य होणार?

सुखोई, चीनच्या जेएफ – १७ विमानांच्या तुलनेत तेजस कसे आहे?

तेजसमध्ये इस्रायली आणि स्वदेशी अशा संमिश्र बनावटीचे रडार आहे. ते खूप कमी वजनाचे आहे आणि त्याची शस्त्र क्षमताही चांगली आहे. स्वदेशी निर्मित तेजसचे सुखोई – ३० एमकेआयपेक्षा बरेच फायदे आहेत. त्याचे वजन कमी आहे आणि नऊ टन भार वाहून नेण्याची क्षमता आहे. शिवाय, तेजस ५२ हजार फूट उंचीवर १.६ ते १.८ माक वेगाने उड्डाण करू शकते. चिनी लढाऊ विमानाशी तुलना करता, तेजस (ब्रिलियन्स) आणि जेएफ – १७ थंडर ही दोन्ही एकेरी इंजिनाची बहुउद्देशीय लढाऊ विमाने आहेत. पण इथेच विमानाची समानता संपते. कामगिरीत तेजस जेएफ १७ लढाऊ विमानावर सहज मात करेल. तेजसची भार वहन क्षमता जेएफ – १७ थंडरपेक्षा जास्त आहे. तेजसमध्ये जेएफ – १७ थंडरपेक्षा इंजिन शक्तिशाली (थ्रस्ट टू वेट) प्रमाण आहे. याचा अर्थ तेजस अधिक आक्रमकपणे युद्ध करू शकते. तेजस, जेएफ -१७ ला आपल्या उपस्थितीची माहिती येण्यापूर्वी शोधून मारू शकते. तेजसचे आयुर्मान जेएफ – १७ पेक्षा जास्त आहे. इतकेच नव्हे तर तेजस जेएफ – १७ च्या तुलनेत कमी अंतरात उड्डाण व अवतरण करू शकते.

लेखक माजी हवाई दल अधिकारी आणि सामरिक तज्ज्ञ आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian tejas is better than chinese jf 17 fighter what is the difference of this plane print exp mrj

First published on: 30-11-2023 at 09:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×